शांत हो मना…

0
111

एक राजा होता. तो विद्वान व कलाप्रिय होता. एकदा त्याने राज्यातील चित्रकारांसाठी स्पर्धा ठेवली. प्रथम येणार्‍यास मोठे बक्षीस ठेवण्यात आले. ‘शांती’ हा विषय चित्रासाठी देण्यात आला होता. अनेक चित्रकारांनी त्या विषयावर सुंदर सुंदर चित्रे काढली. अंतिम स्पर्धेसाठी दोन चित्रांची निवड करण्यात आली. दोन्ही चित्रे दरबारात ठेवून राजाने सर्वांना त्यांचे मत विचारले. एका चित्रात सुंदर सरोवर होते. त्या भोवती हिरवेगार पर्वत. तलावाचे पाणी इतके शांत आणि नितळ होते की, पर्वत व वनराजींचे प्रतिबिंब त्यात पडले होते. वर निळे आकाश, त्यात तरंगणारे पांढरे ढग, आनंदाने विहार करणारे पक्षी, असा नयन मनोहर देखावा त्या चित्रात होता. दुसरे चित्रही निसर्ग देखाव्याचेच होते. पण या चित्रातील डोंगर खडकांचे होते. आकाश काळ्याकुट्ट रौद्र ढगांनी भरलेले होते. वाकलेल्या झाडांमुळे वादळ सुरू असल्याचे दिसत होते. मुसळधार पाऊस व कडाडणार्‍या विजाही दिसत होत्या. सरोवर होते, पण डोंगरावरून एक धबधबा त्यात कोसळत होता. त्यामुळे त्यात वर उडणारे पाणी व लाटा दिसत होत्या. चित्र म्हणून ते जिवंत चित्रण होते, पण ते विषयाला सुसंगत नव्हते. दरबारातल्या सर्वांनी पहिल्या चित्राची निवड केली, पण राजाने प्रथम क्रमांकाकरिता दुसर्‍या चित्राची निवड केली. सर्वांच्याच चेहर्‍यावर आश्‍चर्य दिसत होते. राजा म्हणाला, ‘‘चित्रातील ढग, वादळ, विजा पाहून तुम्ही चित्राचे नीट निरीक्षण केले नाही. या धबधब्याच्या बाजूला डोंगराला एक भेग पडलेली आहे. या चिंचोळ्या जागेत एक छोटे झुडूप उगवलेले आहे. या झुडपावर एका पक्ष्याने एक सुंदर आणि नाजूक घरटे बनविले आहे. आणि या घरट्यावर एक पक्षिणी शांतपणे डोळे मिटून बसलेली आहे. बहुदा ती अंड्यांवर बसलेली आहे.
खर्‍या शांततेचे दर्शन या दुसर्‍या चित्रात होते. संकटे, अडचणी, समस्या, दुःख, मतभेद, अपेक्षाभंग नाही अशी परिस्थिती प्रत्यक्ष जीवनात क्वचितच असते. शांतता म्हणजे अशी जागा नव्हे जेथे गोंधळ, आवाज, त्रास नाही. शांतता म्हणजे जेथे हे सर्व असूनही हृदय शांत ठेवणे. अशा परिस्थितीतही मार्ग काढून शांतपणे नवसृजनाचे काम करणे, हाच खरा शांतीचा अर्थ आहे. दुसरे चित्र अधिक वास्तव आहे.’’ राजाचे म्हणणे अर्थातच सर्वांना पटले.
बाहेर काय सुरू आहे यापेक्षा आपल्या आत काय सुरू आहे यावर शांती अवलंबून आहे. बाहेरच्या परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते, पण आपल्या आत काय व्हावे याचा निर्णय मात्र आपला आहे.
मनाकडे सजगपणे पाहण्याची शक्तीही आपल्याजवळ आहे. पण, आपण मनाकडे न पाहता त्याला शांत करण्याकरिता दुसरीकडेच प्रयत्न करत असतो. नदीच्या किनार्‍यावर उभे राहून पाण्याच्या प्रवाहाकडे जसे आपण तटस्थपणे पाहतो, तसे मनाकडे पाहण्याचा अभ्यास केल्यास मनाला अशांत करणार्‍या कारणांचा शोध घेता येतो.
‘पीस कॅन ओन्ली बी अचिव्हड् बाय अंडरस्टॅडिंग’ असे आईन्स्टाईन म्हणतो. आपल्या समोरच्या अडचणी, समस्या, संकटे यामुळे मन अशांत होते, असे मानले तर त्या परिस्थितीला नीट समजून घेणे, उपाय शोधणे, त्यावर नियंत्रण मिळविणे, विविध पर्यायांवर विचार करणे आवश्यकच ठरते. मनाला जोपर्यंत अशा पद्धतीने आपण कुठेतरी स्थिर करणार नाही तोपर्यंत ते अस्थिरच राहणार आहे.
एका व्यापार्‍याचे एकदा रानात घड्याळ हरविते. रान बरेच मोठे असते व त्या ठिकाणी कमरेपर्यंत गवत वाढलेले असते. त्या घड्याळवर त्याचा खूप जीव असतो त्यामुळे तो अस्वस्थ होतो. दहा-बारा मजुरांना तो कामाला लावतो. घड्याळ सापडल्यास बक्षीस देण्याचे आश्‍वासन देतो. सायंकाळपर्यंत सगळे प्रयत्न करतात, पण घड्याळ सापडत नाही. अंधार पडत आल्यामुळे तो व्यापारी आशाच सोडतो. एक छोटा मुलगा हे पाहात असतो. तो म्हणाला, ‘‘मी प्रयत्न करू का?’’ व्यापार्‍याने परवानगी दिली. मुलाने सर्व मजुरांना दूर जायला सांगितले. व्यापार्‍यालाही शांतपणे एका जागेवर उभे राहायला सांगितले व तो रानात गेला. दहा मिनिटात घड्याळ घेऊन तो परत आला. व्यापार्‍याला आश्‍चर्य वाटले. मुलगा म्हणाला, ‘‘मजूर गेल्यामुळे सर्वत्र शांतता होती. मी घड्याळाच्या टिकटिक आवाजाचा शोध घेत त्या ठिकाणी गेलो आणि घड्याळ शोधले.’’ समस्येचा वेध घेण्याकरिता शांतपणेच प्रयत्न करावे लागतात.
साध्या साध्या कारणानेही मन अशांत होण्याची सवय लागली तर साध्या प्रश्‍नांचीही उत्तरे मिळणे कठीण होऊन बसते. शांत मनाने जीवन सोपे करण्याचा प्रयत्न करू या.
रवींद्र देशपांडे,८८८८०३४११