दहशतवाद जगाच्या विकासाला बाधक : अन्सारी

0
261

वृत्तसंस्था
जकार्ता, ७ मार्च
आजच्या स्थितीत वाढता दहशतवाद हा जगाच्या सर्वांगीण विकासाला बाधक ठरत असून, त्यावर विविध देशांच्या सहकार्यातून मार्ग निघेल, असे मत उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी व्यक्त केले.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आयोजित २१ सदस्यीय देशांच्या प्रतिनिधींच्या इंडियन ओशन रिम असोसिएशन (आयओआरए) च्या परिषदेत ते बोलत होते.
उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले की, आयओआरएच्या सदस्य देशांनी आपल्या समस्या दूर करण्यासाठी परस्परांत सहकार्य, सौहार्दाची भावना बाळगणे गरजेचे आहे. सोशल मीडियातही दहशतवाद पसरला असून, त्याला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. आपला देश आणि आपल्या भोवतीच्या समुद्राला संकटमुक्त ठेवण्यासाठी सहकार्याची देवाणघेवाण व्हावी.
दहशतवादी कृत्यांत निरपराध नागरिकांचे बळी जात असून, अशात सहभागी असलेल्यांना अजिबात सहानुभूती मिळता कामा नये, असे त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले. दहशतवाद्यांना आसरा देणे, पैसा पुरविणे, शस्त्र पुरविणे आदी निषेधार्ह असून, या प्रकाराला कडक विरोध व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले. पाकिस्तान हा आयओआरएचा सदस्य नाही, हे विशेष.