सहकार ही तपस्येची, समर्पणाची परंपरा

- महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांचे प्रतिपादन - स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे जन्मशताब्दी वर्ष

0
243

तभा वृत्तसेवा
नागपूर, २४ सप्टेंबर
पूर्वीच्या काळात एक वडिल आणि पाच मुले एका घरात राहण्याची परंपरा होती. मात्र, नव्या युगात जगताना पाच मुलांच्या बंगल्यात पिता कितपत सुखी राहिल हा प्रश्‍न आहे. आपले व्यक्तीमत्त्व हे वडिल आणि पाच मुले एका घरात राहणार्‍या परंपरेतून घडले. ही परंपरा ९० वर्षापासून सहकाराच्या रुपाने टिकली आहे. सहकार ही तपस्येची आणि समर्पणाची परंपरा आहे. असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे महानगर सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी केले.
सहकार भारती, नागपूर महानगरच्या वतीने सहकार भारतीचे संस्थापक आणि प्रणेते स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षातील पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार भारती विदर्भ प्रांताचे अध्यक्ष केशवराव दांडेकर व आ. अनिल सोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना श्रीधरराव गाडगे यांनी, लक्ष्मणरावांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यात सहकार क्षेत्र आधी आले. सहकार भारती त्यानंतर आली. मात्र, सहकार क्षेत्राविषयी सामान्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्याचे कार्य सहकार भारतीने केले. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांनी तरुणांना केलेल्या ‘घरदार सोडा देशासाठी बाहेर पडा’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लक्ष्मणराव घराबाहेर पडले. आणि संघकार्याला आपले अवघे जीवन समर्पित केले. कार्यकर्ता सांभाळण्याचे, त्यांच्यात प्रेरणा निर्माण करण्याचे कौशल्य लक्ष्मणरावांमध्ये होते. ते कार्यकर्त्यांच्या सगळ्या गोष्टीचे अध्ययन करीत असत. कार्यकर्त्या मधील अहंकार भाव नष्ट करण्याचे कार्य त्यांनी केले. लक्ष्मणराव संघाच्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार होते. अशा लक्ष्मणरावांनी घडवलेला माणूस आज देशाच्या राजसिंहासनावर आहे.ते आराध्य आहेत. त्यांच्या कार्याचे चिंतन, मनन करून त्या मार्गाने कार्य केल्यास तीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.
अनिल सोले म्हणाले, सहकार क्षेत्र सामान्य व्यक्तीपर्यत पोहचावे या दृष्टीने त्यांनी प्रवास केला आणि सहकार भारतीची स्थापना केली. जे सहकार क्षेत्राकडे मिशन नाही तर व्यापार म्हणून पाहत होते. अशा लोकांचा सहकार क्षेत्रात शिरकाव झाला. या भावनेचा नाश करायचा आणि सावकाराच्या जाचातून सामान्यांना मुक्त करायचे या उद्देशाने सहकार भारतीची स्थापना झाली. सहकार क्षेत्रातील संघटनेची आताच्या काळात गरज आहे. सहकार क्षेत्राची गरज लक्षात घेऊन त्या दृष्टीने कार्य केल्यास लक्ष्मणरावांना खरी आदरांजली ठरेल.
केशवराव दांडेकर म्हणाले, समाजासाठी चांगले कार्य करावे या दृष्टीने सहकार भारतीची स्थापना झाली. शोषणमुक्त समाज घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण झाले. जिथे जिथे सहकाराचा प्रभाव कमी झाला तिथे तिथे शोषण वाढले. सहकार क्षेत्र विश्‍वासावर चालते. हा विश्‍वास सहकार भारतीने निर्माण केला. सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांनी सहकार भारतीला वेळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सहकार्‍यांनी कामावर प्रेम करून सहकार क्षेत्र विकसित करावे.
कार्यक़्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष भरत महाशब्दे यांनी केले. संचालन अंजली मुळे यांनी केले. सरचिटणीस मनोज पांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला किरण रोकडे, मोहन दाणी, अनिल सांबरे, श्रीपाद रिसालदार, चेंडके सर, संजय भेंडे, सुधीर दफ्तरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.