जाकीरचा नवा अवतार!

0
79

स्वत:ला आध्यात्मिक गुरू, मार्गदर्शक म्हणून मदरसे, शाळा आणि अन्य संस्थांमधून त्याच देशाच्या विरोधात काम करायचे, दहशतवाद्यांना छुपी मदत करायची, हा नवा धंदा जाकीर नाईकच्या रूपाने नुकताच आपण पाहिला. या जाकीर नाईकला बांगलादेश आणि अन्य काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याच बांगलादेशातील जाकीर नाईकचा नवा अवतार मौलाना अबु काशेम याला नुकतीच बांगलादेशी पोलिसांनी अटक केली आहे. हा काशेम उत्तर बांगलादेशात एका शिक्षण संस्थेत शिक्षकाचे काम करतो. पण, त्याच्या कारवाया संशयास्पद वाटल्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. अखेर बांगलादेशात प्रतिबंधित असलेल्या जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या अतिरेकी संघटनेसोबत त्याचे जवळचे संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यावरून त्याला अटक झाली आहे. ढाका येथे गतवर्षी जुलै महिन्यात परराष्ट्रीय मुत्सद्यांच्या निवास संकुलांनजीक असलेल्या एका हॉटेलवर याच प्रतिबंधित अतिरेकी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १७ लोक ठार आणि अनेक जखमी झाले होते. त्या हल्ल्यात काशेम याचा संबंध असल्याचे व प्रमुख सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. बांगलादेशात जन्मलेला कॅनेडियन तामेम चौधरी हा प्रतिबंधित अतिरेकी संघटनेसोबत जुळला होता आणि तामेमसोबत काशेम याचे निकटचे संबंध होते, असेही तपासात निष्पन्न झाले आहे. अशाच एका हल्ल्याचे वेळी पोलिसांकडून तामेम हा गेल्या ऑगस्टमध्ये मारला गेला होता. तेव्हापासून शामेम हा या अतिरेकी संघटनांच्या अन्य म्होरक्यांसोबत संबंध ठेवून होता. पंतप्रधान शेख हसीना यांनी सर्व प्रतिबंधित अतिरेकी संघटनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोलिस आणि सुरक्षा दलांनी ४० संशयितांना ठार मारले होते. गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारल्याचे म्हटले होते. पण, बांगलादेशच्या गुप्तचर विभागाच्या तपासात या हल्ल्यात जेएमबीचा हात असल्याचे म्हटले आहे. अतिरेक्यांनी आतापर्यंत मुक्त विचार व्यक्त करणारे लेखक, ब्लॉगर्स, पत्रकार यांना वेचून ठार मारले होते. शामेमच्या अटकेनंतर बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
पाक, अफगाण, चीन…
मुस्लिम अतिरेकी संघटनांनी केवळ बांगलादेशातच नव्हे, तर अफगाणिस्ता, चीन आणि पाकिस्तानातही आपल्या कारवायांत वाढ केली आहे. यात तालिबान, हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद यांसह अनेक संघटना सामील आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर इसिसच्या हालचाली वाढल्या आहेत. नुकत्याच काबूल येथे झालेल्या हल्ल्यात १४ जणांना प्राणास मुकावे लागले. अफगाणिस्तानचे भारतासोबत सलोख्याचे संबंध हे पाकिस्तानच्या पोटात दुखत आहेत. त्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तानमधील अतिरेकी संघटनांसह तालिबानलाही आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत करीत असल्याचा आरोप अफगाण राष्ट्रपती अब्दुल गनी यांनी केला आहे. त्यात खूप तथ्य आहे. अफगाणमध्ये पकडण्यात आलेल्या अनेक अतिरेक्यांनी हे कबूल केले आहे की, आम्हाला पाकिस्तानकडून मदत मिळत आहे. पण, पाकिस्तानही अतिरेकी हल्ल्यांपासून मुक्त नाही, हे त्याने ओळखले पाहिजे. केवळ हाफीज सईदला नजरबंद करून चालणार नाही, तर त्याच्यावर मानवी हत्यांचा खटला भरून त्याला फाशी दिली पाहिजे. हीच मागणी अमेरिका पाकिस्तानकडे वारंवार करीत आहे. पण, पाकिस्तानने अद्याप तरी त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी रसद कमी झ्राल्यानंतर आता पाकने चीनकडे भिकेची झोळी पसरली आहे. तिकडे चीनच्या सीमासुद्धा सुरक्षित नाहीत. अगदी प्रथमच तेथे झिंझियांग प्रांतातील मुस्लिमांनी चीनविरुद्ध जेहाद छेडला असून, त्यांनी इसिसची मदत मागितली आहे. इसिसने नुकताच अर्ध्या तासाचा व्हिडीओ तयार करून, आता आमची सारी शक्ती आम्ही चीनमध्ये लावू, असा इशारा दिला आहे. एकूणच, दक्षिण आशियातील वातावरण हे अतिरेक्यांच्या सावलीमुळे काळेकुट्‌ट दिसत आहे. या नव्या आव्हानामुळे चीनने त्या भागात दहा हजार सैनिक तैनात केले आहेत. तेथे दाढी वाढविण्यावर आणि महिलांनी बुरखा टाकण्यावर आधीच बंदी घालण्यात आली आहे. इसिसचा इराकमध्ये पाडाव झाल्याच्या बातम्या येत असल्या, तरी एक बाब विसरून चालणार नाही की, इसिसचे स्लीपर सेल्स हे जगभर विखुरले आहेत. अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या हल्ल्यात रासायनिक पदार्थांचा वापर केला गेला आहे. ही बाब लक्षात घेता भारताने आतापासूनच संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी तत्पर असले पाहिजे आणि सदेैव अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे.
बबन वाळके,९८८१७१७८२१