यमराज सहोदर:

0
2031

संस्कृत सुभाषितकाराने उपरोधाने रोग्यावर उपचार करणार्‍या तत्कालीन वैद्य लोकांना ‘यमराज सहोदर:’ म्हणजे मृत्युदेवता यमाचे सख्खे भाऊ, असं म्हटलंय्. मानवी मुंडक्यांचे मनोरे रचण्यातच पुरुषार्थ मानणारे चंगेजखान, तैमूरलंग, नादिरशहा, अल्लाउद्दीन खिलजी, लेनिन, स्टॅलिन, माओ यांना जर या सुभाषितकाराने पाहिलं असतं, तर काय नाव दिलं असतं, कोण जाणे!
रुडॉल्फ जोसेफ रुमेल हा एक नामवंत अमेरिकन राजकीय विचारक किंवा अमेरिकन परिभाषेत, राजकीय शास्त्रज्ञ-पोलिटीकल सायंटिस्ट होऊन गेला. सामुदायिक हिंसा आणि युद्धातील हत्या हा त्याच्या निरंतर संशोधन, चिंतनाचा विषय होता. अलीकडेच म्हणजे २०१४ साली तो मरण पावला, तेव्हापर्यंत या विषयाशी संबंधित अशी त्याची तब्बल चोवीस पुस्तकं आलेली होती. अमेरिकेच्या इंडियाना, येल आणि हवाई विद्यापीठांमध्ये त्याचं सगळं अध्ययन, अध्यापन, संशोधन झालं.
मार्क्सवादाबद्दल लिहिताना रुमेल म्हणतो, ‘‘आतापर्यंतच्या सर्व धार्मिक किंवा निधर्मी संप्रदायांमध्ये मार्क्सवाद हाच सर्वाधिक हिंसक, रक्तलांच्छित संप्रदाय आहे. त्याच्यासमोर, कॅथलिक संप्रदायाची बदनाम इन्क्विझिशन्स, क्रुसेड्‌स, कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातलं तीस वर्षं चाललेलं युद्ध वगैरे गोष्टी किरकोळ ठरतील. मार्क्सवाद म्हणजेच रक्ताळलेला दहशतवाद, मृत्यूने केलेली साफसफाई, प्राणघातक यातनातळ, खुनी वेठबिगार, मृत्यूकडे नेणारी हद्दपारी, मनुष्यनिर्मित दुष्काळ, खोटे न्यायालयीन खटले, कायदेशीर ठरवण्यात आलेल्या बेकायदा फाशीच्या शिक्षा; थोडक्यात अगदी उघड उघड सामुदायिक खून आणि सामुदायिक वंश उच्छेद.’’ रुमेल पुढे लिहितो, ‘‘आपल्या संकल्पनेतला स्वर्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्क्सवादी, गरिबी, शोषण, साम्राज्यवाद आणि विषमता याविरुद्ध युद्ध पुकारलं. या युद्धात कोण बळी पडले; तर पाद्री, पांढरपेशे, भांडवलदार, बंडखोर, बुद्धिमंत, प्रतिक्रांतिकारक, उजवे, जुलमी, श्रीमंत आणि जमीनदार. आता युद्ध म्हटल्यावर त्यात लाखांनी माणसं मरायचीच. स्वर्ग प्रत्यक्षात आणायला असेल, तर या माणसांनी मेलच पाहिजे, असं या सामुदायिक कत्तलींचं समर्थन मार्क्सवाद्यांनी केलं.’’
कार्ल मार्क्स- जन्म १८१८, मृत्यू १८८३; हा एक जर्मन- ज्यू अर्थशास्त्रज्ञ होता. ‘दास कपिताल’ किंवा इंग्रजीत ‘कॅपिटल : क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ हा त्याचा ग्रंथ १८६७ साली प्रसिद्ध झाला. प्राचीन काळापासून समाजाचं शोषण करणारी सरंजामशाही म्हणजे राजे, सरदार, जहागीरदार, जमीनदार यांची सत्ता आणि औद्योगिक क्रांतीमुळे नव्याने उदय पावलेली भांडवलशाही ही तसच शोषण, पिळवणूक करणारी व्यवस्था याविरुद्ध; शोषणमुक्त अशी कष्टकर्‍यांच्या राज्याची, समाजव्यवस्थेची कल्पना त्याने मांडली.
मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा तत्कालीन युरोपमधल्या वैचारिक विश्‍वावर फार मोठा प्रभाव पडला. पण, मार्क्सने मांडलेल्या विचारांनुसार आपल्या देशातल्या राज्य किंवा समाजव्यवस्थेची मांडणी- पुनर्मांडणी करायला कुणीही पुढे आलं नाही. तत्त्वज्ञान पुस्तकातच राहिलं. तेवढंच कशाला, ‘दास कपिताल’चे खंड-२ आणि खंड-३ हेसुद्धा मार्क्सच्या हयातीत प्रकाशित होऊ शकले नाहीत. ते काम नंतर त्याचा मित्र फ्रेडरिक एंगल्स याने पूर्ण केलं.
पुढे ५० वर्षांनी म्हणजे १९१७ साली मार्क्सचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली. पहिलं महायुद्ध चालू असतानाच म्हणजे इंग्लंड, फ्रान्स यांचा मित्र म्हणून रशिया जर्मनीविरुद्ध लढत असतानाच, रशियात ब्लादिमीर लेनिन आणि लिआँ ट्रॉटस्की यांच्या बोल्शेव्हिक पक्षाने क्रांती केली आणि रशियातली सत्ता हडपली. लगेच लेनिनने जर्मनीशी तह करून युद्धातून रशियाला बाजूला काढले. आता लेनिन आणि ट्राट्‌स्की रशियन राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांची मार्क्सवादी विचारानुसार पुनर्बांधणी करण्याच्या कामाला लागले. मार्क्सवाद म्हणजे गरिबी, शोषण, साम्राज्यवाद आणि विषमता याविरुद्ध युद्धच. आता युद्धात माणसं मरणारच आणि ती माणसं वरील गोष्टींची समर्थकच असणार. त्यामुळे पाद्री, पांढरपेशे, भांडवलदार, बंडखोर, बुद्धिमंत, प्रतिक्रांतिकारक, उजवे, जुलमी, श्रीमंत आणि जमीनदार एवढे सगळे लोक ठार करण्यात आले. किती? तर किमान २ लाख माणसं.
पाठोपाठ लेनिनने शेतीच्या सामुदायिकीकरणाचा प्रचंड कार्यक्रम हाती घेतला. कालपर्यंत जे शेतकरी जमीनदारांचा उच्छेद झाल्यामुळे बोल्शेव्हिकांवर खुश होते, ते आता भडकले. त्यांनी ठिकठिकाणी उठाव केले. बाल्शेव्हिकांनी त्यांनाही गोळ्या घातल्या. किती लोक मेले? किमान ३ लाख लोक. १९२४ च्या जानेवारीत लेनिन स्वत:च मेला. म्हणजे १९१७ ते १९२३ या मार्क्सवादी व्यवस्थेच्या सलामीलाच किमान ५ लाख माणसं सरळ ठार मारण्यात आली. गंमत म्हणजे हे लोक शत्रू नसून रशियाचेच नागरिक होते. नव्या संशोधनानंतर हा ताजा आकडा रॉबर्ट कॉंक्चेस्ट या विद्वानाने दिलेला आहे.
मग स्टॅलिनने सत्तासूत्रं हाती घेतली. प्रथम त्याने खुद्द ट्रॉट्‌स्कीलाच हद्दपार केलं आणि ‘कुलक’ म्हणजे श्रीमंत शेतकरीवर्गाविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. यातून एक छोटं यादवी युद्धच सुरू झालं. प्रचंड कत्तली झाल्या. पुढे दुसर्‍या महायुद्ध काळात, एका बैठकीत चर्चिलशी बोलताना स्टॅलिनने स्वत:च्या तोंडाने सांगितलं की, ‘डी- कुलकायझेशन’ या नावाने (कु)प्रसिद्ध असलेल्या या मोहिमेत किमान १ कोटी माणसं मेली. पुन्हा गंमत पाहा, ही माणसं शत्रू नव्हती. रशियन नागरिकच होती.
या शिवाय स्टॅलिनच्या कारकीर्दीत मंगोलिया आणि पोलंड या देशांमध्ये रशियन गुप्तहेर खातं एन. के. व्ही. डी.ने मोठी हत्याकांडं घडवली. १९३७ साली मंगोलियात किमान ३५ हजार माणसं ठार करण्यात आली. यांपैकी १८ हजार जण हे बौद्ध लामा होते. १९४० साली पोलंडमधल्या कातीन या ठिकाणच्या जंगलात २१ हजार पोलिस युद्धकैद्यांना सरळ ठार करण्यात आलं. पोलिश अभ्यासकांच्या मते, महायुद्ध काळात रशियनांनी किमान दीड लाख पोलिस नागरिक ठार केले. हे लोक बिनलढाऊ नागरिक होते, सैनिक नव्हे. रॉबर्ट कॉंक्वेस्ट यांनी २००७ साली यावर ‘द ग्रेट टेरर’ नावाचं पुस्तकच लिहिलंय. त्यात ते म्हणतात की, लेनिन आणि स्टॅलिन यांच्या कम्युनिस्ट राजवटीने खुद्द रशिया आणि अन्य देशांतली मिळून किमान १० कोटी ५० लाख माणसं ठार मारली.
पण या कत्तली काहीच वाटू नयेत, अशा मानवी रक्ताच्या नद्या माओ झेडॉंग या चिनी मार्क्सवाद्याने वाहवल्या. १९४९ साली माओचा कम्युनिस्ट पक्ष कोमिटांग या लोकशाही पक्षाला बाजूला सारून सत्तेवर आला. त्यापूर्वी दीर्घकाळ चीनमध्ये यादवी युद्ध झालं. त्या काळात म्हणजे १९४८ मध्येच माओने जाहीरपणे सांगितलं की, जमिनीच्या न्याय्य वाटपासाठी किमान ५ कोटी माणसांना मरावं लागेल. १९४९ मध्ये सत्तेवर आल्यावर माओने पहिल्या सलामीलाच किमान १० लाख माणसं ठार केली.
पुढे १९५९ साली माओने शेतीमध्ये सुधारणा करण्याची ‘द ग्रेट लीप फॉरवर्ड’ म्हणजे ‘हनुमान उडी’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी पंचवार्षिक योजना हाती घेतली. ही योजना व्यवहारत: चुकीची आहे, असं दिसल्यावर लोक विरोध करायला लागले. संप, उठाव सुरू झाले. कम्युनिस्टांना विरोध जराही सहन होत नाही. माओच्या सैनिकांनी आपल्याच नागरिकांना गोळ्या घातल्या. फ्रँक डिकॉटर हा इतिहासकार म्हणतो, ‘‘आधुनिक मानवी इतिहासाने पाहिलेलं ते सर्वात मोठं हत्याकांड असावं. किती लोक मेले? किमान ४ कोटी ५० लाख चिनी माणसं ठार झाली.
१९६६ साली माओला असं वाटायला लागलं की, साम्यवादी पक्षाची सत्तेवरची पकड ढिली पडतेय. प्राध्यापक, शिक्षक, बुद्धिमंत, विचारवंत, पत्रकार, लेखक वगैरे मंडळी लोकांना बंड करायला फूस देतायत. म्हणून त्याने ‘कष्टकर्‍यांची सांस्कृतिक क्रांती’ या नावाची एक जबरदस्त मोहीम काढून वरील सर्व वर्गाची सरळ कत्तल केली. ऑगस्ट १९६६ मध्ये माओच्या प्रेरणेने राजधानी बीजिंग- तत्कालीन पेकिंगमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविरुद्ध बंड पुकारलं. किमान १०० शिक्षकांना विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी तुडवून ठार मारलं. १९७६ साली माओ स्वत: मरेपर्यंत ही महान सांस्कृतिक क्रांती चालूच होती. तिचा धावफलक असा- ग्रामीण भागात दीड कोटी नि शहरी भागात दीड ते पावणेदोन कोटी. थोडक्यात, मार्क्सवादाला विरोध करतात म्हणून माओने आपल्याच देशाच्या ३ ते सव्वातीन कोटी नागरिकांना ठार केलं.
आता लेनिन, स्टॅलिन आणि माओ अशा महान मार्क्सवाद्यांनी घालून दिलेला कित्ता इतर देशातल्या मार्क्सवादी नेत्यांनी गिरवायलाच हवा, नव्हे का? कंबोडिया या देशाची लोकसंख्या सुमारे ७० लाख. १९७५ ते १९७९ या काळात पॉल पॉट या मार्क्सवादी हुकूमशहाच्या ख्मेर रुज राजवटीने, आपल्याला विरोध करतात म्हणून, यापैकी सुमारे २० लाख माणसं सरळ ठार केली. बल्गेरिया, रुमेनिया, पूर्व जर्मनी, हंगेरी हे त्या मानाने युरोपातले छोटे देश. तरी बल्गेरिया आणि पूर्व जर्मनीत किमान १ लाख प्रत्येकी, रुमेनियात ३ लाख आणि हंगेरीत किमान ५० हजार माणसं सामुदायिक शेतीला विरोध करतात म्हणून ठार करण्यात आली. उत्तर कोरियात किमान ८ लाख, व्हिएतनाममध्ये किमान ९ लाख आणि इथिओपियात किमान ५ लाख माणसं मारण्यात आली. १९७९ मध्ये सोवियत सेनेने अफगाणिस्तान व्यापला तो थेट १९८८ पर्यंत. या यादवी युद्धात किमान साडेदहा लाख अफगाणी नागरिक ठार झाले.
मार्क्सवाद्यांच्या खुनी कत्तलबाजीला अशी शतकभराची ‘महान’, ‘उज्ज्वल’, ‘तेजस्वी’ परंपरा आहे.

मल्हार कृष्ण गोखले