फिरून पुन्हा

0
159

शुद्धी बेशुद्धीच्या अर्धवट अवस्थेत, कानावर हॉस्पिटलमधल्या सिस्टरचे शब्द पडत होते. कुणाला तरी सिस्टर म्हणत होती, ‘‘पहिला मुलगा आहे नं यांना? मुलगी झाली बरं का आता! छान आहे हं, अगदी बाहुलीसारखी!’’
हळूहळू ऍनस्थेशिया उतरत होता, तशी मी वास्तवात येऊ लागले. सलाईनचा हात, पोटावरच्या टाक्यांखालची जखम सारं जाणवायला लागलं. ओल्या जखमेची वेदना शरीरभर पसरली. मात्र सिस्टरच्या बोलण्याची तशातही मेंदूने दखल घेतली. मी हाक मारली,
‘‘सिस्टर, मला बघू मुलगी…’’
सिस्टरने मऊ सुती दुपट्ट्यात गुंडाळलेली इवलीशी परी माझ्याजवळ आणली. मी सार्‍या वेदना विसरून मान कलती करून चेहरा तिच्याजवळ नेला आणि विस्मयाने बघतच राहिले. गोरीपान, डोक्यावर भरपूर आणि सोनेरी कुरळे केस, किंचित अपरं नाक, उजव्या गालावर हलकीशी खळी आणि डाव्या गालावर कानाच्या जवळ लागून तीच बदामाच्या आकाराची गडद तपकिरी रंगाची जन्मखूण आणि स्पर्श कापसाहूनही मऊ. मी उजव्या हाताची तर्जनी तिच्या गालावरच्या जन्मखुणेवर ठेवली. डोळ्यांच्या फटीतून त्यांचा आकाशी निळसर रंग माझ्या नजरेस पडला. तिथेच असलेल्या आईकडे मी नजर टाकली आणि थकून डोळे मिटून घेतले. आईने सिस्टरच्या हातून बाळाला घेतले आणि म्हणाली, ‘‘झोप गं तू राधा, आराम होईल जरा, मी बघते हिला.’’
डोळे तर मी मिटून घेतले, पण नजरेसमोरून ते इवलंसं रूपडं हलेचना मुळी! माझ्या मनातले भाव आईने ओळखले असतील का? सोनेरी कुरळे केस, निळसर डोळे, गालावर खळी आणि डाव्या गालावरची बदामाच्या आकाराची ती जन्मखूण? अस्वस्थ विचारांनी की इतर औषधाच्या परिणामाने कुणास ठाऊक ग्लानी आल्यागत मला झोप लागली. औषधं, स्पिरीटचा उग्रदर्प नाकातून थेट मेंदूला तरीही जाणवत होता.
दवाखान्यात रोज सोहम् मोठा मुलगा ऐटीत यांचं बोट धरून त्याच्या इवल्याशा बहिणीला भेटायला यायचा. त्याला त्याची इटुकली पिटुकली परीसारखी सुंदर बहीण खूप आवडली. हे पण एक-दोनदा म्हणाले, ‘‘कशी राजकन्येसारखी दिसते नाही? परदेशात जास्त शोभून दिसली असती.’’ मी आईकडे बघायचे, आई मात्र पटकन नजर फिरवून घ्यायची किंवा तिथून निघून जायची. मला मात्र कधी तरी म्हणायची,
‘‘तू राधा जास्त विचार नको हं करूस, उगाच! शांत रहा.’’
मी शांतच होते, पण मनात अनंत विचारांची साखळी तयार होत होती. बाळाला जवळ घेतलं की, मी हमखास तिच्या डाव्या गालावरच्या बदामी आकाराच्या जन्मखुणेवर हलकेच ओठ टेकवायचे.
पाच-सहा दिवसांनी घरी आले. आई दोन महिने थांबणार होती. तशी मी निश्‍चिंत होते. सोहम् आजीसोबत रुळला होता आणि बहिणीवर प्रचंड खुश होता. सर्वांच्या आवडीनुसार ‘परी’ नाव ठेवून बाळाचं बारसं झालं. परीच्या लोभस रूपड्यावर सारे घरदार लट्टू होते. बाळंतपण संपवून आईला पण परत जाण्याचे वेध लागले. ती परत जाण्याआधी मनातली गोष्ट मला आईशी बोलायचीच होती. आई मला दरवेळी गप्प करत होती.
शेवटी एक दिवस जबरदस्ती मी आईला माझं बोलणं ऐकायलाच लावलं. त्यावर तिचं काय मत आहे तेही विचारलं. त्यानंतर मला हायसं वाटलं. माझ्या मनात घेरून राहिलेली गोष्ट, प्रकर्षाने तिलाही जाणवली हे मुख्य महत्त्वाचं होतं. आठ एक दिवसांनी आई परत गेली.
आता रोजची कामं, यांची ऑफिसच्या घाईमुळे होणारी धांदल, सोहम्‌ची शाळा आणि खेळाची सारी गडबड आणि बाकी सारा वेळ परीच्या भोवती, या सार्‍या भानगडीत मला दिवस पुरेना! मला स्वत:ला तर जणू अस्तित्वच नव्हतं. जराही स्वत:कडे बघायला सवड होईना, पण मी खुश होते माझ्या संसारात. परी आणि सोहम्‌भोवती माझं सारं विश्‍व बांधलं होतं. उरला वेळ यांच्याशी गप्पाटप्पा, अनंत विषयांवर चर्चा, कधी सहकुटुंब जवळच सहलीला, मजेत दिवस चालले होते.
मात्र अधूनमधून त्या एका विचाराने मी अस्वस्थ व्हायचे. परीला घट्ट जवळ धरायचे. आंघोळ करून परीला आणलं की, तिचं अंग पुसताना वा एरवीही तयार करताना तिच्या त्या गालावरच्या जन्मखुणेवर आवर्जून ओठ टेकवत होते. हळूहळू तो बदामाचा आकार गडद होत होता. मी वारंवार तिच्या सोनेरी कुरळ्या केसातून हात फिरवायचे, मस्तकाचं अवघ्राण करायचे.
परी हळूहळू रांगू लागली, पावलं टाकू लागली. पहिला वाढदिवस दणक्यात साजरा केला. फ्लॅट स्कीममध्ये आजूबाजूच्या सर्वांची परी लाडकी बनली होती. चार वर्षांचा सोहम् पण तिच्या कायम सोबत असायचा, तिची काळजी त्याच्यापरी घ्यायचा. कौतुकात परी वाढत होती. होता होता परी दोन वर्षांची झालीसुद्धा.
एक दिवस मी जरा घरात कामात होते. सोहम् इतक्यात परीला छान सांभाळून घ्यायचा. मीही जरा मोकळी होऊ शकत होते. सोहम् त्याच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींसोबत परीला गार्डनमध्ये घेऊन गेला होता. घसरगुंडी, झोका, चक्री, सी-सॉ असं थोडं थोडं सगळं खेळवून झालं. थकून भागून सोहम् परीला घरी घेऊन आला. सोबत अर्थात समोरच राहणारी ताई होती.
मी परीला तिच्याकडून घेतलं. ताई टाटा करून घरी गेली. मी सोहम् आणि परीला घेऊन घरात आले. दोघांची जेवणं करताना सोहम्‌ची अखंड काही तरी बडबड चालू होती. गार्डनमध्ये काय काय खेळलो, कोण रडलं, कोण पडलं, कोण कोणाशी भांडलं वगैरे. मी पण लक्ष देऊन ऐकत होते. परी आपल्या मोठ्या निळ्या डोळ्यांनी रोखून कधी दादाकडे तर कधी माझ्याकडे बघत होती. मध्येच सोहम् म्हणाला, ‘‘आई, परी किनई चक्रीवर बसायला घाबरते. चक्री गोल फिरायला लागली की ही मोठ्याने रडायला लागते. मग ताईने हिला उतरवून घेतले, मघाशी माहिताये?’’
क्षणभर माझ्या मनात नाही तो विचार येऊनच गेला. तरी मी सोहम्ला म्हणाले,
‘‘सोहम्, ती घाबरत असेल तर नाही हं तिला चक्रीवर बसवायचं! लहान आहे नं अजून आपली परी?’’
‘‘अगं पण आई, बाकी पण सगळे लहान मुलं बसतात नं चक्रीवर? किती झूऽम जोरात फिरतात!’’
‘‘अरे पण सोहम्, वाटते एखाद्याला भीती! उगाच मागे नाही हं लागायचं. दादा आहेस नं तू तिचा?’’
‘‘बरं आई, नाही लागणार गं मी तिच्यामागे.’’
