अंत्रावरणदाह!

0
157

उदराच्या आणि कटिराच्या पोकळीत अंत्रावरण नावाच्या पडद्याने निरनिराळी इंद्रियं आच्छादित असतात. त्याचे अस्तरासारखे वेष्टन या पोकळीत असते आणि त्यातच दीर्घकाळ टिकणारा दाहक्रिया या नावाचा रोग उत्पन्न होतो. त्यालाच ‘अंत्रावरणदाह’ असं म्हणतात. इंग्रजीत याला ‘पेरिटानिटिस’ असंही म्हणतात. या रोगात दीर्घकाळ चालणारा दाह होतो, तो थांबता थांबत नाही. काळ हेच त्यावरचे औषध असते! मुळात मुंबईत ८२ जागा भाजपाला मिळाल्या आणि आपण ८४ वर थांबलो, हे शिवसेनेला मान्य करायला बराच अवधी लागेल, हे आम्हालाही मान्य आहे. मुंबईकरांनी दिलेल्या जनादेशातून हे पटवून दिले असले, तरी त्यांनी ते इतक्या लवकर मान्य करावे, असा आग्रह किंवा बालहट्‌ट आम्ही मुळीच करणार नाही आणि तसा आमचा प्रयत्नही नाही. आतून-बाहेरून अंत्रावरणदाह होत असताना तशी हिंमत कोण करेल बरे? पण, आपला दाह भळभळत असताना आपण लोकशाही व्यवस्थेची किती थट्‌टा उडवितो, याचे भान मात्र प्रत्येकाने ठेवले पाहिजे. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची अपेक्षा आम्ही क्षणिक सोडून दिली, तरी या राज्यातील जनतेची तशी इच्छा असेल, तर त्यांना कसे थांबविता येणार? कधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकार, लोकायुक्त, विरोधी पक्षनेते यांना बसविण्याची मागणी करायची, तर कधी उपलोकायुक्त सर्व शहरांसाठी नेमण्याची मागणी करायची. हा काय भातुकलीचा खेळ वाटतो का यांना? मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली जाते ती कशासाठी, हे ठाऊक आहे का यांना? मंत्रिमंडळ ही सामूहिक जबाबदारी आहे आणि तेथे शिवसेनेचे मंत्री आहेतच ना? की जेथेजेथे शिवसेना तेथेतेथे उपलोकायुक्त बसवा, कारण आमचा आमच्यावरही विश्‍वास नाही, असे शिवसेनेला सांगायचे आहे? मंत्रिमंडळात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला या राज्याच्या सार्वभौम सभागृहाचा भक्कम आधार असतो आणि तेथे केवळ विरोधी पक्षनेता नाही, तर राज्यातील जनतेने निवडून दिलेले सर्वच्या सर्व २८८ सदस्य असतात, याचेही शिवसेनेला भान नाही की काय? मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका परवाच्या पत्रपरिषदेत मांडली होती. मुंबईकरांनी पारदर्शितेला दिलेल्या जनादेशाचा सन्मान करताना, मुंबई महापालिकेत कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला, तेव्हा तीन माजी सनदी अधिकार्‍यांची एक समिती गठित करण्याचा आपला मनोदय बोलून दाखविला. आता देवेंद्र फडणवीस हे काही करून दाखविले, असे नुसते बोलणार्‍यांच्या रांगेतील नाहीत. राज्यातील सर्वच महापालिकांच्या कामांत पारदर्शिता यावी, यासाठी ही समिती असेल, असेही त्यांनी त्या वेळीच स्पष्ट केले होते. असे करत असताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, संपूर्ण राज्यासाठी अर्थात सर्वच शहरांसाठी लोकायुक्त आहेच. पण, मुंबई शहराचे आकारमान आणि लोकसंख्या पाहता या शहरासाठी स्वतंत्र उपलोकायुक्त नेमण्याचेही सरकारने ठरविले आहे. आता यात गैर काय? आपला कारभार पारदर्शी असेल तर एक काय, दहा उपलोकायुक्त नेमा ना! असे म्हणण्याची हिंमत हे नेते का करीत नाहीत? नागपूरमध्ये उपलोकायुक्त नेमा, वर्षा निवासस्थानासाठी नेमा, अशा पोरकट आणि पोचट मागण्या करण्याचे काम लेखणीबहाद्दर करीत होते, आहेत आणि भविष्यातही करीत राहणार…वर्तमानपत्रांमध्ये लेखणी कशासाठी झिजवायची असते, याचे तर किमान भान ठेवायला हवे ना! मालक-संपादकांच्या