रिलायन्सच्या खोदकामामुळे पाईपलाईन फुटली

0
74

अंजनगावात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी, ५ मार्च
आधीच उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना, पाण्याचे संकट दिसत असताना ८ दिवसांपासून स्थानिक पानअटाई चौकात रिलायन्स कंपनीच्या केबल जोडणीच्या खोदकामामुळे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून शहरवासी पाण्यापासून वंचित आहेत. खोदकाम करण्याच्या मोठ्या मशीनमुळे ही पाईपलाईन फुटलेली आहे.
नळधारकांनी जीवन प्राधिकरणाकडे व नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली असता अभियंता सिनकर यांनी थातुर-मातुर डागडुजी केली. पुन्हा पाईपलाईन फुटली. याबाबत अभियंता सिनकर यांना जनतेने जाब विचारला असता नळधारकांसोबतच अभियंत्याची अरेरावीची भाषा होती. त्यामुळे पानअटाई चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उन्हाळ्याचे दिवस आणि पाण्याचे संकट असताना दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीसुद्धा जीवन प्राधिकरणाची कोणतीही ठोस भूमिका नाही. त्यामुळे जनतेचा रोष अनावर होत आहे.
मुख्याधिकारी करणार तक्रार
याबाबत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या ८ दिवसांपासून पानअटाई येथील मुख्य पाईपलाईन फुटली असताना नागरिकांच्या तक्रारीवरून मी स्वतः पाहणी केली व ५ दिवसांपूर्वीच फोनवरून जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केली. परंतु जीवन प्राधिकरणाकडून या गंभीर बाबीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच संबंधित रिलायन्स कंपनीला आम्ही अटीनुसार केबल जोडणीसाठी परवानगी दिली होती. परंतु रस्त्याच्या झालेल्या नुकसानीबाबत आम्ही रिलायन्स कंपनीविरुद्ध तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले.
प्राधिकरण पोलिसांत जाणार
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंता राखी भोंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, रिलायन्स कंपनीकडून जीवन प्राधिकरणाला कोणतीही सूचना मिळाली नव्हती. फुटलेली पाईपलाईन व ८ दिवसांत वाया गेलेले लाखो लिटर पाणी, या नुकसानीबाबत आम्ही रिलायन्स कंपनीविरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करून होणारा खर्च कंपनीपासून वसूल करणार आहोत.