असं म्हणून सोहम् परीला घेऊन बेडरूमकडे निघाला. माझ्या मनातून काही विचार जाईना. रात्री जेवतानासुद्धा मी त्याच तंद्रीमध्ये होते. हे म्हणालेसुद्धा.
‘‘अगं काय, लक्ष कुठे आहे आज तुझं? कशाचा विचार सुरू आहे एवढा?’’
‘‘अहो काही नाही, असंच आपलं!’’
मी मग जबरदस्ती इकड तिकडचं बोलत राहिले, यांना काही जाणवू नाही म्हणून! रात्री विचाराविचारात किती वेळ झोप आली नाही. दोन-तीनदा उठून पाणी प्यायचे, मध्येच एक ऍण्टासिड घेतली, परीच्या केसातून हात फिरवत राहिले, माझ्या लाडक्या त्या जन्मखुणेवर ओठ टेकवले. शेवटी केव्हा तरी थकून भागून झोप लागली.
सकाळी झोपून उठले. सोहम्‌ची शाळेची तयारी, डबा, यांचा ऑफिसचा डबा, दोघांचं घरातून जाणं झालं. मी मग्गाभर कॉफी आणि पेपर घेऊन फुरसतीत ऐसपैस बसले. आता अर्धा पाऊण तास माझा हक्काचा होता. परीला उठायला अजून तसा अवकाश होता. कॉफी पिता पिता पुन्हा रात्रीचा विचार मेंदू पोखरायला लागला. पेपर तसाच ठेवून मी घोट घोट कॉफी घेत विचार करत राहिले. तेवढ्यात परीची चाहूल लागली. मग तिचं सगळं आवरून झालं. बाईसाहेब खेळण्यांमध्ये रमल्या.
मी आईला कॉल लावला. आईला पण सवड होती. आधी बर्‍याच इतर गप्पागोष्टी करत मी शेवटी कालचा विषय काढला. मी प्रचंड अस्वस्थ झाले होते. आईनेही माझी बेचैनी समजून घेत माझी समजूत घातली.
‘‘आई परीचं सही न् सही रूप तस्सच आहे नं! आणि ती बदामाची जन्मखूण?’’
‘‘अगं राधा, नको अशी अस्वस्थ होऊस. कदाचित आपल्याच मनात असेल म्हणून आपल्याला तसं वाटतंय. कदाचित तसं काही नसेलही.’’
‘‘हो गं आई, पण मनात मात्र राहून राहून तोच विचार घर करून बसलाय. बरं काही बोलताही येत नाही. यांनाही काही माहिती नाही, पण मी काहीतरी कारणाने बेचैन आहे, हे समजतंय त्यांना!’’
‘‘राधा एवढी काळजी नको गं करूस आणि समज असेलच काही तसं तर सांगू आपण एकदा समजावून! आलं न लक्षात? परी राणी कशी आहे? काळजी घे. मी जमलं तर येईनच तिच्या वाढदिवसाला.’’
‘‘हो आई खरंच ये तू. मलाही बदल होईल जरा. परी मस्त मजेत आहे. ये गं तू खरंच! चल ठेवते मी आता…’’
आईशी बोलून झाल्यावर जरा बर्‍यापैकी हलकं वाटलं मला. पुढच्याच महिन्यात परीचा वाढदिवस होता. परीचे सोनेरी कुरळे केस चांगले खांद्यापर्यंत रुळायला लागले होते. गाल गुबरे झाले होते. एका गालावरची खळी आणि दुसर्‍या गालावरची गडद होत चाललेली बदामाच्या आकाराची जन्मखूण तिच्या चेहर्‍यावरचं सौंदर्य वाढविण्यात मदत करत होत्या. भरीला निळेला डोळे तिचं ‘परी’ नाव सार्थ करत होते. इतरांचं सोडा, माझीच माझ्या लेकीला दृष्ट लागेल की काय अशी मला भीती वाटायला लागली. मी सतत अधूनमधून तिची दृष्ट काढायला लागले. तिच्या गालावरच्या माझ्या लाडक्या बदामाच्या आकाराच्या जन्मखुणेवर आवर्जून ओठ टेकवत होते. केवढी प्रचंड खळबळ मनात साठवली होती मी माझ्या?
