मोकळे रान नाही…

0
141

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर जनतेने दिलेला पारदर्शितेचा कौल स्वीकारीत महापौरासह कोणत्याही पदाची निवडणूक न लढविण्याचा स्तुत्य निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेला सर्व पदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुंबईचा महापौर कोण, या चर्चांना एकदाचा विराम मिळाला. निकाल लागल्यानंतरच दोन्ही पक्षांना जनतेने कौल दिला असून, दोघांनीही एकत्र यावे, अशीच भावना भाजपाची प्रारंभापासून होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत, ‘‘शिवसेना आणि भाजपाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा,’’ असे प्रांजळ मत व्यक्त केले होते. त्याच वेळी जर शिवसेनेने समंजसपणाची भूमिका घेतली असती, तर शिवसेनेची इज्जत तेव्हा वाढली असती. पण, जनादेशाचा अपमान करीत शिवसेनेने मात्र शेवटपर्यंत आडमुठी भूमिका घेतली. ती त्यांना लखलाभ. मुंबईच्या महापौरपदावरून भाजपा-शिवसेनेत आणखी वितुष्ट निर्माण व्हावे आणि महाराष्ट्राचे शासन अस्थिर व्हावे, अशी नीच भावना बाळगून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने देव पाण्यात बुडवून ठेवले होते. पण, मुख्यमंत्र्यांच्या या चतुर खेळीने त्यांना चांगलाच दणका मिळाला. आता शिवसेनेने मुंबईच्या विकासाकडे, सोयी-सुविधांकडे लक्ष देऊन काम करायचे आहे. चांगल्या कामासाठी भाजपाचा त्यांना पाठिंबाही मिळणार आहे. पण, हे काम करीत असताना, मराठी माणसाचे नाव घेऊन रसद गोळा करण्याचे आणि मुंबईकरांचे हालहाल करण्याचे उद्योग त्यांना करता येणार नाहीत. कारण, त्यावर भाजपाचे बारीक लक्ष असणार आहे. त्यासाठी आमचे सर्व नगरसेवक हे पहारेकरी म्हणून काम करतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सोबतच पारदर्शितेसाठी तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती आणि खास मुंबईसाठी उपलोकायुक्त अशी योजनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या सगळ्या योजना मुंबईकरांचे हित लक्षात घेऊनच करण्यात आल्या आहेत. कारण, मुंबईकरांचा शिवसेनेबाबतचा आतापर्यंत अनुभव वाईटच होता. आता शिवसेनेला प्रत्येक योजना, प्रकल्प हे पारदर्शीच ठेवावे लागतील आणि काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचेच करावे लागेल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी हार्दिक पटेल नावाच्या मुलाला बोलावून गुजराती मते मिळविण्याचा घाट घातला होता. यावरून शिवसेनेने मराठी माणसाचा मुद्दा सोडून राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा जो निर्णय घेतला, तो अभिनंदनीय आहे. तात्पर्य, आता कोणताही मराठी-अमराठी भेदभाव न करता, सर्वांना समान न्यायानेच शिवसेनेला काम करावे लागणार आहे. हे सर्व करीत असताना, शिवसेनेने हे कदापि विसरू नये की, भाजपाजवळ शिवसेनेपेक्षा फक्त दोन जागा कमी आहेत. हे सतत लक्षात ठेवून मुजोरी सोडून द्यावी लागेल. स्थायी समितीसह सर्वच समित्यांमध्ये भाजपाचेही तेवढेच सदस्य असणार आहेत. आतापर्यंत भाजपाने संबंधित समित्यांमध्ये आक्षेप का घेतला नाही, त्याचे उत्तर यापुढे मिळणार आहे, हेही शिवसेनेने विसरू नये. शिवसेनेने हेही लक्षात घेतले पाहिजे की, गतवेळी मिळालेल्या जागांपैकी केवळ ९ जागा त्यांना अधिक मिळाल्या आहेत, तर भाजपाला ५१ जागा अधिक मिळाल्या आहेत. या ८२ जागा आम्हाला पारदर्शितेच्या मुद्यावर मिळाल्या आहेत, त्यामुळे आम्ही पारदर्शितेचा मुद्दा सोडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे. राज्यात आठ महापालिकांमध्ये