कत्तलीसाठी जाणार्‍या ८५ गोवंशाची सुटका

0
58

तभा वृत्तसेवा
वणी / पांढरकवडा, ४ मार्च
नागपूरवरून वणीमार्गे चार ट्रकमध्ये गोवंश भरून तेलंगणा येथे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांना प्राप्त झाली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार वणी पोलिसांनी सापळा रचून एक ट्रक पकडला, तर विविध मार्गांनी पळून गेलेल्या इतर ३ ट्रकपैकी २ ट्रकना पांढरकवडा पोलिसांनी पकडले. सोबतच पायदळ नेण्यात येणारी जनावरे पांढरकवडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ताब्यात घेतलेल्या या ८५ जनावरांपैकी ४ जनावरे मृतावस्थेत आढळून आली.
नागपूर, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून तेलंगणाच्या सीमावर्ती भागात यवतमाळ जिल्हामार्गे गोवंशाची तस्करी करण्यात येते. महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे गोवंश तस्कर आडमार्गाचा वापर करतात. यात प्रामुख्याने वणी परिसरातील वरोरा, शिरपूर, कोरपना, पांढरकवडा परिसरातील पाटणबोरी, मुकुटबन व पाटण तर घाटंजी परिसरातील पारवा, गणेरी या आडमार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग केल्या जातो.
वणी पोलिसांनी मागील महिन्यात दोन कारवाया करून कत्तलीसाठी जाणारे गोवंश तस्करांच्या तावडीतून सोडवले होते. पोलिस अधीक्षकांना गोवंश तस्करी करणारी चार वाहने येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने व वणीचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांना सूचना देऊन वरोरा मार्गावरील टी पॉइंटजवळ तातडीने सापळा रचण्यात आला होता.
मध्यरात्री १.३० वाजता वरोरा मार्गावरून संशयित चार ट्रक येताना दिसताच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, चारही ट्रकने रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्‌स तोडून चारही ट्रक सुसाट वेगाने वेगवेगळ्या दिशेने पळाले.
पोलिस प्रशासनाने याबाबत अन्य पोलिस ठाण्यांना तत्काळ माहिती दिली. त्यांचा पाठलाग करून ट्रक क्रमांक एमएच ४० एके ९५४५ याला ताब्यात घेऊन १८ जनावरांनी सुटका केली आणि सुखवणसिंग गज्जरसिंग बाजवा व शेख निसार शेख शब्बीर या दोघांना ताब्यात घेतले.
या चार ट्रकपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ व पांढरकवडा पोलिसांनी दोन ट्रक पकडून त्यात निर्दयतेने कोंबून नेण्यात येणारी ५५ जनावरे ताब्यात घेऊन ७ आरोपींना अटक केली. या ५५ जनावरांपैकी ३ जनावरे मृतावस्थेत आढळून आली. पांढरकवडा पोलिसांनी टोल नाक्याजवळ एमएच १६ एई ७१३० या ट्रकमध्ये कोंबून भरण्यात आलेली २४ जनावरे ताब्यात घेतली. तर सय्यद दाऊद, मोहंमद साबीर, नवसार कुरेशी, रफीक व शफीक सर्व राहणार नागपूर यांना ताब्यात घेतले.
मध्यरात्री १.३० वाजता पाटणबोरी गावाजवळ एमएच ४० वाय८८३४ हा ट्रक संशयास्पदरित्या दिसून आल्याने त्याचा पाठलाग सुरू करण्यात आला. ट्रकचालकाने आपला पाठलाग होत असल्याचे पाहून ट्रक सोडून पळ काढला.
या ट्रकमध्ये १९ जनावरे होती. यापैकी एक जनावर मृतावस्थेत आढळून आले. ही सर्व जनावरे मांडवी येथील गोरक्षणात नेत असताना पोलिसांना आदिलाबादकडे पायदळ नेण्यात येणारी १२ जनावरे आढळून आली. त्यांना नेणारे रमेश जवादे आणि अहमदखॉं उस्मानखॉं या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या वरील सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.