श्री मुकुंदराज महाराज साधू (समाधी इ. स. १८५५)

0
141

विदर्भातील संत परंपरा
श्री सद्गुरू मुकुंदराज महाराज या घराण्याचे मूळ पुरुष. त्यांच्या अगोदरची माहिती उपलब्ध नाही. हे ऋग्वेदी तेलंग ब्राह्मण असून हरितस गोत्रीय होते. ते मन्थनचे असून, सरकारी नोकरीत होते. एदलाबादच्या पृथ्वीपुरी महाराजांचा उपदेश घेतल्यानंतर मुकुंदराज बुवांच्या मनात वैराग्य बाणले. नोकरीचाकरी व धनदौलत सोडून त्यांनी स्थलांतर केले आणि ते भाम येेथे येऊन राहिले. नंतर काही काळ ते चंद्रपूर, वेळे या ठिकाणी राहून नागपूरास आले. नागपुरात सध्या वाकररोडवर जो साधुबुवांचा मठ आहे ती जागा त्यांना महादजी अमृत मखलाशी यांनी दिली आहे, असा उल्लेख, दे. गो. लांडगे यांच्या ‘नागपूरचा सांस्कृतिक इतिहास’ या पुस्तकात आढळतो. (पृ. ५०)
महाराज नागपूरला आल्यावर त्यांच्या गुरूंनी समाधी घेतली. आपल्या गुरूंनी न कळविता समाधी घेतली याबद्दल महाराजांना फार वाईट वाटले. गुरूंचे दर्शन झाल्याशिवाय अन्नपाणी घेणार नाही, या निश्‍चयाने गुरूंच्या समाधिस्थानावर जाऊन सतत १५ दिवस त्यांनी प्रायोपवेशन केले. गुरूंनी सोळाव्या दिवशी दर्शन देऊन त्यांचे समाधान केले व त्यांना आशीर्वाद दिला की, ‘‘पुढे तुझ्या पोटी दोन महापुरुष (एक संत व दुसरा गंधर्व) उत्पन्न होईल व त्यांची कीर्ती नागपुरात व बाहेर वाढेल.’’ असे बोलून महाराजांचे गुरू पथ्वीकरबोवा अदृश्य झाले. गुरूंचा यथायोग्य श्राद्धविधी करून मुकुंदराज महाराज नागपूरला परत आले.
श्री मुकुंदराज महाराज नागपूरला स्थायिक झाल्यावर त्यांच्या अखंड स्वात्मानंदात निमग्न असत. लोकेषणा व वित्तेषणा याची त्यांना मुळीच पर्वा नव्हती. श्रीकृष्ण व श्रीदत्तात्रेय यांच्या भक्तीचे त्यांनी व्रत घेतले होते. ही दोन्ही दैवते भिन्न नसून एकच होत, असा एकनाथमहाराजांप्रमाणेच यांनाही साक्षात्कार झाला होता. हे सर्व एकाच परंपरेतील होत. त्यांची परंपरा पुढीलप्रमाणे आहे. दत्त-जनार्दन-एकनाथ-शिवानंद-महदानंद-अंबानाथ-विठ्ठल-वैकुंठाश्रम-श्रीमुकुंद-श्रीकृष्ण ऊर्फ कृष्णानंद.
नागपूरला त्या वेळी तिसरे रघुजी ऊर्फ बाजीराव भोसले यांची सत्ता होती. हे राजे साधुसंतांचे मोेठे चाहते होते. अनेक संतांना त्यांनी नागपुरात वस्तव्यास जागा दिली होती. श्री मुकुंदराज महाराजांच्या विरक्तीचा, नि:स्पृहतेचा व साधुत्वाचा महिमा यांच्या कानावर गेला. त्यांनी महाराजांना आपल्या राजवाड्यात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, हे सर्व प्रयत्न निष्फळ गेले. त्यानंतर महाराज स्वत: साधूंच्या भेटीकरिता निवडक सेवकांबरोबर आले. महाराजांच्या चेहर्‍यावरचे सात्त्विक तेज पाहून श्रीमंत व त्यांच्याबरोबरचे सरदार व सेवक प्रभावित झाले. श्रीमंतांनी महाराजांच्या मठाबद्दल व ईश्‍वराच्या नैवेद्याबद्दल चौकशी केली. स्वामी म्हणाले, ‘‘माझा देव याबाबतीत पूर्ण समर्थ आहे. त्याच्या नैवेद्याबद्दल श्रीमंतांनी चिंता करण्याचे कारण नाही.’’ महाराजांच्या या बाणेदार उत्तराने श्रीमंत थोडे खजील झाले व महाराजांविषयी त्यांचा आदर दुणावला. इतर मठाधिपतींच्या तुलनेत हा अनुभव त्यांना नवीन होता.
राजवाड्यात परत आल्यानंतर साधूंच्या मठातील उत्पन्नाबद्दल श्रीमंतांनी गुप्तचरांकडून माहिती मिळविली. हे देवस्थान केवळ गोपाळकृष्णाशिवाय दुसर्‍या कोणाच्याही आश्रयावर नाही. देवस्थानचा सभामंडप ताबडतोब बांधावा व गोपाळकृष्णांच्या नैवेद्याकरिता पंचेवीस माणसांचा शिधा द्यावा, असा हुकूम श्रीमंतांनी आपल्या खाजगी कारकुनांना दिला. लांडगे यांनी आपल्या पुस्तकात हा आकडा साठ दिला आहे. राजवाड्यातून आलेला शिधा त्याच दिवशी खर्च करण्यात यावा, त्याचा अंश दुसर्‍या दिवशी राहू नये, असा महाराजांचा कटाक्ष होता. शिधा न आल्यास महाराजांच्या कुटुंबातील लोकांना उपवास घडत असत. ही व्यवस्था श्रीमंत बाजीराव भोसल्यांच्या मृत्यूपर्यंत इ. स. १८५३ पर्यंत चालली.
ठरल्याप्रमाणे सभामंडप बांधून पूर्ण झाला. बांधकाम झाल्यानंतर एके रात्री मुकुंद महाराजांना स्वप्न पडले. स्वप्नात गोपालकृष्ण आले. म्हणाले, ‘‘माझी मूर्ती भोसल्यांच्या जामदारखान्यात अडगळीत पडली आहे. माझ्याकडे कोणाचेच लक्ष नाही. तरी त्या स्थानातून मला मुक्त करून तुझ्या मठात मला स्थानापन्न करावे.’’ अशाच प्रकारचे स्वप्न त्याच रात्री श्रीमंतांनाही पडले. त्याप्रमाणे शोध घेतला असता तीन मूर्ती जामदारखान्यात मिळाल्या. श्रीमंत स्वत: या तीन मूर्ती लवाजम्यासह घेऊन मठात आले व त्यांनी गोकुळाष्टमीस रात्री १२ वाजता या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत मुकुंदराजांच्या हस्ते केली व त्यानंतर ७ दिवस अखंड हरिनाम व अन्नदान करण्यात आले.

मुकुंदराज महाराजांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते. त्या ‘पती हाच परमेश्‍वर’ असे मानणार्‍या महान साध्वी होत्या. त्यांना तीन पुत्र व एक कन्या होती. ज्येष्ठ पुत्र दादाजी ऊर्फ कृष्णानंद, दुसरे आत्मारामबापू व तिसरे भाऊजी महाराज. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे दादाजी महाराज हे संत व आत्मारामबापू हे प्रतिगंधर्व म्हणून जन्मास आले. दादाजी महाराज व त्यांच्या दोन बंधूंनी आपल्या साक्षात्कारी वडिलांकडून गुरुमंत्र घेतला होता. मुकुंदराज महाराजांनी दादाजींना आपल्या जवळची सर्व विद्या देऊन भजन, कीर्तन, प्रवचन यात निष्णात केले. दादाजी महाराजांचे कीर्तन फारच रसाळ होत असे. तसेच गीतगोविंदाची समश्‍लोकी व पुष्कळ भक्तिपर पदेही केली आहेत. ‘मन ठेवियले गुरुपायी| आता जन्ममरण भय नाही’ हे प्रसिद्ध पद महाराजांचेच आहे. यावरून साधुघराणे कवित्वाच्या क्षेत्रातही अग्रेसर होते, हे लक्षात येते.
इ. स. १८५३ मध्ये तिसरे रघुजी बाजीराव भोसले हे कैलासवासी झाले. नागपूरचे राज्य खालसा करण्यात आले. आश्रितांना अन्न मिळणे कठीण झाले. भोसल्यांकडून साधूंकडे येणारा शिधा बंद झाला. गोपालकृष्णांना नैवेद्य न मिळाल्यामुळे मुकुंदराज महाराजांच्या कुटुंबातील लोकांना उपवास घडू लागले. मठाच्या बाहेर कीर्तन करून द्रव्यार्जन प्राप्त करणे महाराजांना शक्य होते. परंतु, हरिनामाची विक्री करणे त्यांना पसंत नव्हते. अशा परिस्थितीत पुत्र दादाजींनी घराचा भार आपल्या अंगावर घेतला. त्यांनी शाळा सोडून भोसल्यांच्या जामदारखान्यात दरमहा २० रुपये वेतनावर नोकरी स्वीकारली. त्यामुळे कुटुंबातील मंडळींचे हाल कमी झाले.
याप्रमाणे दिवस जात होते. एके दिवशी महाराजांनी दादाजींना बोलावून सांगितले की, ‘‘माझा निर्याणाचा दिवस जवळ आला आहे.’’ हे ऐकताच दादाजींना व त्यांच्या बंधूंना फार वाईट वाटले. महाराजांनी दादाजींचे समाधान केले. कार्तिक वद्य पंचमीच्या दोन दिवस अगोदर मुकुंदराजांनी प्रायोपवेशन करून संन्यास स्वीकारला. पंचमीला सकाळी ५ वाजल्यापासून हरिनामाचा अखंड गजर करण्यास लोकांना सांगितले. दुपारी ११ वाजता समाधीची सर्व तयारी करण्यात आली. १२ वाजता कुटुंबातील सर्व लोकांना शोक सोडण्यास सांगून महाराज श्रीकृष्णस्वरूपात विलीन झाले. त्यानंतर त्यांचा यथोचित अंत्यविधी करण्यात आला व त्याच ठिकाणी महाराजांची समाधी बांधण्यात आली.
मुकुंदराज महाराजांच्या निर्याणानंतर दादाजींना फार दु:ख झाले. त्यांची आई त्यांचे सांत्वन करीत. पतीमागे राधाबाई बरेच वर्षे जिवंत होत्या. मठाची जबाबदारी दादाजींवर आली. तेही मोठे अधिकारीपुरुष होते. यांनी आपल्या वडिलांची परंपरा अधिक तेजाने तळपती केली. त्यांचा जन्म श्रावण वद्य अष्टमी, शके १७४१ (इ. स. १८१९) रात्री १२ वा. कृष्णजन्माचे कीर्तन चालू असतानाच झाला. कृष्णजन्माच्या कवेळेसच ते जन्माला आले म्हणून त्यांचे नाव कृष्ण ठेवले. व्यवहारातले नाव दादा असे ठेवण्यात आले.
दादाजींनी नरोबा दीक्षित यांच्याजवळ पंचमहाकाव्यांचा व विख्यात पंडित रामशास्त्री खरे यांच्याजवळ न्याय, व्याकरण व वेदान्तशास्त्राचा अभ्यास केला. परंतु, मुकुंदराजांना दादाजींना पंडित बनवायचे नसून भगवद्भक्त करायचे होते. त्यांनी दादाजींना जवळ बोलावून- ‘‘कालाचा अपव्यय करणार्‍या शास्त्रांच्या अभ्यासाचा नाद सोडून निरंतर गोपालकृष्णाच्या चिंतनात मग्न करून लोकांकडून भगवद्भक्त साधू तू स्वत:ला म्हणवून घ्यावे, हीच माझी एकमेव इच्छा आहे.’’ असे म्हटले. वडिलांच्या इच्छेप्रमाणे दादाजींनी शास्त्राचा अभ्यास करणे बंद करून मंदिरात गोपालकृष्णासमोर भागवत पुराण सुरू केले.
त्यांच्या विद्वत्तेबद्दल काय बोलावे! ते एकपाठी असून त्यांना पुष्कळ श्‍लोक, पदे, तुलसीदासाचे दोहे पाठ होते. ते संतकवी होते त्याचप्रमाणे मोरोपंतांच्या परंपरेतील पंडितकवीही होते. मोरोपंतांच्या साहित्याचा त्यांनी कसून अभ्यास केला होता. त्यांनी ३६० आख्यानातील पदे रचली होती. नागपुरातील प्रसिद्ध विद्वान म. म. बाळशास्त्री हरदास यांनी त्यांच्या काव्याचा व आख्यानांचा सखोल अभ्यास करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. दादाजी महाराज हे मराठीतील प्रसिद्ध कवी रे. टिळक यांचे स्फूर्तिस्थान होते. टिळकांच्या सर्व उत्कृष्ट कवितांवर दादाजी महाराजांच्या कवितेची छाप पडलेली होती. एवढेच नव्हे, तर टिळकांनी नागपूरच्या वास्तव्यात ख्रिस्त धर्म स्वीकारण्यापूर्वी दादाजींचे चरित्रही लिहिले होते. (पाहा- श्री. लांडगेकृत इतिहास)
दादाजींच्या कीर्तनकीर्तीबद्दल जेवढे बोलावे तेवढे थोडेच होईल. यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेण्याकरिता झुंडीच्या झुंडी लोटत. गर्दी इतकी होत असे की लोक झाडांवर, घरांवर, भिंतीवर बसत. ते आपल्या काळातील अग्रगण्य कीर्तनकार होते. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे कीर्तनाची विक्री त्यांनी कधीही केली नाही. न मागता, न ठरविता लोक जे देतील त्याचा ते स्वीकार करीत, ‘एकनाथ गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी’ यापासून ते आपले कीर्तन सुरू करीत. आपल्या गुरुपरंपरेचे स्मरण करून कीर्तनाची सुरुवात करण्याची ही प्रथा अजूनही त्यांच्या घराण्यात सुरू आहे. दादाजी एकदा नाथषष्टीला पैठणास गेले असता त्यांची कीर्तनाची वर्णी काही केल्या लागेना. कसाबसा अर्धा तास मिळाला व दादाजीने एकदा ‘मुकुंद गुरुमाउली’ या पदाची ललकारी छेडली मात्र, तो समाज कीर्तनोत्सुक झाला. एवढेच नव्हे, तर त्या दिवशीच्या इतर सर्व हरदासांची कीर्तने रद्द होऊन यांचेच चालू राहिले व पुढे ३ दिवस तोच क्रम चालू राहिला. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर आख्यान अप्रतिम होत असे आणि त्यात कोट्या, कल्पना व अभिनय यांची भर पडल्यामुळे लोक मंत्रमुग्ध होत.
दादाजींच्या अनुपम कीर्तनशैलीत व वक्तृत्वात त्यांचे प्रेमळ बंधू आत्मारामबापू आपल्या पाठांतराची व गायन कौशल्याची भर घालीत. बापूंना भूगंधर्व म्हणत. बापूंचे गायनकौशल्य एवढे थोर होते की, त्यांचे गायन ऐकण्याकरिता तेव्हाचा राजाश्रित गवई वझीरखॉं नेमाने येत असे. त्याची बसण्याची जागाही ठरलेली असे. आत्मारामबापू शरीराने नाजूक होते. थोडा त्रास झाल्यास ते एकदम आजारी पडत. संसाराचा सर्व भार बापूंनी आपल्या अंगावर घेतला होता. दादाजी यापासून अलिप्त असत. इ. स. १८८० माघ वद्य १४, महाशिवरात्रीच्या दिवशी बापूंची प्रकृती फार बिघडली. मानवी उपाय अपुरे ठरून रात्री १२ वा. ईश्‍वराने आत्मारामबापूंना उचलून नेले. स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झालेला एक गंधर्व पुन्हा स्वर्गात परत गेला. बापूनंतर श्री. आबाजी डाऊ हे दादाजींना कीर्तनात साथ देत असत. परंतु, त्यांना बापूंची सर नव्हती, असे जाणकार लोक म्हणत.
आत्मारामबापूंच्या निधनाने दादाजींना अतीव दु:ख झाले. आपल्या कीर्तनातील आत्माच हरवल्यासारखे त्यांना झाले. कीर्तन करता करता बापूंची आठवण झाली की त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत. ते मूक होऊन जात. दादाजींचे दुसरे बंधू भाऊजी महाराज यांनीही संन्यास घेऊन समाधी घेतली. मातोश्रींनी अगोदरच जगाचा निरोप घेतलेला. अशा परिस्थितीत स्वत:ला पुत्रसंतती नसल्यामुळे त्यांनी बापूंचा एकमेव पुत्र बालमुकुंद ऊर्फ बावाजी महाराज यांना योग्य शिक्षण देऊन मठाची जबाबदारी सांभाळण्याकरिता तयार केले. आत्मारामबापूंच्या मृत्यूनंतर दादाजी सात वर्षे जिवंत होते. इ. स. १८८९ मध्ये दादाजींच्या कंठावर अंत:स्थ मोठा फोड होण्याचे निमित्त होऊन श्रावण वद्य चतुर्दशीला वयाच्या ७१ व्या वर्षी नवरात्राचा उत्सव संपल्यानंतर मध्यरात्री दादाजींनी आपली जीवनयात्रा संपविली.
दादाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे बावाजी महाराज यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यांचे वय त्या वेळी २५ वर्षे होते. मठातील उत्सवांची व कीर्तनाची जबाबदारी बावाजींवर येऊन पडली. दादाजींनी त्यांना आपल्या तालमीत उत्तम तयार केले असल्यामुळे बावाजींना ही जबाबदारी पार पाडणे फार कठीण गेले नाही. तेसुद्धा उत्तम कीर्तनकार होते. त्यांनी मठाची परंपरा समर्थपणे पुढे नेली. श्रावण वद्य ४, इ. स. १९१५, रविवारी पहाटे ४ वाजता वयाच्या ५३ व्या वर्षी बावाजींचे देहावसान झाले.
बावाजींनी आपल्या तीन मुलांना मात्र कीर्तनाची संथा दिली नाही. त्यांनीही त्या परंपरेत विशेष रस घेतला नाही. त्यामुळे बाबाजींच्या मृत्यूनंतर साधुघराण्यातील कीर्तनपरंपरेला आहोटी लागली. मात्र, ती बंद पडली नाही. बावाजीनंतर त्यांचे पुत्र बापूजी व त्यानंतर त्यांचे पुतणे आत्मारामपंत ऊर्फ भाऊराव यांनी ही परंपरा टिकवून धरली. आज आत्मारामपंतांचे पुतणे प्राध्यापक रवींद्र साधू ही परंपरा समर्थपणे सांभाळत आहेत. ते सुविद्य असून देवस्थानचे सर्व उत्सव नेमाने पार पाडण्यात अग्रेसर आहेत. त्यांचे निवासस्थान मंदिराच्या बाजूलाच असून, आपल्या घराण्याचा ‘साधू’ वारसा ते भाविकतेने जतन करून राहिले आहेत. त्यांनी आपल्या संग्रहातील, यादव बलवंत सुभेदार लिखित ‘श्री सद्गुरू मुकुंदराज महाराज साधुकुलवृत्तान्त’ हे पुस्तक मला पाहावयास दिले. हा लेख लिहिताना या पुस्तकाचा फार उपयोग झाला. प्रा. रवींद्र साधू यांचे त्याबद्दल आभार!

डॉ. राजेंद्र डोळके/९४२२१४६२१४