उद्यापासून दक्षिणायन चित्रपट महोत्सव

जागतिक स्तरावरावरील गाजलेले चित्रपट

0
100

तभा वृत्तसेवा
अमरावती, ५ मार्च
आम्ही सारे फाऊंडेशन व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती शहरात दक्षिणायन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जागतिक स्तरावर गाजलेले एकूण ९ चित्रपट निःशुल्क दाखविले जाणार आहेत.
श्रीशिवाजी कला महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये मंगळवार, ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ख्यातनाम कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुख प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्री-पुरुष समता रुजविण्यासाठी प्रसिद्ध भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने दक्षिणायन ही चळवळ गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहे. देशभरातील अनेक लेखक, पत्रकार व विविध क्षेत्रातील कलावंत या चळवळीत सहभागी झालेले आहेत. चित्रपट महोत्सवाची संकल्पना प्रसिद्ध अभिनेते आणि दक्षिणायन चळवळीचे एक सहकारी अमोल पालेकर यांची आहे. अमोल पालेकर आणि चित्रपट समीक्षक संध्या गोखले यांनी या महोत्सवाकरिता चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट महाराष्ट्रातील ३० शहरांसह, कर्नाटक, गोवा, गुजरातमध्येही दाखविले जाणार आहेत.
या महोत्सवात ७ मार्च रोजी मिर्च मसाला (केतन मेहता), ८ रोजी एरिन ब्रोकोविच (स्टीव्हन स्लिपबर्ग-अमेरिका) हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक शनिवार-रविवारी मंथन (श्याम बेनेगल) या भारतीय चित्रपटाशिवाय ‘इन्व्हीकटस’ (क्लिटं इस्टवूड -अमेरिका), ‘मुलादे’(उस्मान सेम्बेन -केनिया), ‘अक्वारीस’(क्लेबर फिलो-ब्राझील ), ‘ड फर्स्ट ग्रेडर’(जस्टीन चाडविक-केनिया ), ‘द इमिटेशन गेम’(मोर्टन तायडम- यू. एस. ए.), मेड इन डोगनाम’ (निगेल कोल-युके) इत्यादी चित्रपट दाखविले जाणार आहे.