भारत-पाकिस्तान अणुबॉम्ब क्षमता : एक अवलोकन

0
175

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत प्रवेशावर बंदी घालण्यात आलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. त्यामुळेच आता त्यांच्याकडून भारतावर आरोप केले जात आहेत. भारतात जमिनीखाली अण्वस्त्रांना नियंत्रित करणारे न्यूक्लिअर सिटी उभारली जात असल्याचा जावईशोध पाकिस्तानी माध्यमांनी लावला आहे. याशिवाय भारताने मोठ्या संख्येने अणुबॉम्बचा साठा केला आहे. एवढेच नाही तर भारताने आंतरमहाद्वीपीय क्षेपणास्त्र किंवा इंटरकॉन्टिनेंटल मिसाईलचे परीक्षण केले आहे, असेही आरोप केले जात आहेत. हे आरोप म्हणजे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकल्याचे द्योतक आहेत.
न्यूक्लिअर सिटी निर्माण करत असल्याचा शोध
इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज इस्लामाबाद या पाकिस्तानच्या थिंक टँकने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारताकडे ३५६ ते ४०० अणुबॉम्ब असावेत, असा अंदाज वर्तवला आहे, पण अणुशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार भारताकडील अणुबॉम्बची संख्या ही १०० ते १२० मध्ये असावी. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील माध्यमांमध्ये भारताच्या अणुकार्यक्रमाविषयी अनेक आरोप केले जात असल्याचे दिसून आले आहे. भारत हे अण्वस्त्रांना नियंत्रित करणारे शहर किंवा न्यूक्लिअर सिटी जमिनीखाली निर्माण करत असल्याचा जावईशोध पाकिस्तानी माध्यमांनी लावला आहे. याशिवाय भारताने मोठ्या संख्येने अणुबॉम्बचा साठा केला आहे. एवढेच नाही तर भारताने आंतरमहाद्वीपीय क्षेपणास्त्र किंवा इंटरकॉन्टिनेंटल मिसाईलचे परीक्षण केले आहे, असेही आरोप केले जात आहेत. भारतावर पाकिस्तानने केलेले या आरोपांत किती तथ्य आहे आणि ते आत्ताच का केले जात आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. हे आरोप आत्ताच करण्याचे कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली घोषणा. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सात मुस्लिम राष्ट्रांना दहशतवाद पसरवत असल्याचे सांगत त्यांच्यावर आर्थिक निर्बंध आणले आहेत. तसेच अमेरिकेत या देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. पाकिस्तान येत्या काही दिवसांत दहशतवाद पसरवणारे आठवे राष्ट्र म्हणून अमेरिकेकडून घोषित केले जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेला फार मोठा धक्का असेल. दहशतवादाला पाठिंबा देणारे धोरण बदलावे म्हणून अमेरिका पाकिस्तानला प्रचंड आर्थिक मदत करत आहे. त्यामुळेच पाकिस्तान अमेरिकेचे लक्ष आपल्याकडून वळवून पाश्‍चिमात्य जगाचे आवडते विषय असलेले क्षेपणास्त्र, अण्वस्त्र यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतावर बिनबुडाचे आरोप करत आहे.
अमेरिका आणि पाश्‍चिमात्य देशांना अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडतील याची सातत्याने भीती वाटत असते. कोणत्याही देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत याचा अंदाज जगातील एक अणुशास्त्रज्ञांची संस्था करत असते. प्रत्येक वर्षी त्यांचा नवा अंदाज प्रकाशित केला जातो. ही माहिती तथ्यांवर आधारित सर्वाधिक सत्य असेल असे मानले जाते. या शास्त्रज्ञांच्या संघटनेने पाकिस्तानने भारतावर केलेल्या या आरोपांविषयी काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानचे हे आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.
अणुबॉम्बची क्षमता, पल्ला आणि वाहकाची क्षमता
इंटरकॉन्टिन्टेल बलास्टिक मिसाईलचे परीक्षण करण्याचा मुद्दा मात्र बरोबर आहे. भारताने नुकतेच अग्नी-५ या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते. मात्र अणुबॉम्बचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्याचा आरोप निरर्थक आहे. अणुशास्त्रज्ञांच्या संघटनेनुसार पाकिस्तानकडे ११० ते १३० अणुबॉम्ब असावेत. भारताकडे १००-१२० या दरम्यान आहे. पाकिस्तान प्लुटोनियमच्या असलेल्या साठ्याचा वापर करून अजून ३०० अणुबॉम्ब तयार करण्यास सक्षम आहे. भारताकडे ही क्षमता १८० अणुबॉम्ब इतकीच आहे. त्याशिवाय पाकिस्तानमधील प्लुटोनियम तयार करणार्‍या रिऍक्टरची संख्या चार आहे, तर भारतात एक प्लुटोनियम रिऍक्टर आहे. प्रत्येक प्लुटोनियम अणुभट्टीतून प्रत्येक वर्षी पाच अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात. सर्वच आकडेवारीप्रमाणे पाकिस्तानकडील अणूबॉम्बची संख्या ही भारतापेक्षा जास्त आहे.
मात्र भारताने काळजी करण्याची गरज नाही. कारण केवळ अणूबॉम्बची संख्या अधिक म्हणजे क्षमता, शक्ती अधिक असे नसते. अणुबॉम्बचा वापर करताना त्याची क्षमता, पल्ला आणि अणुबॉम्ब वाहकाची क्षमता किती आहे हेसुद्धा महत्त्वाचे असते. सर्वच बाबींमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा अधिक सक्षम आहे. हीच बाब पाकिस्तानला अस्वस्थ करत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नफीस झकारिया यांनाही त्यामुळेच असुरक्षितता वाटत आहे. तसेच पाकिस्तानी माध्यमेदेखील घाबरलेली आहेत. भारतीय उपखंडामध्ये सामरिक संतुलन भारताच्या बाजुने आहे हीच भीती पाकिस्तानला सतावते आहे.
आपला अणुकार्यक्रम हा पाकिस्तानकेंद्रित नाही
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडे हवाई दलाच्या मदतीने शत्रूवर अणुबॉम्ब हल्ला करण्याची क्षमता आहे. मात्र भारताकडील हवाई दल अधिक सक्षम असल्याने ताकद अधिक आहे. पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारतावर अणुहल्ला करू शकतो. मात्र या क्षेपणास्त्रांचा हल्ला हा फक्त उत्तर भारतापर्यंत मर्यादित आहे. दुसरीकडे लांब पल्ल्याचे अग्नी-४ आणि अग्नी-५ चा वापर करून भारत चीनपर्यंत हल्ला करू शकतो. कारण आपला अणुकार्यक्रम हा पाकिस्तानकेंद्रित नाही तर चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकाच वेळी हल्ला केल्यास त्याला तोंड देता यावे या तत्त्वावर आधारित आहे. एवढेच नव्हे तर भारताकडे जहाजावरून डागता येऊ शकणार्‍या क्षेपणास्त्राचे परीक्षणही सध्या सुरू आहे. नौदलाच्या बोटीवरून ब्राह्मोस नावाचे क्षेपणास्त्र डागता येऊ शकेल, अशी क्षमता भारताकडे आहे. पाकिस्तानकडे अजून या प्रकारातील क्षेपणास्त्र नाही. त्याशिवाय पाणबुडीतून अणुबॉम्ब टाकण्याची क्षमताही आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान याबाबत पिछाडीवर आहे. वाहकाची क्षमता आणि अणुबॉम्बचा दर्जा यामध्ये भारत प्रगतिपथावर आहे.
पाकिस्तान अर्थव्यवस्थेलाच सुरुंग
त्यामुळे धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून अधिक अणुबॉम्ब तयार न करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. म्हणून पाकिस्तान आपल्या अणुबॉम्बची संख्या सतत वाढवत आहे. अणुशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार २०२० पर्यंत पाकिस्तान अणुबॉम्ब असणार्‍या देशांमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा देश होईल. मात्र या सर्वांमध्ये विनाकारण पैसा गुंतवून पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लावत आहे. भारतावर सूड उगवण्याच्या वेडाने पाकिस्तानला झपाटले असल्याने देशाची आर्थिक प्रगती कमी करून ते अणुबॉम्बची संख्या वाढवण्यात वेळ घालवत आहेत.
माजी मुख्यमंत्री जुल्फिकार अली भुट्टो यांनी पाकिस्तान वेळप्रसंगी गवत खाईल, पण भारताशी सतत स्पर्धा करत राहील, असे म्हटले होते. याच तत्त्वानुसार पाकिस्तान वागतो आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने भारत पाकिस्तानला जगापासून वेगळा पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. अर्थातच हे खरे आहे. कारण जगातल्या सर्व दहशतवादी घटनांचे उगमस्थान हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान असल्याचे भारत सिद्ध करून दाखवत आहे. दोन्ही देशांतील शांतता चर्चा पुन्हा सुरू व्हायला हव्यात, असे पाकिस्तानकडून सांगितले जाते; मात्र भारताने जोपर्यंत पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादाचे ३०-४० कारखाने बंद होत नाहीत तोपर्यंत शांतता चर्चा सुरू होणार नाही ही स्पष्ट भूमिका घेतली आहे.
भारत सर्वप्रथम अणुबॉम्बचा वापर करणार नाही
पाकिस्तानातील दहशतवादी गोटातून दरवर्षी २ ते अडीच हजार दहशतवादी बाहेर पडताना दिसतात. कुठल्याही क्षणी भारत पाकिस्तान सीमेवरून दहशतवादी भारतात प्रवेश करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत शांतता चर्चा होऊ शकत नाही. भारताचे अणुबॉम्ब वापरण्याचे तत्त्वच मुळी आहे नो फर्स्ट युज असे आहे. म्हणजेच भारत स्वतःहून सर्वप्रथम अणुबॉम्बचा वापर करणार नाही. देशावर दुसर्‍या राष्ट्राने अणुबॉम्बने हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तरादाखल अणुबॉम्बने हल्ला करू शकतो. म्हणून भारताने अणुबॉम्बचे युद्ध करण्याची वेळ आल्यास आपली तीनही सैन्यदले अणुयुद्धासाठी सज्ज केली आहेत. जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातून किंवा समुद्राखालून अशा तीनही प्रकारे भारत नियोजित कार्यक्रमांतर्गत प्रगती करतो आहे. पाकिस्तानच्या अणुबॉम्बपासून रक्षण करण्यासाठी आर्मी ऍडव्हान्स एअर डिफेन्स सज्ज करीत आहोत. त्यामुळे पाकिस्तानकडून येणार्‍या क्षेपणास्त्र किंवा विमाने पाडण्याकरिता एक चांगल्या प्रतीचे हवाई संरक्षण तयार करत आहोत. त्यामुळे पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्र किंवा वाहक विमानावर प्रतिहल्ला करता येईल. अशा प्रकारे काऊंटर बॅलेस्टिक मिसाईल तयार क़रण्यासाठी प्रचंड खर्च येत असल्याने आत्ता फक्त राजधानी दिल्लीला संरक्षण देण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानकडे मात्र अशा प्रकारची कोणतीही तयारी नाही. पाकिस्तानच्या हवाई दलावर आपले सॅटेलाईट्‌स आणि हवाई दल लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हवाईमार्गे पाकिस्तानला भारतावर हल्ला करणे शक्य होणार नाही.
भारताने सामरिक आणि आर्थिक ताकद बळकटीकडे लक्ष द्यावे
गुप्तहेर खात्याच्या एका अहवालानुसार राजस्थानच्या जवळील आंतरराष्ट्रीय सीमेनजीक पाकिस्तानने बंकर आणि तटबंदी बांधायला सुरुवात केली आहे. अर्थात भारताने काळजी करण्याचे कारण नाही. पाकिस्तानची ही संरक्षणदृष्ट्या केलेली तयारी आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत अशा प्रकारचा हल्ला करू शकतो याची पाकला कल्पना आली. सर्जिकल स्ट्राईक काश्मिरातील सीमेवर झाला होता. जिथे दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांविरुद्ध तैनात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सीमेवर सैन्य नसते त्यामुळे तिथे सर्जिकल स्ट्राईक केला तर पाकिस्तानचे मोठेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तान स्वसंरक्षणार्थ नवीन बंकर, चौक्या बनवीत आहे.
चीन पाकिस्तानला कायमच मदतीचा हात देत आला आहे. मौलाना मसूद अजहर याच्यावर बंदी आणण्याकरिता भारत जो दबाव संयुक्त राष्ट्र समितीवर सातत्याने टाकत होता, त्याला चीनने विरोध केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी शांतता चर्चेने दहशतवादाचा मुद्दा सोडवावा, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र चीनच्या दुतोंडीपणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. चीन भारताविरोधात पाकिस्तानचा वापर भविष्यात करू शकतो, हे विसरता येणार नाही. म्हणून आपणही चीनच्या भारतविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. शत्रूचा शत्रू आपला मित्र असे चाणक्याने सांगितले आहे. जपान, व्हिएतनाम, दक्षिणपूर्व आशियातील देश चीनचे शत्रू आहेत. या देशांशी भारताने संबंध बळकट केले आहेतच. शिवाय या राष्ट्रांशी सामरिक संबंधांबरोबर गुप्तहेर संबंधसुद्धा प्रस्थापित केले आहेत. म्हणजेच चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत करतो तसेच आपण व्हिएतनामला मदत करत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन भारताला अडथळा ठरतो आहे. चीनला जशास तसे उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. पाकिस्तानच्या बाष्फळ बडबडीकडे लक्ष न देता भारताने आपल्या सामरिक आणि आर्थिक ताकद बळकट करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून काही वर्षांनी पाकिस्तानला विनाशर्त शांतता करारावर सही करावी लागेल.
ब्रिगेडियर हेमंत महाजन/९०९६७०१२५३