बघा जरा उगवतीकडे…

0
140

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या काळात व नंतरही, भारताचा पूर्व भाग सतत मागासलेला राहिला, असा उल्लेख करीत आले आहेत. योगायोगाने त्याच भागात भाजपाला सहसा आपले बस्तान कधी बसवता आलेले नव्हते. महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंत भाजपा आपली सत्ता आणू शकली वा बलवान पक्ष बनला. पण, दक्षिण व पूर्वेकडे त्याला अपेक्षेइतके यश मिळू शकले नव्हते. मोदींनी केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर पक्षाच्या संघटनेला निर्धारपूर्वक पूर्वेकडे बघायला भाग पाडले आणि गेल्या तीन वर्षांत त्याचे थोडेफार परिणाम समोर येऊ लागले आहेत.

पूर्वेला उगवती म्हणतात. पण, भाजपाचा सूर्य मावळती म्हणजे पश्‍चिम दिशेकडून उगवला होता. भाजपाला मिळालेले खरे यश राजस्थान व मध्यप्रदेश अशा पश्‍चिमेकडल्या राज्यात आधी मिळाले. नंतर जिथे भाजपाला फारसे स्थान नव्हते, अशा गुजरात राज्यात त्याने आपले पाय प्रयत्नपूर्वक रोवून सलग तिथली सत्ता टिकवली. अन्य राज्यांत वा प्रदेशात कॉंग्रेस पक्षाने जशी फाटाफूट घडवून आव्हान होणार्‍या पक्षांना संपवण्याचे राजकारण खेळले, त्याचाही प्रयोग भाजपाने गुजरातेत निकामी करून दाखवला. अखेरीस गुजरातमधून भाजपाला नव्या पिढीचे राष्ट्रीय नेतृत्व मिळाले आणि त्यानेच भाजपाला संसदेत एकपक्षीय बहुमतापर्यंत नेऊन ठेवले. अशा नेत्याने वारंवार एका गोष्टीचा उल्लेख आपल्या भाषणातून व प्रचारातून केला. पण, त्याची गंभीर दखल विरोधी पक्षांनी घेतली नाही, की राजकीय अभ्यासकांनी त्याचे निरीक्षण करण्याची गरज मानली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या काळात व नंतरही, भारताचा पूर्व भाग सतत मागासलेला राहिला, असा उल्लेख करीत आले आहेत. योगायोगाने त्याच भागात भाजपाला सहसा आपले बस्तान कधी बसवता आलेले नव्हते. महाराष्ट्रापासून राजस्थानपर्यंत भाजपा आपली सत्ता आणू शकली वा बलवान पक्ष बनला. पण, दक्षिण व पूर्वेकडे त्याला अपेक्षेइतके यश मिळू शकले नव्हते. मोदींनी केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर पक्षाच्या संघटनेला निर्धारपूर्वक पूर्वेकडे बघायला भाग पाडले आणि गेल्या तीन वर्षांत त्याचे थोडेफार परिणाम समोर येऊ लागले आहेत. पण, आजही कोणी तिकडे गंभीरपणे बघताना दिसत नाही. बंगालच्या निवडणुकात भाजपाने प्रथमच मतांची टक्केवारी मिळवत विधानसभेत स्वबळावर प्रवेश केला आणि ईशान्येकडे आपले खाते उघडलेले आहे. कालपरवा ओडिशा या राज्यात भाजपाने मिळवलेले यश म्हणूनच अधिक महत्त्वाचे आहे.
