कोद्दोरीत भीषण अग्नितांडव

४ घरे व गोठा जळून खाक

0
70

तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, ४ मार्च
टिपेश्‍वर अभयारण्याजवळ व पैनगंगा नदीच्या सीमेवर असलेल्या कोद्दोरी या गावात झालेल्या अग्नितांडवात चार घरे व गोठा जळून खाक झाल्याची घटना शनिवार, ४ मार्च रोजी घडली.
सुदैवाने या आगीत कुठलीही प्राणहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या आगीत पोचिराम कापडे, पोतुबाई कापडे, विठ्ठल मन्ने व किसन कापडे या चौघांची घरे बेचिराख झाली. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच गजानन कापडे यांचा जनावरांचा गोठा जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच राजेश्‍वर बेजंकीवार व नवनिर्वाचित जिप सदस्य गजानन बेजंकीवार, राजेश पसलावार यांनी तातडीने पांढरकवडा व आदिलाबाद येथील अग्निशमन दलांना पाचारण केले.
तहसीलदार जोरवार, गटविकास अधिकारी घसाळकर आणि पांढरकवड्याचे ठाणेदार गुलाब वाघ यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चारही कुटुंब उघड्यावर पडले आहेत. शासनाकडून त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे.