बाजार समित्यांच्या सभापतींचे आंदोलन

0
55

त्वरित तूर खरेदी करण्याची मागणी
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ८ मार्च
जिल्ह्यातील अकरा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात हजारो क्विंटल तूर पडून असल्याने आणि त्यातच सहा दिवसांपासून नाफेडची खरेदी बंद असल्याने शेतकर्‍यांच्या रोषास सभापती व संचालकांना सामोरे जावे लागत आहे.
नाफेडने त्वरित तूर खरेदी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे बाजार समितीच्या सभापतींनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले असून नाफेडद्वारे केवळ ५४ हजार क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली आहे. मागील सहा दिवसांपासून नाफेडने बारदाना संपल्याने तूर खरेदी बंद केली आहे. खाजगी व्यापारी ३५०० ते ४ हजार भाव देत आहेत. तर नाफेड ५०५० रुपये भाव देत असल्याने शेतकर्‍यांनी नाफेडलाच विक्री करायची म्हणून तूर आणल्याने बाजार समितीच्या आवारात हजारो क्विंटल तूर पडून आहे. मात्र खरेदीला उशीर होत असल्याने स्थानिक यंत्रणा म्हणून बाजार समितीला शेतकर्‍यांच्या रोषास समोरे जावे लागत असल्याचे सभापतींनी सांगितले.
स्थानिक स्तरावर बारदाना उपलब्ध करून द्यावा, नाफेडने त्वरित खरेदी सुरू करावी, शेतकर्‍यांना तुरीचे पैसे आठवडाभरात द्यावे व तूर खरेदीची मुदत १५ मेपर्यंत वाढवावी, अशा आशयाचे निवेदनही यावेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
यावेळी मारेगाव बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, यवतमाळचे रवींद्र ढोक, बाभुळगावचे नरेंद्र कोंबे, आर्णीचे राजेंद्र पाटील, घाटंजीचे अभिषेक ठाकरे सोबतच संचालक सुरेश चिंचोळकर, उपसभापती महेंद्र घुरडे, जिप सदस्य अरुणा खंडाळकर, बाजार समिती सदस्य छाया शिर्के, संचालक दिनेश गुल्हाने, अमोल कापसे व श्याम जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.