ओडिशा हे राज्य पूर्व किनार्‍यावरचे असून, तिथे यापूर्वी भाजपाला काहीसे यश मिळालेले होते. पण, ते प्रादेशिक पक्ष असलेल्या बिजू जनता दलाच्या सहकार्याने मिळालेले होते. त्यामुळेच तिथे त्या पक्षाशी खटका उडाल्यावर भाजपा कुठल्या कुठे फेकला गेला होता. वाजपेयी सरकार १९९८ सालात एका मताने पराभूत झाले, त्यातले ते नेमके एक मत ओडिशाचे तात्कालीन मुख्यमंत्री गिरधर गोमांगो यांचे होते. जयंतीवल्लभ पटनाईक या दीर्घकालीन मुख्यमंत्र्याला हटवून सोनियांनी लोकसभेतील खासदार गोमांगो यांना त्या जागी बसवले. त्यानंतरही त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिलेला नव्हता. म्हणूनच एका राज्याचे मुख्यमंत्री असतानाही ते लोकसभेत मतदान करू शकले होते. हे कायदेशीर असले तरी अनैतिक होते. मग लौकरच झालेल्या विधानसभा मतदानात त्यांच्यासह कॉंग्रेसला त्याच अनैतिकतेची किंमत मोजावी लागली. कॉंग्रेस पराभूत झाली आणि नवखा वाटणार्‍या बीजेडी पक्षाला सत्ता मिळाली. तेव्हा भाजपाने त्याच पक्षाशी हातमिळवणी केलेली होती. मात्र ग्रॅहम स्टेन्स नामक मिशनर्‍याच्या हत्येचा विषय गाजला आणि बीजेडीने भाजपाशी फारकत घेतली. मंत्रिमंडळातूनही भाजपा बाहेर पडली आणि कॉंग्रेसच्या पाठबळावर नवीन पटनाईक सरकार तगले होते. नंतर त्यांनी स्वबळावर विधानसभा जिंकून सत्ता राखली. पण, भाजपा मात्र तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली होती. कॉँग्रेस तिथे विरोधी पक्ष म्हणून राहिला. लागोपाठ तीन विधानसभेत बहुमत मिळवणार्‍या बीजेडीला भाजपा आव्हान देऊ शकली नाही. पण, मोदी विजयानंतरच्या गेल्या तीन वर्षांत, प्रयत्नांनी भाजपाने तो पहिला पल्ला गाठला आहे. ताज्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकात भाजपाने नेत्रदीपक म्हणावे असे यश मिळवताना कॉंग्रेसचा सफाया केला आहे आणि पटनाईक सरकारला नोटीसवर आणून ठेवलेले आहे.
गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीतील भाजपाच्या यशाचा खूप बोलबाला झालेला आहे. चांगल्या-वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. सत्ता, पैसा व फोडाफोडी करून भाजपाने यश मिळवल्याचेही आरोप झालेले आहेत. पण, ओडिशातील भाजपाच्या यशावर तसा आरोप कोणी करू शकलेला नाही. कारण ओडिशात भाजपाच्या हाती सत्ता नाही, की फोेडाफोडी करण्याइतकेही संघटनात्मक सामर्थ्य नसल्यासारखी स्थिती होती. अशा पार्श्‍वभूमीवर भाजपाने ताज्या निवडणुकीत कॉँग्रेसला थेट नगण्य स्थानावर ढकलून दिले आहे आणि बीजेडीलाही रक्तबंबाळ करून टाकले आहे. आजही या निवडणुकीत नवीन पटनाईक यांचा प्रादेशिक पक्ष प्रथम क्रमांकावर आहे. तरीही त्याचे संख्यात्मक बळ घटले असून, तितकेच भाजपाचे बळ वाढले आहे. कॉँग्रेसचे बळ भाजपाने आपल्याकडे खेचून घेतले आहे. परिणामी आता ओडिशा या पूर्वेकडील राज्यात भाजपा हा सत्तेला आव्हान देणारा पक्ष बनला आहे. नजीकच्या काळात पटनाईक सरकारला आव्हान देणारा पक्ष, अशा स्थितीत भाजपा येऊन पोहोचली आहे. आजवर तिथल्या जिल्हा परिषदांमध्ये भाजपाचे नगण्य म्हणजे ८४६ पैकी ३६ इतके नाममात्र अस्तित्व होते. त्यावरून मुसंडी मारत भाजपाने २९७ इतके सदस्य निवडून आणलेले आहेत. जवळपास आठ-नऊ पटीने ही शक्ती वाढलेली दिसते आहे आणि संख्येत बघायचे, तर २६१ जागा वाढलेल्या आहेत. अन्य पक्षांची घसरण हेच भाजपाचे बलस्थान झाले आहे. यात कॉँग्रेसचे स्थान आधीच डळमळीत होते, ते आणखी घसरले आहे. ८४६ पैकी ६५१ इतक्या जागा बीजेडीकडे होत्या. त्या आता ४७३ इतक्या झाल्या आहेत. म्हणजेच आजही त्याच पक्षाचे मताधिक्य आहे. पण, पावणेदोनशेहून अधिक जागा त्याने गमावल्या आणि तो भाजपासाठी लाभ ठरला आहे. विरोधकांसाठी ८४६ पैकी दोनशेहून कमी जागा होत्या. ती विषमता आता संपलेली आहे.
