…आत्मा चि रिपु आपला

0
87

एक दिवस एका कंपनीच्या सूचना फलकावर सकाळीच एक सूचना लिहिलेली असते- ‘तुमच्या व कंपनीच्या विकासातील मुख्य अडथळा असलेल्याचे काल रात्री निधन झाले. जीमच्या सभागृहात अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.’ ही सूचना वाचल्यानंतर प्रत्येक कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावर दुःख दिसत होते आणि प्रश्‍नही डोळ्यांसमोर येत होता, अरे, पण कोण? सर्वांनी जीममध्ये गर्दी केली. एकेक कर्मचारी शवपेटीजवळ जात होता. आत पाहिल्यानंतर एकदम निःशब्द होऊन बाजूला जाऊन उभा राहात होता. त्यांच्या अंतर्मनाला काहीतरी स्पर्श झाल्याचे जाणवत होते. कोण होते त्या शवपेटीत? त्यात होता एक आरसा! आत डोकावून पाहिल्यानंतर स्वतःचाच चेहरा दिसत असे आणि त्याच्या बाजूला ठळक अक्षरांत लिहिले होते, ‘तुमच्या विकासातील मुख्य अडथळा तुम्हीच व क्रांतिकारी बदल करणारेही तुम्हीच.’ कंपनीतील कर्मचार्‍यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा फारच विलक्षण प्रयोग होता.
मधूनमधून स्वतःकडे असे आरशात पाहणे आवश्यकच असते. बदल सर्वांनाच हवा असतो, पण माणसं स्वतःला बदलायला तयार नसतात. स्वतःकडे पाहिल्याशिवाय स्वतःत बदलाची प्रक्रिया सुरूच होत नाही. एक शायर म्हणतो,
उम्रभर एक गलती मैं बार बार करता रहा,
धूल चेहरेपर थी और मैं
आईनाही साफ करता रहा…
आपल्यात बदल करण्याची गरज आपल्याला कधी वाटतच नाही. त्यामुळे आपण आपल्यालाच मर्यादा घालून घेतो आणि त्याचीही जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतो. बदल नाकारणे म्हणजे आपल्यातील असीम क्षमतांचा अकाली मृत्यू ओढवून घेणेच असते. माणूस एक विचित्र प्राणी आहे. संपूर्ण प्राणिसृष्टीत फक्त माणूसच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो. स्वतःचे नुकसान करून घेतो. विवेकाचे वरदान लाभूनही अंधाराचे शापित जीवन जगतो.
अनेक माणसं स्वतःची एक आत्मप्रतिमा तयार करतात. मी असा, मी तसा, माझा स्वभाव असाच आहे, मला हे पटत नाही, मला हेच आवडते, माझे बोलणे असेच आहे… असे कितीतरी ‘मी’, ‘मी’ या प्रतिमेत समाविष्ट असतात. माणूस या पिंजर्‍यात अडकतो, त्या प्रतिमेचे संरक्षण करतो. त्या प्रतिमेशी सुसंगत वागतो. बेड्या अलंकार म्हणून मिरवतो! आपल्यात बदल करणे म्हणजे जणूकाही आपला पराभव आहे, असे त्याला वाटते. कधीकधी तर नकारात्मक वृत्ती निर्माण होते. समोरचा ‘बदला’ म्हणतो ना, मग मुद्दाम बदलणार नाही. तुम्हाला हवे ते नाहीच करणार व जे नको म्हणता तेच करीन, अशी विरोधी मानसिकता काही संबंधांमध्ये पाहायला मिळते. आपल्याला हे कळले पाहिजे की, दुसर्‍या कुणावरही आपण सूड उगवत नसतो, तर स्वतःचेच नुकसान करून घेत असतो.
आपण कधीतरी स्वतःकडे शांतपणे पाहिले, तर आपल्या सहज लक्षात येईल की, आपल्या जगण्यासाठी या साडेपाच फूट शरीरात किती यंत्रणा अव्याहत काम करीत असतात. किती वेळा आपण श्‍वास घेतो? किती वेळा आपले हृदय आकुंचन-प्रसरण पावत असते? कितीतरी प्रकारचे पाचकरस व हार्मोन्स शरीरात स्रवत असतात. कोट्यवधी पेशी अखंड कार्यरत असतात. मेंदू नावाची एक अद्भुत शक्ती तर अचाट काम करीत असते. प्रत्येक सेकंदाला तुमच्याकडून मिळणार्‍या माहितीवर प्रक्रिया करून तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करीत असते. विचार केला की आपण थक्क होतो. हे काय आपण फक्त कसंबसं जिवंत राहावे यासाठी? किरकोळ, क्षुल्लक आयुष्य जगण्यासाठी? एका परावलंबी बाळाला, खस्ता खाऊन जिवाच्या आकांताने आईबाप मोठे करतात, कशासाठी? दारू पिऊन लिव्हर खराब करण्यासाठी? सिगारेटने फुफ्फुस जाळण्यासाठी? कुठल्यातरी फालतू पोरीच्या प्रेमात पागल होऊन मरण्यासाठी? मग अक्कल मिळून उपयोग काय? व्यसनांच्या आणि उथळ भावनांच्या गुलामीत बरबाद होईल पण बदलणार नाही, ही आत्मघाती वृत्ती कशासाठी? गरुडाचे पंख लाभूनही कोंबड्यांसारखे खुरटलेले आयुष्य का जगायचे?
आयुष्याचे मोल कळले, माझ्याकरिता मी जबाबदार आहे, याची जाणीव झाली की, माणूस स्वतःत बदल करतो. आपल्यातल्या दिव्यत्वाचा शोध घेतो. निर्जीव वस्तू स्वतःत बदल करून विकसित होत नाही. माणसातही त्याला स्थितिशील ठेवणारे जडत्व असते. त्याचबरोबर गतिशील करणारे चैतन्यही असते. आपला प्रवास जडत्वाकडे करायचा की चैतन्याकडे? शेवटी निवड आपल्याच हाती आहे. गीताईत म्हटलेच आहे,
उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी|
आत्मा चि आपुला बंधु
आत्मा चि रिपु आपला॥

रवींद्र देशपांडे