दिवस समोर समोर सरकत होते, अगदी झपाट्याने. तसं बघता रोजचं आयुष्य सुखासुखी चालू होतं, काही खाचखळगे, खड्डे, अडचणी वाटेला न येता सुरळीत संसार चालू होता. फक्त माझ्याच मनाला एक बोच होती जी माझी मलाच फक्त माहिती होती. आईला अंदाज असून काय उपयोग? ती किती तरी दूर?
शेवटी परीच्या वाढदिवसाचा महिना उजाडला. माझ्याच आग्रहावरून आई आठ दिवस आधी आली. माझा जीव अक्षरश: भांड्यात पडला. मनातून त्या भावनेची तीव्रता किंचित कमी झाली.
गप्पांना वेगळे विषय मिळाले. सोहम् आणि परीसुद्धा आजीच्या मागे-पुढे राहू लागले. वाढदिवसाच्या गप्पा रंगू लागल्या. वेगवेगळे मेनू ठरवत एकदाचा एक मेनू पक्का ठरला. गिटारच्या आकाराची मोठी केक ऑर्डर करून झाली. आदल्या दिवशी सोहम् आणि परी आजीसोबत गार्डनमध्ये खेळायला गेले. मी दुसर्‍या दिवशीची थोडी तयारी करायला घेतली. सकाळी घरातल्या घरात सत्यनारायण करायचा होता. हे बाहेरचं काही सामान आणायला गेले होते.
तासाभरात सोहम् आणि परी हासत खिदळत आजीसोबत घरी आले. आता सगळं विश्‍व आजीचं असल्यामुळे जेवायलाही आजीच हवी होती. सोहम् अन् परीची काही ना काही बडबड चालू होती. एवढ्यात सोहम् धावत माझ्याकडे आला अन् मला ओरडून सांगायला लागला,
‘‘अगं आई, आज माहिती आहे, परी चक्रीवर बसली आणि झूऽऽम गरगर चक्री फिरली…’’
त्याचं वाक्य अर्ध्यात तोडत मी जरा मोठ्यानेच त्याला रागावले.
‘‘सोहम्… का बसवलंस तू तिला चक्रीवर? तुला माहिती आहे नं ती घाबरते म्हणून? मी तुला मागेच नाही म्हणून सांगितलं होतं नं? आई, तू तरी का बसू दिलंस गं तिला? काही करता काही झालं तर?’’ शेवटी आईच म्हणाली,
‘‘राधा, अगं जरा ऐकशील का थोडं? की तूच फक्त बोलत राहशील? परी आज चक्रीवर बसली, पण सांगू का जराही घाबरली नाही. छान आनंदात होती. हसत होती. टाळ्या वाजवीत होती. भीती तुझ्या मनात आहे, ती तू आधी काढून टाक. उगाच त्या एवढ्याशा लेकराला रागावते आहेस. खरंच नको अशी काळजी करूस सारखी.’’
माझं कदाचित तात्पुरतं समाधान झालं असावं. मी सोहम्ला जवळ घेतलं. त्याच्या केसातून हात फिरवला, ‘‘सॉरी बेटा’’ म्हणत पप्पी घेतली आणि म्हटलं ‘‘जा आता आजी छान गोष्ट सांगेल, मग झोपून जा. उद्या लवकर उठायचं बरं का!’’
परीला जवळ घेत लाडावलं, नेहमीप्रमाणे तिला घट्ट जवळ ओढून धरलं आणि गालावरच्या त्या बदामावर अलगद ओठ टेकले. तिलाही आजीच्या हवाली करून मी उरलेली कामं घाईने आवरायला घेतली.
रात्री बराच वेळ आई आणि मी गप्पा मारत बसलो होतो. परीचाच विषय मुख्य होता बोलण्यात, पण आता माझी चिंता किंचित कमी होणार असं वाटत होतं.
दुसर्‍या दिवशी सकाळी घाईनेच सार्‍यांना उठवलं. परीसोबत सोहम्ला पण औक्षवाण झालं, आंघोळी, नाश्तापाणी आवरलं. आईने सत्यनारायणाचा प्रसाद भाजायला घेतला. बाकी तयारी होईस्तोवर गुरुजी आले. यथासांग पूजा पार पडली. परीसाठी खास पुरणपोळीचा बेत आजीने केला होता.
गोरी गुबरी परी आज दृष्ट लागण्यालायकच दिसत होती. फिक्का गुलाबी आणि पांढरा फ्रिलचा फ्रॉक, सोनेरी कुरळ्या केसांवर गुलाबी रंगाचा बो, गळ्यात पांढर्‍या शुभ्र मोत्यांचा सर, गालाला खळी पाडत गोड हसणं आणि किंचित बोबडं लाघवी बोलणं, निळ्या डोळ्यांची मजेशीर उघडझाप. ‘‘आज नक्की दृष्ट काढायलाच हवी हिची,’’ असं पुटपुटतच मी जेवणाची तयारी करायला घेतली.
सोहम् अन् परीची बडबड सुरू होती. आमच्या गप्पाटप्पा, संध्याकाळची काय तयारी व्हायचीय त्याचा आढावा घेता घेता छान जेवणं आवरली.
सोहम् आणि परी हॉलमध्ये खेळण्यात रमले.
आईची मागची आवरासावर सुरू होती.
हे पण हॉलमध्येच टीव्हीवर मॅच बघत होते.
मी माझी कामं उरकून संध्याकाळची नेसण्याची साडी, मुलांचे कपडे वगैरे काढून ठेवत समोर येऊन बसले.
आईचही आवरून झालं. तीही समोर आली अन् निवांत बसली, कौतुकाने नातवंडांचा खेळ बघत!
मी पण आतापर्यंतचं सारं चांगलं पार पडल्याच्या समाधानात संध्याकाळच्या समारंभाचा विचार करत होते. जरा तंद्रीतच होते. हे यांच्या मॅचमध्ये अन् आईला थकून बसल्या बसल्याच डुलकी लागली होती.
एकाएकी सोहम् अन् परीचा मोठमोठ्याने आवाज आला. परी जोरजोरात हसत होती आणि सोहम् तिच्या दोन्ही बगलेतून हातानी पक्की धरून गोल गोल फिरवीत होता. तोंडाने सुरू होतं ‘‘गोल गोल राणी, गोल गोल राणी इत इत पाणी…’’
माझ्या ते नजरेस पडलं. मी केवढ्यांदा तरी किंचाळले ‘‘आईऽऽ आईऽऽ सोहम् नाहीऽऽऽ , नको ऽऽ नकोऽऽ नाहीऽऽ’’
कुणाच्या काही लक्षात यायच्या आत मी धाडकन् खाली पडले.
जरा वेळाने शुद्धीवर आले तेव्हा मी खोलीत पलंगावर होते.
आई उशाशी, माझ्या कपाळावर हात ठेवून बसली होती.
दोन्ही मुलांना आईने युक्तीने झोपवले होते.
हे बाजूलाच खुर्चीवर सचिंत चेहर्‍याने बसले होते.
हळूहळू मी डोळे उघडते आहेसं बघून यांनी थंडगार पाणी भरून ग्लास माझ्या तोंडाला लावला. मी एका दमात सारं पाणी संपवलं. जशी जन्मोजन्मी पाणी प्यायले नव्हते.
‘‘राधा काय झालं तुला एकाएकी? तुला जास्त थकवा आलाय का? आणि तू सोहम्ला का बरं नाही म्हणत होतीस? असे तर खेळ सगळेच लहानपणी खेळतच असतात, त्यात काय एवढं?’’
यांनी असं म्हणताच मी आईकडे नजर टाकली. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. आई म्हणाली,
‘‘थांब राधा, आज मीच सांगते सगळं त्यांना, पण थोडक्यात. संध्याकाळी परत कार्यक्रम आहे आपल्याकडे.’’ आई यांना सांगू लागली.
‘‘राधा अशीच होती लहान. साधारण सोहम्‌च्या वयाची.
राधाची एक लहान बहीण होती, परीच्याच वयाची.
राधाला पण आपल्या लहान बहिणीचं फार प्रेम होतं.
मीरा नाव होतं तिचं.
राधा छान सांभाळायची मीराला.
अनेक प्रकारे खेळवायची तिला.
एक दिवस असेच सारे खेळ झाले.
राधाने मीराला असंच उचलून घेतलं होतं.
‘गोल गोल राणी, इतं इतं पाणी…’ म्हणत राधा मीराला वेगाने गोल फिरवीत होती. मीराही जोरजोरात खिदळत होती.
आणि अचानक? मीराला धरलेले राधाचे हात सुटले.
पकड सैल झाली आणि मीरा राधाच्या हातून सटकली.
पलीकडच्या भिंतीवर तिचं डोकं आपटलं.
रक्ताचं थारोळं साचलं. मीरा तर बेशुद्ध झाली.
