पेपरफुटी!

0
76

खूप पाऊस पडला की ढगफुटी झाली, असे म्हटले जाते. तसेच आता बारावीचा पेपर दररोज फुटू लागल्याने ‘पेपरफुटी’ हा शब्द कानी पडू लागला आहे. इयत्ता बारावीचे पेपर व्हॉटस् ऍपवर फुटण्याचे सत्र काहींच्या अटकेनंतरही सुरूच आहे. २ मार्च रोजी आधी मराठीचा पेपर, त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिसचा पेपर आणि काल गणिताचा पेपर सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी व्हॉटस् ऍपवर व्हायरल झाला. त्यामुळे एकूणच परीक्षा यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार कॉपीमुक्त महाराष्ट्राची घोषणा करते, कुणीही नापास होऊ नये म्हणून अभ्यासक्रमात बदल करते, तर दुसरीकडे त्याच यंत्रणेचे रखवाले पेपर फोडतात! खाजगी शिकवण्यांच्या बाजारामुळेदेखील, विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळावेत म्हणून शिकवणीवाले अवैध मार्गाने पेपर मिळवितात आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवितात. पेपरफुटीची डोकेदुखी ही फक्त यंदाची नसून, या पूर्वीच्या वर्षीदेखील पेपरफुटीच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. जे विद्यार्थी वर्षभर प्रामाणिक परिश्रम घेतात व अभ्यास करतात, अशा हुशार विद्यार्थ्यांना या प्रकारामुळे संताप सहन करावा लागतो. पूर्वी पेपरफुटीचे प्रकरण एखाद्या गावापुरते मर्यादित राहत होते. मात्र, आता तंत्रज्ञानामुळे एखाद्या ठिकाणी पेपर फुटल्यास तो सर्वत्र व्हायरल होतो. मराठीच्या पेपरनंतर काही दोषींना पोलिसांनी अटकदेखील केली. त्यानंतरही पेपरफुटीचे प्रकार बंद झालेले नाहीत. भ्रष्ट लोक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुसज्ज आणि लखलखीत खाजगी शिकवणी क्लासेसचे सर्वत्र पीक आले आहे. आपल्याकडे विद्यार्थी आकृष्ट करण्याच्या उद्देशाने आणि आपल्या क्लासेसमध्ये आलेले विद्यार्थी शंभर टक्के पास होतील, या आश्‍वासनाने खाजगी शिकवणीवालेदेखील परीक्षा केंद्रांवर आपल्या विद्यार्थ्यांसाठी सेटिंग करताना दिसून येत आहेत. सारे शिक्षण क्षेत्र मार्केटिंग आणि पैशाच्या बळावर उभे झाले असताना, पेपरफुटीसारख्या घटना आता किरकोळ समजल्या जात आहेत. अशा घटना दरवर्षी घडत असतात आणि दरवर्षी बारावीची परीक्षा पार पाडली जाते. परीक्षेच्या काळात पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकरण चर्चिले जाते आणि त्यानंतर शिक्षण विभागालाही यात रस राहत नाही. कॉपी आणि भ्रष्ट शिक्षण प्रणालीचा वापर करून यशस्वी झालेले विद्यार्थी जीवनात कुठला आदर्श पाळतील, याचा विचार आपण करणार आहोत की नाही?
कर चुकविणारे मोकळेच!
भारतातील काळा पैसा रोखण्यासाठी व कर चुकविणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना अंमलात आणत असले, तरी कर चुकविणारे मोकळेच असल्याने, कर भरणारे मात्र संताप व्यक्त करू लागले आहेत. भारतातील कित्येक धनाढ्य लोकांची आयकर खात्याकडे कुठलीच माहिती नाही. कितीतरी लोकांनी अद्यापही पॅनकार्ड काढलेले नाही किंवा ते व्यवहार करताना पॅनकार्ड नंबरही देत नाहीत. कित्येक कंत्राटदार शासकीय यंत्रणेत काम करतात, मात्र काम झाल्यानंतर त्या यंत्रणेकडे बिल सादर करताना वॅटचे बिल देत नाहीत आणि परस्पर देयके उचलून करचोरी करतात. मात्र, हे सारे गेल्या कित्येक वर्षांपासून मोकळेच आहेत. जो दरवर्षी कर भरतो, आपल्या उत्पन्नाचे विवरण आयकर खात्याला देतो, त्याच व्यक्तींना आयकर खात्याकडून वारंवार त्रास दिला जाते. त्यांच्या फाइल्स पडताळणीसाठी काढून विनाकारण त्यांना त्रास दिला जाते. त्यामुळे आता शासनाकडे प्रामाणिकपणे कर भरणारेदेखील त्रस्त झाले आहेत. जे लोक आपल्या संपत्तीची व व्यवहाराची संपूर्ण माहिती दरवर्षी आयकर खात्याला देतात, त्या लोकांच्या फाइल्समध्ये आयकर विभागाचे अधिकारी त्रुटी काढून त्यांना त्रास देतात. नंतर कर कमी करण्यासाठी किंवा लागलेला दंड माफ करण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतात. या सार्‍या प्रकारामुळे जे लोक कर चुकवितात तेच बरे आहेत, अशी भावना समाजातील कर भरणार्‍या व्यक्तींची झाली आहे. बेनामी संपत्तीकरिता शासनाने प्रॉपर्टी ऍक्ट लागू केला असून, बेहिशेबी संपत्ती बाळगणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, देशातील धनाढ्य आणि राजकारण्यांना अभय दिले जात आहे. निवडणूक लढण्यापूर्वी नावावर काहीच नसलेल्या कितीतरी राजकारण्यांकडे कोट्यवधीची संपत्ती जमा झाली आहे. मात्र, याचा जाब कुणीच विचारत नाहीत. छगन भुजबळसारख्या एखाद्याच भ्रष्ट राजकारणी नेत्यावर कारवाई होते. इतर नेते, व्यापारी, कंत्राटदार अजूनही मोकळेच आहेत. छोटे व्यावसायिक, छोटे कंत्राटदार, शासकीय नोकर यांच्याकडून मात्र न चुकता आयकर विभाग कर वसूल करते. कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी करताना आधी सर्वसामान्यांना त्रास दिला जातो. नियमावर बोट ठेवून त्याच्यावर दंड आकारला जातो. मात्र, जे वर्षानुवर्षे कर चुकवीत आहेत, ज्यांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केलेली आहे त्यांच्यावर कधी कारवाई होईल? असा प्रश्‍न विचारला जात आहे.
नंदकिशोर काथवटे,९४२३१०१९३८