देशभक्ती ले हृदयमें…

0
82

एकदा एक प्रयोग केला गेला. एका मोठ्या गरम पाण्याच्या भांड्यात एक बेडूक टाकले गेले. चटका बसल्यामुळे त्याने तत्काळ भांड्याबाहेर उडी मारली. त्या वेळी पाण्याचे तापमान मोजण्यात आले. त्यानंतर एका बेडकाला थंड पाणी असलेल्या भांड्यात टाकण्यात आले. अगदी हळू त्या पाण्याचे तापमान वाढविण्यात आले. वाढत्या तापमानाशी बेडूक जुळवून घेत जाते. जेव्हा तापमान खूप जास्त वाढते त्यावेळी तो बेडूक मरतो, पण पाण्याच्या बाहेर उडी मारत नाही. समाजाचीही मानसिकता अनेकदा अशीच असते. एकदम मोठे संकट आले की तो जागा होतो. पण चोरपावलांनी येणार्‍या संकटांची त्याला जाणीव होत नाही. परिस्थितीशी तो जुळवून घेतो. म्हणूनच वर्षानुवर्षे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, विषमता सुरूच असते. खरे तर त्याचे परिणामही आपल्याला भोगावेच लागतात. पण आपण जागे होत नाही.
देशभक्ती, राष्ट्रवाद यावर आज सर्वत्र चर्चा आणि वादही सुरू आहेत. आपल्या देशाविषयी, राष्ट्राविषयी जागरूक असणे, हे देशभक्तीचे पहिले लक्षण आहे. युद्धजन्य स्थिती असली की देशभक्तीची लाट येते. सैनिक देशाच्या संरक्षणाकरिता सीमेवर लढत असतात. प्रसंगी प्राणाचे बलिदानही देतात. आपल्यावर देशासाठी प्राणार्पण करण्याचा प्रसंग अपवादानेच येऊ शकतो. राष्ट्र म्हणजे संस्कृती. त्याच्या संरक्षणाकरिता सीमेच्या आत आपण शूर नागरिक काय पराक्रम करतो? साधारण परिस्थितीत रोजच्या सामान्य जीवनात दिसणार्‍या देशभक्तीमुळेच देश खरा समृद्ध आणि संस्कृतीसंपन्न होत असतो.
तीस-पस्तीस वर्षांपूर्वी एका संस्थेने किशोरवयीन शालेय मुलांसंबंधी एक सर्वेक्षण केले होते. त्या वेळी या वयातील मुलांच्या प्रमुख समस्या अशा होत्या,… एकमेकांच्या अंगावर शाई फेकणे, दप्तरातल्या वस्तू चोरणे, शिक्षकांशी उद्धट वर्तन, चोरून सिनेमा पाहणे, मारामारी करणे इत्यादी. याच वयोगटाच्या महानगरातील मुलांचे नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले. या वेळी नोंदवलेल्या प्रमुख समस्या अशा… खर्रा, सिगारेट, बियर, दप्तरात चाकू बाळगणे, वर्गातील मुलांना पैसे मागणे, शिक्षकांना मारण्याची धमकी देणे, मुलींची छेड काढणे, प्रेमभंग, अश्‍लील साईट्‌स पाहणे इत्यादी. विशेष म्हणजे बियर दारू नसते, असे बहुतांशी मुलांनी मत दिले. हा बदल पाहून आपले डोळे फाटतील. आपण देशभक्त असू तर सुजाण नागरिक घडविण्यासाठी पालक आणि शिक्षक म्हणून घराघरांमध्ये आणि शाळांमध्ये आपण नक्की काय करतो हा प्रश्‍न गंभीरपणे स्वतःला विचारला पाहिजे.
आपल्या देशाला आपण भारतमाता म्हणतो. या मातीवर आपले प्रेम आहे. विवेकानंद विदेशातून परत आल्यानंतर मायभूमीवर पाऊल ठेवल्यावर प्रथम त्यांनी मातीला वंदन केले व ती अंगाला लावली. कोठेही कचरा टाकताना व थुंकताना ही भावना आपल्या मनात येते? मायभूमीला गलिच्छ करताना आपली देशभक्ती कोठे जाते? कचरा म्हणजे काय? काच, कागद, कापड, प्लॅस्टिक, धातू या कोरड्या कचर्‍याचे पुनर्निमाण होऊ शकते. अन्य ओल्या कचर्‍याचे खत बनते. मातीला प्रदूषित करणार्‍या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावता येते. माझ्या मातीला सुंदर, स्वच्छ व निरोगी ठेवणे कोणाची जबाबदारी आहे? देश म्हणजे देशातील माणसं. आजही सर्वांना पुरेसे अन्न, पाणी, वस्त्र, वीज, अशा गोष्टी उपलब्ध नाहीत. आपण कार्यक्रम करताना किती मोठ्या प्रमाणात उधळपट्‌टी करतो. अन्न, पाणी, वीज अशा कितीतरी गोष्टींची अक्षरशः नासाडी करतो. साधेपणाचे आणि काटकसरीचे मूल्य आपण जोपासू शकत नाही का? डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मुसलमान असूनही त्यांच्या काळात त्यांनी राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी केली नाही. स्वतःचे पैसे टाकून तो खर्च ते अनाथाश्रमास देत असत. आपली संपत्ती वाढावी याची सर्वच चिंता करतात. पण राष्ट्राची संपत्ती वाढावी असा प्रयत्न करणे म्हणजेही देशभक्तीच. त्याकरिता स्वदेशीची कास धरावीच लागेल. राष्ट्रीय संपत्तीचा नाश होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल.
सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आपण प्रतिज्ञेत तर म्हणतो. पण प्रत्यक्षात आपण विशिष्ट जातीचे, पंथाचे, भाषेचे, प्रांताचे व पक्षाचे असतो. आणि त्यानुसारच वागतही असतो. अर्थात याचा अर्थ सर्वत्र अंधार आहे, असा नाही. आशा वाटावी असा देशभक्तीचा एक सकारात्मक प्रवाहही अस्तित्वात आहे. केवळ बेंबीच्या देठापासून ‘भारतमाता की जय’ ओरडल्याने देशभक्ती सिद्ध होत नसते. रोजच्या जीवनात शतप्रतिशत त्याचे प्रतिबिंब दिसेल, असा प्रयत्न करावा लागतो.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११