यंदाही मान्सून समाधानकारकच!

0
220

अल् निनोचा प्रभाव नाही
हवामान खात्याचे भाकीत
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ८ मार्च
यंदाच्या भारतातील मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव राहणार असल्याचा इशारा ऑस्ट्रेलियन वेध शाळेने दिला असतानाच, भारतीय वेधशाळेने मात्र दिलासा देणारे भाकीत आज बुधवारी वर्तविले आहे. भारतातील मान्सूनची अल् निनोच्या संकटातून मुक्तता होईल आणि यावर्षीही मान्सूनचा पाऊस समाधानकारक राहील, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले आहे.
पुढील एप्रिल महिन्यात आम्ही मान्सूनविषयी पहिला अंदाज व्यक्त करणार आहोत आि त्यानंतर मे महिन्यात ठोस अंदाज वर्तविण्यात येईल. त्याचवेळी अल् निनोचा मान्सूनवरील प्रभाव नेमका कसा राहणार आहे, हे स्पष्ट करण्यात येईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
अल् निनो परत येणार असल्याचा अंदाज यापूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनेही वर्तविला होता. अल् निनो परत आल्यास यावर्षी पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. सलग दोन वर्षे दुष्काळाच्या झळा सहन केल्यानंतर गेल्या वर्षी देशात सर्वत्रच चांगला पाऊस झाल्याने देशभरातील शेतकर्‍यांना फायदा झाला. शेतमालाचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले. मात्र, स्कायमेट आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या अंदाजानंतर मान्सून पुन्हा दगा देणार, या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला होता. तथापि, भारतीय हवामान खात्याच्या भाकितामुळे शेतकर्‍यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
अल् निनोच्या यंदाच्या प्रभावाविषयी बोलताना हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकारी डी. एस. पै म्हणाले की, सध्या तरी भारतीय मान्सूनवर अल् निनोचे सावट दिसत नाही. तथापि, एप्रिल-मे नंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. अल् निनो हा घटक अजूनही हवा तसा प्रभावी झाला नसल्याने त्याचे संकट येईपर्यंत भारतातील मान्सूनचा कालावधी संपलेला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर अनेक देशांच्या हवामान खात्यांनी यावर्षीच्या मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने २८ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार. पॅसिफिक महासागरात अल् निनोच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारी स्थिती दिसून आली आहे.
अल् निनोचा असा असतो प्रभाव
प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने सामान्यपणे दक्षिण अमेरिकेकडून आशियाच्या दिशेने वाहणारे वारे मंदावतात. त्याचा भारतातील मोसमी पावसावर परिणाम होतो. अशा वेळी भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आढळते. गेल्या १४० वर्षांत निम्म्याहून अधिक वेळा भारतातील प्रमुख दुष्काळांची वेळ अल् निनो या घटकाशीच जुळून आली आहे.