संजय नरवणे महापौर, संध्या टिकले उपमहापौर

स्थायी सभापती अध्यक्ष तुषार भारतीय, गटनेता सुनील काळे

0
164

तभा वृत्तसेवा
अमरावती, ५ मार्च
अमरावतीच्या महापौरपदासाठी भाजपाने आज संजय नरवणे व उपमहापौर पदासाठी संध्या टिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून तुषार भारतीय व भाजपाचे गटनेता म्हणून सुनील काळे व उपगटनेता म्हणून विवेक कलोती यांचे नाव सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ४५ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. महापौरासह अन्य पदांच्या निवडीसाठी भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची शनिवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीला पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक आ. चैनसुख संचेती, कोअर कमेटीचे सदस्य विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, रिता मोकलकर, विवेक कलोती उपस्थित होते. याबैठकीत आधी सामूहिक चर्चा झाली. त्यानंतर आ. संचेती, डॉ. कोठेकर, डॉ. आंबटकर यांनी इतर सदस्यांसोबत वैयक्तिक चर्चा केली. ज्या सर्व चर्चेतून निश्‍चित झालेली नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कळवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. रविवारी सकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेता, उपगटनेता यांची नावे निश्‍चित झाली. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक आ. संचेती यांनी पत्रपरिषदेत नावांची घोषणा केली. स्थायी समितीचे सभापतिपद वगळून इतर सर्व पदांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षाचा राहणार आहे. भाजपाने सर्वच ठिकाणी हे सूत्र अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अमरावतीतही तेच सूत्र ठरविण्यात आले आहे. नावे निश्‍चित झाल्यानंतर कोअर कमेटीच्या सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. झालेल्या या निर्णयाची माहिती लगेच भाजपाच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना बैठकीत देण्यात आली.
नामांकन अर्ज दाखल
भाजपाने महापौर व उपमहापौर पदासाठी नावे निश्‍चित केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता संजय नरवणे व संध्या टिकले यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्याचा रविवार, ५ मार्च हा शेवटचा दिवस होता. नामांकन दाखल करतेवेळी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
भाजपा सोबत शिवसेना व युवा स्वाभिमान
भाजपालाच स्पष्ट बहुमत असले तरी नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी प्राथमिक चर्चा शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत झाली आहे. येत्या दोन दिवसात त्यांना देण्यात येणार्‍या पदांवर अंतिम निर्णय होणार आहे. दुसरीकडे युवा स्वाभिमानही सत्तेत सहभागी होणार आहे. आ. रवी राणा यांनी या संदर्भातली प्राथमिक चर्चा पूर्ण केली आहे. त्यांना देण्यात येणार्‍या पदांचाही निर्णय दोन दिवसात घेतला जाईल. तसेच रिपाइं (आ) गटाचे प्रकाश बनसोड भाजपाच्याच बाजूने येणार आहेत. हे तिन्ही पक्ष भाजपाच्या सोबत आल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ ५६ झाले आहे.
कॉंग्रेसतर्फेही नामांकन दाखल
मनपा निवडणुकीत फक्त १५ जागांवर विजय मिळविणार्‍या कॉंग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर पदासाठी शोभा शिंदे, तर उपमहापौर पदासाठी अब्दुल वसीम व बबलू शेखावत यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे. एमआयएमतर्फे उपमहापौर पदासाठी अफजल हुसैन यांनी नामांकन अर्ज सादर केला आहे. कॉंग्रेसजवळ बहुमत नसले तरी रणनीतीनुसार महापौर पदाची निवडणूक निश्‍चित होईल, असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.
(छायाचित्र : एएम ०५ एमआर – महापौर 🙂