साप्ताहिक राशिभविष्य

0
504

रविवार, ५ ते ११ मार्च २०१७
सप्ताह विशेष
•मंगळवार, ७ मार्च- मलकुजीनाथ महाराज यात्रा- अजंती (दारव्हा); •बुधवार, ८ मार्च- आमलकी एकादशी, संत गुलाबपुरी महाराज पुण्यतिथी- नेरपिंगळाई (अमरावती), जागतिक महिलादिन; •गुरुवार, ९ मार्च- गुरुपुष्यामृत योग (सूर्योदय ते सायंकाळी ५.०९ वाजेपर्यंत), यशवंत महाराज जालनापूरकर पुण्यतिथी- बार्शी; •शुक्रवार, १० मार्च- प्रदोष, सावित्रीबाई फुले स्मृतिदिन; •शनिवार, ११ मार्च- श्री दत्तमहाराज कवीश्‍वर पुण्यतिथी, (पौर्णिमा प्रारंभ रात्री ८.२१)
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- ५ मार्च (सायं. ५ नंतर); बारसे- ९ मार्च; जावळे-९ मार्च; गृहप्रवेश-९ मार्च.

मेष : आर्थिक बलवत्ता लाभेल
या आठवड्यात राशिस्वामी मंगळ आपल्या राशिस्थानी आहे. याशिवाय षष्ठात गुरू, व्ययस्थानात शुक्र, भाग्यात शनी तर रवि-बुध लाभात आहे. बुध १० मार्चला राश्यंतर करून व्ययस्थानात जाईल. चंद्र धनस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पंचमस्थानात येईल. स्वराशीतील मंगळामुळे आपले ग्रहयोग अधिक प्रबळपणे काम करतील. त्यामुळेच आपल्याला आर्थिक आघाडीवर बलवत्ता मिळणार आहे. काही समारंभाचे, मंगल कार्यक्रमाचे आयोजन होईल. त्यासाठी खरेदीचा, तयारीचा उत्साह जाणवेल. उत्सव, मनोरंजनावर खर्च वाढण्याची शक्यता राहील. नातेवाईक-पाहुण्यांची वर्दळ राहील. या सार्‍यात प्रकृती सांभाळावयास हवी. शुभ दिनांक- ५, ६, ११.
वृषभ : स्वप्नपूर्तीचा आनंद मिळणार
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र लाभ स्थानात आहे. त्याच्यावर गुरूची दृष्टी आहे. शुक्र ४ मार्चपासून वक्री होणार आहे. मंगळ व्ययस्थानात आलेला आहे. योगकारक शनी अष्टमात व रवि दशमात आहे. चंद्र आपल्या राशीतून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर चतुर्थातील सुखस्थानात येईल. नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा उत्तम राहील. काही अपेक्षित संधी लाभून आपली स्वप्ने पूर्ण होत असल्याचा आनंद काहींना मिळू शकेल. परीक्षा, स्पर्धांमध्ये चांगले यश मिळवता येईल. राजकीय व सामजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. तरुणवर्गाला विवाहाचे योगदेखील येऊ शकतात. अनुरूप जोडीदार लाभेल. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक- ५, ६, ७.
मिथून : मतभेदाचे प्रसंग टाळावेत
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध भाग्यस्थानी रविसोबत आहे. शनी सप्तमात, तर मंगळ लाभात व शुक्र दशमात आहे. त्याच्यावर गुरूचा पहारा आहे. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पराक्रम स्थानात जाईल. आपला राशीस्वामी बुध १० मार्चला राश्यंतर करून दशमात येईल. या आठवड्यात आपल्या प्रगतिपथातील काही अडचणी अवश्य दूर होऊ शकतील. भाग्यात असलेला राशीस्वामी काही चांगले योग आपल्या वाट्याला देईल व तो दशमात आल्यावर त्यांची पूर्तता होईल. व्यवसाय वाढविता येऊ शकेल. भागीदारीत मात्र सतर्क राहावयास हवे. मतभेदाचे प्रसंग संभवतात. कुटुंबातदेखील काहीसे असमाधानाचे वातावरण राहू शकते. शुभ दिनांक- ६, ७, ८.
कर्क : योजना मार्गी लागतील
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्यात लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो अखेरीस धन स्थानात येईल. याशिवाय शनी षष्ठात व रवि-बुध अष्टमात आहेत. दशमात मंगळ, भाग्यात शुक्र व पराक्रमात गुरू आहे. या आठवड्यात बुध १० मार्चला भाग्यात येईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपणास नवीन उत्तम संधी मिळू शकतील. आपल्या काही योजना मार्गी लावू शकाल. जमीन-जुमल्याचे, शेतजमिनीचे व्यवहार पूर्णत्वास जातील. धार्मिक कार्ये, तीर्थाटन-पर्यटनात सहभागी होऊ शकाल. व्यवसायात चांगला अर्थलाभ व्हावा. या सार्‍या घडामोडींमुळे यश-प्रतिष्ठा लाभेल. प्रकृतीकडे मात्र लक्ष द्यायला हवे. पथ्य सांभाळायला हवे. दगदग, संघर्ष टाळायला हवेत. शुभ दिनांक- ९, १०, ११.
सिंह : जिद्दीने अडथळ्यांचा सामना
या आठवड्यात राशिस्वामी रवि सप्तम स्थानातून आपणास अनुकूल योग देत आहे. याशिवाय राशीस्थानी राहू, धनात गुरू, पंचमात शनि, भाग्यात मंगळ व शुक्र अष्टम स्थानात आहेत. येत्या १० तारखेला बुध राश्यंतर करून भाग्य स्थानात जाईल. चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो आपल्याच राशीत जाईल. या आठवड्यात आपल्याला ग्रहांची उत्तम अनुकूलता लाभलेली आहे. त्यामुळे काही अडचणी, अडथळे आले तरी आपण जिद्दीने त्यांना तोंड देऊन आपले उद्दिष्ट गाठू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. जुने आजारपण वा काही त्रास असलेल्यांनी हयगय करू नये. कुटुंबातील वातावरण सांभाळावे लागू शकते.
शुभ दिनांक- ५, ७, ११.
कन्या : व्यवसायात प्रगती व्हावी
या आठवड्यात राशिस्वामी बुध षष्ठात रविसोबत आहे. याशिवाय सप्तमात शुक्र, अष्टमात मंगळ, सुखस्थानात शनि व राशीस्थानात गुरू आहे. बुध १० तारखेला राश्यंतर करून सप्तम स्थानात येईल. चंद्र भाग्यस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर व्ययस्थानात जाईल. गुरूच्या आपल्या राशीमधील वास्तव्यामुळे आपणास सारे शुभत्व प्राप्त होत आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती व्हावी, नवी जबाबदारी, अधिकार मिळावा. उद्दिष्टपूर्तीमुळे अधिकारीवर्गाची मर्जी संपादन करू शकाल. अष्टमस्थानातील मंगळामुळे प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहने सांभाळून चालवावीत. युवा मुलामुलींना विवाहाच्या संबंधाने चांगले योग यावेत.
शुभ दिनांक- ५, ७, ९.
तूळ : सौजन्याने वागावे लागेल
या आठवड्यात राशिस्वामी शुक्र षष्ठात गुरूच्या दृष्टीत आहे, तर धनेश मंगळाने आपला मुक्काम सप्तमात हलवला आहे. याशिवाय शनि पराक्रमात तर रवि-बुध पंचमात आहेत. बुधदेखील १० तारखेला राश्यंतर करून षष्ठात जाईल. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभ स्थानात जाईल. सप्तम स्थानात आलेला मंगळ या आठवड्यात आपल्या स्वभावात जरा उग्रता निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास कुटुंबात, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी सौजन्याने वागावे लागेल. कुणाचे मन दुखणार नाही याचे भान ठेवून वागलात तर आपल्या आकांक्षाची पूर्तता फारशी दूर नाही. वाईट संगत टाळा. संततीची काळजी घ्या.
शुभ दिनांक- ७, ८, ११.
वृश्‍चिक : संपन्न जीवनाचा अनुभव
या आठवड्यात राशिस्वामी मंगळ षष्ठात आलेला आहे. याशिवाय शनी धनस्थानी तर रवि-बुध सुखस्थानात आहेत. गुरू लाभात व शुक्र पंचमात आहे. १० तारखेला लाभेश बुधदेखील पंचमात येईल. चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर दशम स्थानी जाणार आहे. गुरू व शुक्राची अनुकूलता आपल्याला संपन्न जीवनाचा अनुभव देऊ शकते. आपण पूर्वी उपसलेल्या कष्टाची फळे आता मिळावयास सुरुवात होईल. व्यवसायात जरा संघर्ष जाणवेल, मात्र अंतिमतः यश आपलेच असणार आहे. कुटुंबातून उत्तम सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जाणकारांचा न विसरता सल्ला घ्या. संततीच्या भवितव्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक- ५, ९, १०.
