तरीही मग मुली का नकोत?

0
130

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ वगैरे सुवचनांचा आपल्या संस्कृतीत भरपूर भरणा आहे. पण, प्रत्यक्षात मात्र आजही ‘मुलगीच झाली होऽ…’ असं आंबट चेहर्‍यानं सांगितलं जातं. इतकंच काय, तर मुलीच जन्माला घातल्यात म्हणून सासरची मंडळी सुनेचा अनन्वित छळ करतात. पण, हा विचार कसा यांच्या मनात येत नाही की, आपल्या मुलाच्या तसेच इतरही मुलांच्या वैवाहिक सुखी जीवनासाठी एका मुलीचीच तर आवश्यकता असते. याच भ्रामक समजुतीमुळे सर्वंकष तर्‍हेने, सखोल विचार करणे सोडून सर्रास कन्याभ्रूणहत्या समाजात घडत आहेत. यासारखे निंदनीय, लांच्छनास्पद कृत्य आजच्या या २१ व्या शतकात दुसरे कोणते असू शकणार?
‘पहिली बेटी, धनाची पेटी’ ही म्हण कोणे एके काळी आपल्याकडे प्रचलित होती, ही आता ‘आठवणी’दाखल शिल्लक राहिलेली गोष्ट आहे! आज मात्र मुली नसलेली कुटुंबंच्या कुटुंबं हजारोंच्या संख्येनं आसपास निर्माण होतात. ‘अगदी वाया गेलेला दिवटा असला तरी चालेल, पण मुलगा हाच वंशाचा दिवा!’ हे खूळ आजही अशिक्षित काय, पण सुशिक्षित समाजातही घट्‌ट मूळ रोवून उभं आहे. पण, वंशाचा दिवा जन्माला घालणारी एक मुलगीच असते ना! फक्त उच्चभ्रू समाजात वरकरणी मुलगी झाली म्हणून विरोध न दर्शविता ‘मुलगा झाला असता तर बरे झाले असते’ अशी खंत मात्र व्यक्त केली जाते. म्हणजे शेवटी नाइलाज म्हणून मुलीला स्वीकारावे लागते- नकोशी म्हणूनच!
गेल्या २५ वर्षांत या आपल्या भारत देशात समृद्ध परंपरा असल्याचं गाणं आपणच गात असताना, जवळजवळ एक कोटी मुलींची जन्माला येण्यापूर्वी गर्भातच हत्या केली गेली. याचा अर्थ, दर महिन्याला चाळीस हजार मुलींचा जन्माला येण्याचा हक्क हिरावून घेतला गेला. हे वास्तव म्हणजे आपल्या समृद्ध म्हणवल्या जाणार्‍या भारताला एक प्रकारचा कलंक तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन विचार केला, तर पुढील काही वर्षांत सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक संतुलन मुलाच्या अट्‌टहासापायी आपणच आपल्या हातांनी बिघडवून घेणार असल्याची ही नांदी आहे.
वंशवृद्धीसाठी मुलाइतकीच मुलीचीही गरज आहे, हे विसरून चालणार नाही. हे उघड सत्य सर्वांना माहीत असूनही ‘माझ्या घरात मात्र मुलगाच हवा…’चे पालुपद घरोघरी आळवलं जात आहे. त्यामुळेच समाजातल्या संपन्न, सुशिक्षित, उच्चभ्रू, कनिष्ठ आणि मध्यमवर्ग अशा सर्व थरांत कन्याभ्रूणहत्येचे प्रकार घडताना दिसतात. यातूनच समाजातलं मुलींचं प्रमाण घटत आहे. मुलींच्या या घटत्या प्रमाणाची स्थिती उत्तरेकडील राज्यात तर अधिकच वाईट आहे. दिवसेंदिवस मुला-मुलींच्या संख्येतला हा फरक जर वाढतच राहिला, तर देशातल्या काही भागांत पूर्वी सुरू असलेली बहुपतित्वासारखी प्रथा पुन्हा सुरू होईल. परिणामत: मुलींवरचे लैंगिक अत्याचार अधिकच वाढतील.
खरं तर मेघालयसारख्या ठिकाणी आजही मातृसत्ताक पद्धती आहे. अनेक आदिवासी पाड्यांमध्येही मुलांपेक्षा मुलींची हजारी संख्या जास्त आहे. सुशिक्षितांनी, ज्यांना अशिक्षित समजल्या जाणार्‍या अशा समाजघटकांकडून मुलींबाबतचा हा सहृदय दृष्टिकोन सर्वत्र स्वीकारला जाणे गरजेचे आहे.
आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये मुली, मुलांच्या केवळ बरोबरीनेच नव्हे, तर काही अधिक पावले पुढे जाऊन यशस्वीपणे कार्यरत आहेत. कार्यक्षमता, निर्णयक्षमता, चिकाटी, जिद्द, सोशीकता, बुद्धिचातुर्य, आत्मनिर्भरता या गुणांमुळे सक्षम बनलेल्या मुली बाहेरच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना आज आपण पाहतोच आहोत. पण, याशिवाय संसाराचा गाडा पुरुषाविनाही एकटीने सुचारू रूपाने त्या चालविताना दिसत आहेत. आज बेरोजगार युवक, पुरुष अनेक घरांतून दिसतात. पण, प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत स्वत:तील कार्यसामर्थ्य ओळखून, पडेल ती कामे करून, त्या कार्यात सर्वार्थाने झोकून देऊन, स्त्रिया अशा मोडकळीस आलेल्या संसाराचा भार एकटीने यशस्वीपणे पेलतानाचे चित्र अनेक घरांतून आपल्याला पाहावयास मिळत आहे. स्वत:च्या इच्छा, कामनांची आहुती देऊन, सर्वस्वाचा त्याग करून आपल्या कच्च्याबच्चांना सुजाण आणि सुसंस्कारित नागरिक बनविण्यासाठी धडपडत आहेत. थोड्याशाही अपयशाने, संकटाने, समस्यांनी खचून जाणार्‍या, मानसिक रीत्या दुर्बल झालेल्या पुरुषाला आपल्या प्रेमाने, आपल्या शक्तीने ताठ उभे राहाण्यास हात देणारी केवळ एक स्त्रीच असते! म्हणूनच म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे सामर्थ्य असते!
मेल्यानंतर अग्नी देण्यासाठी, खांदा देण्यासाठी, श्राद्धादी कर्मे करण्यासाठी मुलगाच पाहिजे, या समजुतींनादेखील छेद देण्यासाठी महिला पुढे सरसावल्या आहेत. वृद्धापकाळी आई-वडिलांना अडगळ समजून वृद्धाश्रमात नेऊन टाकणारे चिरंजीव आई-वडिलांना किती मानसिक क्लेष देतात, हा विचारदेखील असहनीय आहे. मात्र, स्वत:चा संसार, सासू-सासरे यांचा सांभाळ करून आई-वडिलांचीही मायेने जबाबदारी स्वीकारणार्‍या मुली माय-बापांना स्वर्गसुख देऊन जातात! तरीही मग मुली का नकोत…?
बरे… केवळ घराला हातभार लावणे आणि संसाराचा गाडा रेटणे यासाठीच अर्थार्जन, एवढेच मुलींचे क्षेत्र आज सीमित राहिले नसून, पत्रकारिता, समाजसेवा, मानवाधिकार, संगीत, लेखन, वक्तृत्व, न्यायदान, अभिनय, अंतराळ, क्रीडा, राजकारण इ. सर्वच क्षेत्रांत त्यांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. भारतीय पत्रकार मालिनी सुब्रमण्यम् हिला, नक्षल प्रभावित बस्तर क्षेत्रात तिने केलेल्या पत्रकारितेसाठी ‘इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम’ अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. स्त्रियांच्या, मुलींच्या दृष्टिकोनातून तर हे अतिशय धाडसी पाऊल आहे. कारण भल्याभल्यांची भंबेरी उडवणारे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणताच भीतीने अंगावर काटा उभा राहतो.
गेल्या वर्षीचा म्हणजे २०१६ चा ‘राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना’ पुरस्कार प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांना, त्यांनी सांप्रदायिक शांती आणि सद्भावना वाढविण्याच्या दृष्टीने दिलेल्या योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. बंगळुरूच्या सुभाषिणी वसंत हिला, संकटात लोकांची मदत करण्यासाठी, तसेच सैनिकांच्या विधवांना सक्षम करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘नीरजा भानोत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्लिपिंग ऑन ज्युपिटर’ या साहित्याच्या भारतीय लेखिका अनुराधा रॉय यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘साऊथ एशियाई लिटरेचर’ पुरस्कार देण्यात आला.
विराट कोहली, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजामुळे भारतीय क्रिकेटचे कौतुक होत असले, तरी २०१६ मधील महिला क्रीडापटूंची कामगिरी देदीप्यमान अशीच मानायला हवी. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझ पदक जिंकून आपल्या देशाचा तिरंगा फडकवत ठेवण्याची कामगिरी केली आहे. अन्यथा भारताला रिओ येथून रिक्त हस्ते परतावे लागले असते. भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार्‍या या दोन भारतीय महिलाच ना! थोडक्यात सांगायचे म्हणजे, अशा प्रकारे स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये लपलेले गुणकौशल्य देशाचा उद्धार करणारेच आहेत, नव्हे, तर त्याच देशाचा गौरव आहे, हेच म्हणणे सयुक्तिक ठरेल!
काळ बदलतो आहे. या बदलत्या काळानुसार प्रत्येकाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. भविष्यातला अंधार दूर सारायचा असेल, समाजाचे स्वास्थ्यसंतुलन बिघडू द्यायचे नसेल, तर ‘मुली हव्या आहेत’ ही काळाची साद ऐकू या आणि जागे होऊ या- प्रत्येक शक्तिरूपाचे आनंदाने स्वागत करायला…!!!
अश्‍विनी कुळकर्णी,८६०००४३८६६