भाजपाने कॉँग्रेसच्या जितक्या जागा आपल्याकडे खेचून आणल्या, त्याहीपेक्षा अधिक जागा त्याने सत्ताधारी बीजेडीकडून हिसकावून घेतल्या आहेत. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत नवीन पटनाईक यांच्यासाठी भाजपा आव्हान म्हणून पुढे येत असल्याचे संकेत या मतदानाने मिळाले आहेत. सलग तीन विधानसभा जिंकणार्‍या बीजेडीकडे पक्षाची भक्कम संघटना नाही व नेत्याच्या करिष्म्यावर त्या पक्षाचे स्थान टिकून राहिले आहे. बिजू पटनाईक हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे गाजलेले नाव आणि नवीन हा त्यांचा पुत्र स्वच्छ चारित्र्याचा. त्यामुळेच बीजेडीला असे यश मिळू शकलेले होते. पण, दीर्घकालीन सत्ता हाती असूनही त्या पक्षाला आपली संघटनात्मक बांधणी करता आली नाही, की नजरेत भरणारा राज्याचा विकास साधता आला नाही. कॉँग्रेसलाही ते साध्य झाले नव्हते, म्हणून आधी कॉँग्रेसला दिल्ली वा स्थानिक नेतृत्वाच्या बळावर यश मिळत होते. तसा प्रभावशाली नेता भाजपाकडेही नव्हता. ती उणीव भाजपाने संघटनात्मक मार्गाने भरून काढलेली आहे. आज ओडिशात भाजपाला मिळालेले यश म्हणूनच महाराष्ट्रातील ताज्या यशापेक्षाही मोठे मानता येईल. कारण तिथे भाजपाने दीर्घकालीन राजकारणासाठी मजबूत पाया घातला आहे. या निकालानंतर नवीन पटनाईक यांना मोदी सरकारशी हातमिळवणी करावी लागेल किंवा मोदींविरोधात ममता, लालू इत्यादींच्या गोतावळ्यात दाखल व्हावे लागेल. तसे
करायला गेल्यास त्यांना कॉँग्रेसशी हात मिळवावा लागेल आणि ते त्यांच्याच पक्षासाठी मोठे संकट असेल. कारण आजही कॉँग्रेसपाशी त्या राज्यात संघटना आहे आणि तिला जीवदान देण्याचे ते पाप ठरेल. कुठल्याही मार्गाने गेले तरी भाजपाचा त्या राज्यात सुटलेला अश्‍वमेधाचा घोडा रोखणे, आता पटनाईकांना अवघड होऊन बसणार आहे. त्यात मोदी-शहा यशस्वी होऊ शकले, तर बंगालमधील ममतांचा इमला ढासळायला वेळ लागणार नाही. म्हणूनच राजकीय अभ्यासकांनी उगवतीकडे बघण्याची गरज आहे…
भाऊ तोरसेकर