स्वामी असीमानंद निर्दोष मुक्त; कोर्टाने ठरविले तिघांना दोषी

0
186

अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरण
वृत्तसंस्था
जयपूर, ८ मार्च
राजस्थानच्या अजमेर येथील दर्ग्यात २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने आज बुधवारी स्वामी असीमानंद आणि अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. तथापि, तिघांना मात्र दोषी ठरवले.
या प्रकरणाचा निकाल आज जाहीर करताना विशेष न्यायालयाने असीमानंद आणि अन्य पाच जणांना दोषमुक्त केले. तसेच, ज्या तिघांना दोषी ठरविले आहे, त्यात सुनील जोशी, भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे. यातील सुनील जोशी यांचे आधीच निधन झाले आहे. न्यायालयाचा निकाल ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
या बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण ९ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालय २५ फेब्रुवारी रोजी आपला निकाल देणार होते. मात्र, कागदपत्र आणि साक्षीदारांचा जबाब लिहिण्यासाठी जास्त वेळ लागणार असल्याने न्यायालयाने निकालासाठी ८ मार्च ही तारीख निश्‍चित केली होती.
अजमेर शहरातील प्रख्यात सुफी संत मोईनुद्दिन चिश्ती दर्ग्यात ११ ऑक्टोबर २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोट घडविण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी एकाच बॉम्बचा स्फोट झाला होता. या प्रकरणाचा तपास राजस्थान एटीएसने सुरू केल्यानंतर २०१० मध्ये देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे तपास सोपविण्यात आला होता. २० ऑक्टोबर २०१० रोजी या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. एनआयएने तपास सुरू केल्यानंतर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरत मोहनलाल रतेश्‍वर, भावेश अरविंदभाई पटेल आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती.