शेक्सपिअरला वाचा, पण कालिदास विसरू नका!

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे प्रतिपादन

0
89

तभा वृत्तसेवा
रामटेक, ५ मार्च
भाषा ही संवाद साधण्याचे सर्वोत्तम साधन आहे. यातून माणूस दुसर्‍यासोबत उत्तम प्रकारे संवाद साधू शकतो. मात्र इंग्रजीच उत्तम आणि इतर सर्व भाषा बोगस हा प्रकार कदापि करू नका. आम्ही इंग्रजीचे विरोधक नाही. भाषा म्हणून तिचा अभ्यास करा. नव्हे शेक्सपिअरला वाचा. पण कालिदास विसरू नका, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या सातव्या दीक्षान्त सोहळ्यात प्रकाश जावडेकर बोलत होते. हा देखणा सोहळा रविवार ५ मार्च रोजी रामटेक येथे किट्‌स कॉलेजमध्ये पार पडला. याप्रसंगी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीचे कुलगुरू डॉ. रमेशकुमार पांडेय, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमल सिंग, आ. आशीष देशमुख, कुलसचिव डॉ. अरविंद जोशी, परीक्षा नियंत्रक डॉ. उमेश शिवहरे, अंजली रहाटगावकर, डॉ. मधुसूदन पेन्ना, सी. जी. विजयकुमार, डॉ. कृष्णकुमार पांडेय, प्राची जावडेकर, डॉ. नंदा पुरी प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतात एकूण ८०० विद्यापीठे आहेत. प्रत्येकच विद्यापीठातील कुलगुरूंना मी व्यक्तिश: दीक्षान्त सोहळ्यात यावे असे वाटते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या विद्यापीठात जाणे शक्य नाही. तरीही मी वेगळ्या धाटणीच्या विद्यापीठात अवश्य जातो. त्या अनुषंगाने रामभद्राचार्य विश्‍व विकलांग विद्यापीठात गेलो. तिथे एका अंध व्यक्तीने संपूर्ण जगात फिरून सुमारे ३०० कोटी रुपये जमा केले. त्यातूनच ते विद्यापीठ उदयास आले.
रामटेकचे संस्कृत विद्यापीठ सुद्धा वेगळ्या धाटणीचे आणि आपला वारसा जपणारे असल्याचे गौरवोद्गार प्रकाश जावडेकर यांनी काढले.
विद्यार्थी सतत खडतर असे परिश्रम करतात आणि पदवी मिळवतात. आज ज्यांना पदवी मिळाली ते जीवनाच्या निर्णायक वळणावर आहेत. संस्कृत भाषा टिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्यासह इतरांनीही संस्कृत भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले. ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले. तेव्हा जेवढा इंग्रजीचा प्रचार व प्रसार होता, त्यापेक्षा दुप्पट वर्तमानात झाला. इतर देशांनी मात्र आपल्या भाषेला महत्त्व दिले. जर्मनीत इंग्रजीचा उदो उदो नाही. इस्रायलमध्ये त्यांनी हिब्रुला स्वीकारले आणि प्रगती केली. आम्ही सर्वच भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहोत.
संस्कृत भाषा टिकली पाहिजे. इतर भारतीय भाषांना वाचविण्यासाठी आमचा प्रयत्न कायम आहे. दरम्यान हिंदीत अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आता कुठल्या भाषेत शिकायचे हे ठरवू शकतात. तत्पूर्वी कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनीही मार्गदर्शन केले. दीक्षांत कार्यक्रमाचे संचालन पराग जोशी यांनी केले.