विकास रथ

0
76

नुकताच अंदमानहून परतलो. द्वीपकल्पात काही लक्षणीय बदल दिसून आले. आपल्याकडचा आजवरचा अनुभव हा बराचसा विकासाच्या केवळ कोर्‍या गप्पा ऐकण्याचा होता. प्रत्यक्षात मात्र मोहोरीइतके काम करून भोपळ्याइतके केले असे बघणेच नशिबी होते. ओडिशातील कोणार्क मंदिराच्या डागडुजीसाठी वाजपेयी सरकारने चाळीस सहस्रकोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर ती देण्यात आली. असा विसकाचा रथ चालू असतो. मोदी सरकार अनेक चांगल्या गोष्टी करीत आहे. विरोधकांना त्या दिसत नाहीत अथवा पाहायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. लहानसहान खुसपटे काढीत सातत्याने टीका करीत राहणे एवढेच त्यांचे काम आहे.
अंदमान द्वीपसमूहाला उत्तम सागरी किनारा मिळाला आहे. सर्व बेटे नयनरम्य आहेत. अशा वेळी पर्यटनाला अधिक चालना मिळायला हवी होती. त्यासाठी पूर्वीच्या केंद्र सरकारने ‘हनीमूनर्स प्लेस’ म्हणून त्याची जाहिरात केली. खरेतर सेल्युलर जेल ‘डार्क टुरिझम’ म्हणून जाहिरात होणे आवश्यक होते. हॅवलॉक व नील बेटांची ‘मधुचंद्र बेटे’ म्हणून जाहिरात केली असती तरी चालले असते. यामुळे काही काळ लोकांचा ओघ वाढला, तथापि विमान कंपन्यांच्या भरमसाठ भाड्यामुळे तो स्थिरावला. त्यातून मर्यादित उड्डाणे होती. गेल्या चार महिन्यांपासून उड्डाणे वाढली आणि भाड्यामध्ये लक्षणीय घट झाली. अन्यथा दिल्लीहून पोर्टब्लेयरला येण्यापेक्षा विदेशात जाणे स्वस्त होते. या बदलामुळे पर्यटकांची संख्या अडतीस प्रतिशत वाढली.
मणिशंकर अय्यरने सेल्युलर तुरुंगातील क्रांतिज्योत स्तंभावरील सावरकर वचन काढून त्या जागी गांधी वचन लावल्याचे स्मरत असेल. मोदींचा धूर्तपणा असा की, त्यांनी त्या स्तंभाजवळ दुसरा तंतोतंत तसाच प्रतिकृती स्तंभ उभारला. त्यावर काढले गेलेले सावरकर वचन लावले आहे. विशेष म्हणजे, त्यावर अन्य कोणाचीही वचने नाहीत. गांधीवचनाला धक्का न लावता हे काम अक्कलहुशारीने केले आहे, यात शंकाच नाही. याचप्रमाणे रोस, हॅवलॉक व नील बेटांची नावे बदलून क्रांतिवीरांची दिली जावीत असे वाटते. १९५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचा बीमोड करून सैनिक व निरपराध नागरिकांच्या क्रूर हत्यांना जे जबाबदार होते त्या तीन इंग्रज अधिकार्‍यांची ही नावे आहेत. त्यांचा गौरव म्हणून इंग्रजांनी दिलेली ही नावे आपण अजूनही बदलू शकलो नाहीत, ही शरमेची बाब नव्हे काय? यासंबंधी आम्ही ट्विट केलेच आहे, पण आपणही पत्रे, मेल वा ट्विटरचा मारा करू शकाल का?
पोर्टब्लेयरची लोकसंख्या साडेचार लक्षाच्या आसपास आहे. रस्त्यावर एकही भिकारी दिसत नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. मात्र पर्यटकांची संख्या वाढू लागताच येऊ पाहणार्‍या सुबत्तेमुळे व्यसनांनी चांगलाच शिरकाव केला. २०१५ मध्ये ५० तर २०१६ मध्ये मुख कर्करोगाच्या ८६ केसेस समोर येताच नवीन उपराज्यपाल प्रा. जगदीश मुखी यांनी साध्या व सुगंधी तंबाखूवर पूर्ण बंदी घातली. आता येथे पानमसाला, गुटखा अथवा अन्य तंबाखू अजिबात मिळत नाही. दारूबद्दलही असेच कडक धोरण अवलंबण्यात आले. पूर्ण बारा तास दारुविक्री केंद्रे व बार चालू असत. आता ही मर्यादा सहा तासांवर आणण्यात आली आहे. दारूच्या किमती देशाच्या अन्य शहरांमधील किमतीइतक्या करण्यात आल्या. केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे पूर्वी त्या कमी होत्या. दारू खरेदी करण्याची वयोमर्यादा १८ वरून २१ करण्यात आली. या महिन्यात द्वीपवरील सर्व मुख्य रस्त्यावरील दारू दुकाने बंद करण्यात येतील. हे सर्व उच्च न्यायालयाच्या आदेशावरून होते आहे.
नव्या बेटांवर पर्यटन व्यवसाय वाढीला चालना देण्यात येत आहे. नील द्वीपावर फारसे कोणी फिरकत नसे. अवघ्या चार सहस्र लोकवस्तीच्या या द्वीपावर आता पर्यटन व्यवसाय फोफावू लागला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. मात्र बेटाबेटांमध्ये अद्याप चांगली संपर्क यंत्रणा नाही. त्यासाठी मोदी सरकारने तातडीने अकराशे कोटी रुपयांच्या ऑप्टिकल फायबर केबलच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे चेन्नई ते पोर्टब्लेयर आणि आसपासच्या प्रमुख बेटांदरम्याने समुद्रतळातून फायबर केबल जोडणी होणार आहे. पुढील वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. हा खूप मोठा विकासाचा भाग आहे.
आजवर या बेटांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले होते. या बेटावरील लोकांचा साक्षरता दर केरळच्या पाठोपाठ म्हणजे ८६ टक्के इतका आहे. एक आदर्श राज्य बनण्याची क्षमता या द्वीपसमूहात नक्कीच आहे. योजकस्तत्र दुर्लभा: असे म्हटले जाते. त्यानुसार आताचे उपराज्यपाल आहेत असे वाटले. सावरकर आत्मार्पणदिनाच्या दिवशी त्यांनी या द्वीपाच्या विकासाचा जो आलेख मांडला तो म्हणजे केवळ शब्द बुडबुडे नव्हते, तर त्यात तळमळ होती. चांगले कार्य करून दाखविण्याची जिद्द होती. प्रत्येक राज्यप्रमुखाने अशी तळमळ दाखवून आपापल्या राज्याप्रती प्रामाणिकपणाने कार्य केले तर ‘अच्छे दिन’ दूर नसतील मात्र तशी इच्छाशक्ती हवी. निष्ठा हवी, सेवकभाव हवा. तेच तर सध्या कठीण झाले आहे ना…!!
डॉ. सच्चिदानंद शेवडे