पण घाबरून राधा जोरजोरात रडायला लागली.
मीराला दवाखान्यात नेलं. ब्रेन हॅमरेज झालं होतं.
दोन दिवसांत मीराने जगाचा निरोप घेतला.
राधा त्यानंतर कित्येक दिवस हसत बोलत नव्हती. आमची अवस्था त्याहून वाईट होती.
ती मुलगी तशी गेली, ही अशी होऊन बसली, सुन्न.
राधाची समजूत पटण्यास फार काळ लागेल वाटलं.
हळूहळू राधा सावरली. आम्ही स्थिरावलो.
आतापर्यंत सारं ठीक होतं.
परीचा जन्म झाला. आम्हा दोघांनाही पहिल्याच बघण्यात लक्षात आलं, परी हुबेहूब दुसरी मीराच.
तोच रंग, तेच निळे डोळे, तेच सोनेरी कुरळे केस, उजव्या गालावरची ती खळी आणि मुख्य डाव्या गालावरची ती बदामाच्या आकाराची गडद तपकिरी जन्मखूण. परी झाल्यापासून आमच्या मनात येत होतं,
मीराच पुन्हा परीच्या रूपात जन्माला आली.
आजच्या प्रसंगाने कदाचित पुन्हा तो जुना प्रसंग राधाच्या मनात ताजा झाला नव्हे, माझ्याही मनात येऊन गेलं, पण आपण समजून घेऊन तिला यातून बाहेर काढू.’’ आई चहा ठेवायला म्हणून उठली. उठता उठता मलाही म्हणाली, ‘‘ऊठ राधा आता, मुलांनाही उठव आणि तयारी करा आता! मी चहा आणि दुधाचं बघते आता.’’
मीही उठले, थोडी हलकी झाले होते आता यांना सारं सांगितल्यामुळे! यांनी हात धरून मला थांबवलं, म्हणाले,
‘‘राधा, एवढं काय असं? घडतात आयुष्यात कधी अशाही गोष्टी. घडवणाराही तो आणि सावरणाराही तोच तो वर बसलाय बघत. येऊ देत नं मीरा परत जन्माला. उरलेलं बहिणीचंही प्रेम कर तिच्यावर आणि मुलगी तर आपली आहेच ती, हो नं?’’
मी यांचा हात घट्ट धरला, हलकेच ओठ टेकवले आणि मुलांना उठवायला गेले.
परीला परी राणीसारखच तयार केलं. तिच्या निळ्या डोळ्यांना शोभेलसा निळा फ्रॉक, तसलाच निळा बो, निळे शूज. आधी तर आईला तिची दृष्ट काढायला लावली. चांगलं दणक्यात वाढदिवस साजरा झाला. प्रेझेंट्‌स तर किती तरी? दोन्ही मुलं प्रचंड खुश होती.
आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो पुन्हा गप्पा मारत. सोहम् व परी त्यांच्या नवीन खेळण्यांमध्ये खुश होते. मध्येच काय झालं कुणाच ठाऊक?
अचानक परी उड्या मारत माझ्याकडे आली, दोन्ही हात वर करून म्हणाली,
‘‘आई गं, मला गोल गोल राणी फिरव नं, मज्जा येते.’’
मी आईकडे बघितलं, ह्यांचाकडे नजर टाकली. ह्यांनी नजरेनेच आश्‍वस्त केलं, मानेने खुणावलं. तळवे थोडे घामेजले, पण मी निश्‍चयाने पुढे झाले.
परीला उचलले, छातीशी घट्ट धरत हळूहळू गोल फिरवू लागले. थोडी गती वाढवत म्हणायला लागले,
‘‘गोल गोल राणी, इतं इतं पाणी…’’
सोहम् पण टाळ्या वाजवत माझ्यासोबत गोल फिरत गाऊ लागला. आईच्या चेहर्‍यावर समाधान होतं.
ह्यांच्या चेहर्‍यावर रुंद हास्य आणि नजरेत माझं कौतुक, प्रेम दाटलं होतं आणि माझ्या मनात? मला माझी मीरासुद्धा परत मिळाल्याचं समाधान होतं. मी परीला जवळ ओढून घेत तिच्या डाव्या गालावरच्या लालसर काळ्या बदामाच्या जन्मखुणेवर अलगद ओठ टेकत डोळे मिटून घेतले.
मीनाक्षी मोहरील/ ९९२३०२०३३४