धनू : संधीसाधू लोकांचा उपद्रव
या आठवड्यात राशिस्वामी गुरू दशमात असून शनी राशिस्थानी आहे. मंगळ पंचमात तर शुक्र सुखस्थानात आहे. बुध-रवि पराक्रमात आहेत. त्यातील बुध १० तारखेला राश्यंतर करून सुखस्थानात येईल. चंद्र षष्ठ स्थानातून भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर भाग्य स्थानात जाणार आहे. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी या आठवड्यात घडू शकतात, मात्र त्यात प्रथमदर्शनी आपल्या वाट्याला यश आलेले नसेल. शत्रुवर्ग किंवा संधीसाधू लोकांचा उपद्रव वाढेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या प्रतिमेला फारसा धक्का बसणार नसला तरी विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हवेच. मित्रांची साथ मिळेल. विवाहादी योग संभवतात. शुभ दिनांक- ६, ७, ८.
मकर : उत्तम आर्थिक स्थिती
या आठवड्यात राशिस्वामी शनी व्ययस्थानात आहे. गुरूच्या शुभदृष्टीचे आपल्या राशीला बळ लाभलेले आहे. याशिवाय रवि-बुध धनात आहेत. शुक्र पराक्रमात व मंगळ सुखस्थानात आहे. अष्टमात राहू आहे. बुध १० तारखेच्या राश्यंतरानंतर पराक्रमात जाईल. चंद्र पंचम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर अष्टम स्थानी जाणार आहे. राशीस्वामी हाच धनेश असून तो धनस्थानाला बळ देत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग येतील. या सार्‍यांमुळे आपले मनोबल व उत्साह, कामाची चिकाटी टिकून राहील. त्याचा लाभही मिळेल. साहित्यिकांना अपेक्षित संधी मिळू शकतात. घरात मंगलकार्यासंबंधात हालचाली संभवतात.
शुभ दिनांक- ५, ८, ९.
कुंभ : आकस्मिक अर्थलाभ संभव
या आठवड्यात राशिस्वामी शनि लाभस्थानात असून राशीत रवि, बुध व केतू आहेत. गुरू अष्टमात, शुक्र धनस्थानात व मंगळ पराक्रमात आहे. राशीतला बुध १० तारखेला राश्यंतर करून धनस्थानी येईल. चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो सप्तम स्थानी जाईल. अष्टमातल्या गुरूची धनस्थानावर दृष्टी आहे. राशीस्वामी शनीही राशीला बळ देताये. यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. काही आकस्मिक अर्थलाभही घडून येऊ शकतो. नोकरीत अधिकार-जबाबदारी वाढू शकते. प्रवासाचे योग येतील मात्र त्यात नुकसान वा फसवणूक होऊ नये यासाठी सतर्क राहावयास हवे. जुनी दुखणी असल्यास काळजी घ्या. त्रास संभवतो. शुभ दिनांक- ५, ८, ११.
मीन : अडचणीतून मार्ग निघेल
या आठवड्यात राशिस्वामी गुरू सप्तम स्थानात असून राशिस्थानी शुक्र आहे. याशिवाय धनस्थानात मंगळ, शनि दशमात, तर रवि-बुध व्ययात आहेत. बुध १० तारखेला राश्यंतर करून आपल्या राशीत येणार आहे. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवड्याच्या शेवटी षष्ठ स्थानात जाणार आहे. सप्तमातून गुरूची राशीवर शुभदृष्टी येत आहे. त्यामुळे अडचणी आल्या तरी आपल्या व्यावसायिक जबाबदारी पूर्ण करता येऊ शकतील. कलावंतांसाठी उत्कृष्ट सप्ताह ठरावा. स्पर्धेत यश मिळेल. नवीन ओळखी किंवा अधिक सलगी करणार्‍यांवर विसंबून राहू नका. कौटुंबिक सहकार्य चांगले मिळेल, मात्र कटू बोलण्यातून गैरसमज निर्माण होण्याचा धोका आहे. शुभ दिनांक- ८, ९, १०.