बचावासाठी, हितरक्षणासाठी अलीकडे वर्तमानपत्र चालविण्याची प्रथा असली, तरी सामान्यजनांच्या व्यथांना व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणूनच त्याचा अधिक स्वीकार केला गेला पाहिजे, असे आमचे मत आहे आणि त्याचा स्वीकार सर्वांनी करावा, यासाठी आम्ही आग्रह करणे, हे त्या व्यवस्थेतील एक पाईक म्हणून आमचे कर्तव्यही ठरते. उद्या हे असेही म्हणतील की, वर्षावरील प्रत्येक खोलीसाठी वेगळा उपलोकायुक्त नेमा, नव्हे, प्रत्येक खोलीत बसणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी एक उपलोकायुक्त नेमा! आपण काय बोलतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या औकातीपेक्षा किती जास्त बोलतो, याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. निवडणुकीत एकदा जनतेने निकाल लावला की, त्याचा प्रत्येकाने आदर करणे आवश्यक आहे. निकाल अनुकूल असेल, तर त्याचा सन्मान करावा, प्रतिकूल असेल तर चिंतन करावे, या सर्वमान्य बाबी आहेत. मुंबई महापालिकेचा राज्यकारभार हाकण्यासाठी अवघ्या दोन का होईना, पण जास्त जागा आपल्याला मिळाल्या, तर नव्या जोमाने कामाला लागायला हवे. भारतीय जनता पक्षाला मुंबईच्या महापौरपदावर आपला उमेदवार सहज निवडून आणता आला असता. पण, असे असताना आपल्यासाठी त्यांनी मुंबईत सत्ता ठेवली, यात आनंद मानायचा सोडून, बोलता येत नाही म्हणून काहीही लिहायचे, यात कसले हशील? संधी मिळूनही लोकशाही समजत नसेल, तर ती एकदा नीट समजून घ्यावी. प्रबोधनकारांचा वारसा चालविणार्‍यांचे प्रबोधन करणारे कमी पडत असतील, तर नि:संकोच दुसर्‍यांची मदत घ्यावी. त्यात कुठलाही कमीपणा वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. माणसानं कायम विद्यार्थी असावं. हे आम्ही म्हणत नाही, तर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे हे विधान आहे. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर माणूस नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि त्याने शिकत राहायलाही हवे. त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. शिक्षण अपुरे असेल, तर उगाच स्वत:बद्दल अनेक गैरसमज होत राहतात आणि आपल्याही हातून गैरसमज पसरविण्याचेच काम होत राहते. आपला गर्भपात झाला आहे, हे समजूनही उमजत नाही. वांत्या होत नाहीत, पण वारंवार त्या काढण्याचे सोंग केले जाते. पोटात गर्भ नाही, पण तरीही गर्भ शिल्लक उरला की काय, अशी शंका उगाच घेतली जाते. आता आणखी कोणत्या डॉक्टरला तिची तब्येत दाखवावी, असा गहन प्रश्‍न या राज्यापुढे निर्माण झाला आहे. राज्यातील अन्य महापालिकांच्या बाबतीत बोलण्याचे काही कारणच नाही. पण, मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या अहंकाराचा गर्भपात झालाच आहे! अहंभाव बाजूला सारून पुन्हा एकदा कामाला लागण्याचा सुकर आणि सर्वमान्य मार्ग न पत्करता उगाच गरळ ओकत राहायची, याची तिला आता सवयच झाली आहे. सुधारण्याची संधी जेव्हा जनता देते, तेव्हा त्या संधीचे सोने करायचे असते. ती दवडण्यात काहीच अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी उपलोकायुक्त नेमण्याची मागणी याच अक्कलशून्यतेतून पुढे आली आहे! अकलेने कांदे सोलायलाही काहीच हरकत नाही, पण सडके कांदे सोलायचे काम अकलेला करावे लागत असेल, तर कुणाची कीव करावी? त्याला काय म्हणावे? आम्हाला हे मान्य आहे की, सडके कांदे फेकूनच द्यायचे असतात. पण, त्याचे भान त्यांना नसेल, तर आपण तरी काय करणार…?