भाजपाची निर्भेळ सत्ता आली आहे. नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्येही भाजपच क्रमांक एकवर आहे. हे पाहता मुजोरी करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची शिवसेनेला नितांत गरज आहे. गेल्या पाच वर्षांत आपली पीछेहाट का झाली आणि भाजपाने एवढी उत्तुंग भरारी का घेतली, याचेही वस्तुनिष्ठ विश्‍लेषण शिवसेनेने केले पाहिजे. वास्तव न समजता विधानसभा निवडणुकीतही शिवसेना मंत्रालयावर भगवा फडकविणारच, या वल्गना शिवसेना पक्षप्रमुख कशाच्या आधारे करताहेत, हे कळायला मार्ग नाही. गतवेळी स्वत:ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून पाहिले. पण, लोकांनी त्यांनाही नाकारले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीतच १२२ जागा जिंकून शिवसेनेच्या नाकावर टिच्चून ‘करून दाखविले’ आहे. तेव्हा बालीश कल्पना सोडून वास्तवाचा सामना करण्यास शिवसेनेने शिकले पाहिजे. अन्यथा असले नसले संचितही वाया जायचे. आता सर्व समित्यांवर शिवसेनेचेच अध्यक्ष होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व अध्यक्ष शिवसेेनेला दिले आहेत; परंतु ‘आर्थिक व्यवहारांसाठी’ मात्र मोकळे रान दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, शिवसेनेने चांगल्या कामासाठी मदत मागितली तर देऊ. पारदर्शितेच्या मुद्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेने म्हटले आहे की, गेल्या दहा दिवसांच्या राजकीय बुद्धिबळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने बाजी मारली. पण, शिवसेनेने हे कदापि विसरू नये की, बुद्धिबळाच्या मालिकेतील हा केवळ दुसरा सामना आहे. पहिला सामना विधानसभेचा होता. त्या पहिल्याच सामन्यात शिवसेनेला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. या वेळीही शिवसेनेला निर्भेळ बहुमत मिळालेले नाही. याचा अर्थ असा की, सत्ता शिवसेनेच्या हाती आणि त्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठीची काठी भाजपाच्या हाती, असा हा जनादेश आहे. यानंतर अनेक सामने शिवसेनेला खेळावे लागणार आहेत. त्या सामन्यात ते किती सरस ठरतात, हे येणार्‍या काळात दिसेल. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. आम्हाला जर भाजपा बिनशर्त पाठिंबा देणार असेल तर आम्ही घेऊ, असे शिवसेनेने म्हटल्याचे कळते. पण, आता भाजपाने काही अटी टाकल्या असल्याने ते भाजपाचा पाठिंबा घेणार नाहीत, असे दिसते. असे झाले तर अल्पमताची महापालिका चालविण्याचा त्यांचा अट्टाहास हा त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता अधिक. भाजपाने ज्या अटी घातल्या आहेत, त्या मुंबईकरांना अच्छे दिन येण्यासाठीच उचललेली पावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे मुंबईकरांनी स्वागत केले आहे. मुंबईबद्दल ज्यांना जाण आहे, अशा सर्व जाणकारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. याचा अर्थ एवढाच की, यापुढे मुंबईकरांचे हाल नकोत. वास्तविक पाहता मुंबईकरांच्या भल्यासाठीच आम्ही काम करू, आम्हाला या अटी मान्य आहेत, अशी गर्जना शिवसेनेकडून अपेक्षित होती. पण, मुंबईच्या जनतेचा विचार न करता भाजपाच्या अटींमुळे शिवसेनेच्या समृद्धीवर काय काय, कुठे कुठे परिणाम होऊ शकतात, याची गहन चर्चा करण्यातच शिवसेना नेते मश्गूल असल्याचे बोलले जात आहे. आतातरी वार्‍याचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहात आहे, हे शिवसेनेने ध्यानात घ्यावे. गुण्यागोविंदाने काम करण्याकडेच त्यांनी लक्ष दिले पाहिजे. कारण, त्यांची सत्ता अल्पमताची असणार आहे.