शहर विकासासाठी कार्य करणार : नरवणे

0
92

तभा वृत्तसेवा
अमरावती, ५ मार्च
भाजपाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सर्वानुमते महापौर पदासाठी माझ्या नावाची निवड केली. त्यांचा हा विश्‍वास जिंकण्याचा संपूर्ण प्रयत्न माझ्याकडून होईल. शहर विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार संजय नरवणे यांनी दिली.
गेल्या १० वर्षांत सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहर विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजपाला मतदारांनी पसंती देऊन स्पष्ट बहुमत दिले. जनतेने दिलेला कौल विकासासाठी आहे, या निर्णयाचा पूर्ण सन्मान करून नागरिकांना चांगल्यात चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाईल. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अपेक्षांची पूर्ती सर्वांनाच सोबत घेऊन केली जाईल, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले.
अनुभवाचा फायदा होईल : टिकले
नगरसेवक म्हणून सलग दोन वेळा काम करण्याची संधी मला मिळाली आहे. जनतेने तिसर्‍यांदा मला संधी दिली असून पक्षाने आता उपमहापौर पदाची जबाबदारीही माझ्याकडे सोपवली आहे. या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल. तसेच शहर विकासासाठी माझ्या अनुभवाचा निश्‍चित फायदा होईल. पक्षाने उपमहापौर पदासाठी माझी निवड केल्याबद्दल पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे व नवनिर्वाचित नगरसेवकांची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार संध्या टिकले यांनी दिली.
पारदर्शी कामकाज : भारतीय
महानगर पालिकेच्या कामकाजात स्थायी समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. जवळपास सर्वच महत्त्वाचे निर्णय स्थायी समितीतूनच मंजूर होतात. स्थायी समितीचे कामकाज पारदर्शी पद्धतीने चालविण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल. आवश्यक तेथे केंद्र व राज्य शासनाची मदत घेण्यात येईल. शहरातल्या नागरिकांना उत्तम सुविधा पुरविल्यानंतरच मालमत्ता कर वाढविण्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे स्थायी समिती सभापती पदाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी दिली.
सर्व संमतीने काम करणार : काळे
सत्ता पक्षाच्या गटनेत्याची जबाबदारी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या खांद्यावर दिली आहे. या पदाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न माझ्याकडून होईल. नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन सभागृहात काम केले जाईल. नवीन नगरसेवकांना माझ्या अनुभवातून यथोचित मार्गदर्शनही वेळोवेळी दिले जाईल. सभागृहात विकासाच्या आणि नागरिकांच्या हिताच्या मुद्यांवर प्राधान्याने चर्चा करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नवनिर्वाचित गटनेते सुनील काळे यांनी दिली.