महिला दिनी झाला आंतरजातीय विवाह

0
82

जुन्या प्रेमाला आला नवा बहर
– सलोखा महिला समूपदेशन केंद्राचा पुढाकार
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ८ मार्च
अजाणत्या वयात मनात घर केलेल्या एका प्रेमी युगलाने घरचांच्या विरोधाला न जुमानता सलोखा महिला समूपदेशन केंद्राच्या पुढाकाराने महिला दिनी मानवता मंदिरात आंतरजातीय विवाह केला. यानिमित्त जिल्हा परिषदेत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सलोखा समूपदेशन केंद्राचे प्रमुख आणि जिपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती देवानंद पवार, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, विधिसल्लागार ऍड. प्रदीप वानखेडे, माधुरी अराठे, डॉ. मून आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. स्वागत समारंभाचे प्रास्ताविक देवानंद पवार यांनी, तर संचालन व आभारप्रदर्शन हेमंत कांबळे यांनी केले.
देवानंद पवार आणि सलोखा केंद्राच्या समूपदेशक शालिनी धारगावे यांनी दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा या गावात राहणार्‍या सावित्री लक्ष्मण ढोके व शेंद्री (बुद्रुक) येथील धनंजय राजेंद्र वानखेडे या दोन वेगवेगळ्या जातीतील विवाहोत्सुक प्रेमी युगुलाचे व्यवस्थित समूपदेशन करून बुधवार, ८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मानवता मंदिरात साध्या पद्धतीने विवाह करून दिला.
धनंजय व सावित्री हे दोघेही सामाजिक कार्यकर्ते असून उच्च विद्याविभूषित आहेत. धनंजय याने मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली असून सावित्रीनेही बीएड पदवी घेत कला विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सोबतच तिला अभिनयाची आवड असून तिने दूरदर्शनचे आनंद कसंबे दिग्दर्शित ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’, मतदान जागृती अंतर्गत ‘चला मतदान करू या’ व ‘मी बळिराजा’ या लघुपटांत मुख्य अभिनय केला आहे. सावित्री ढोकेचा उत्कृष्ट अभिनयासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
धनंजय शेतिकामासोबत सामाजिक कार्यातही अग्रेसर असून त्याने न्याय्य हक्कासाठी विविध आंदोलने केली आहेत. हे दोघेही दारव्हा येथील माध्यमिक शाळेत वर्गमित्र होते. शाळा सोडल्यानंतर आपआपल्या जीवनात पुढे गेलेल्या या दोघांची नियतीने दोन वर्षांपूर्वी अचानक भेट घालून दिली. सामाजिक कार्याच्या आदानप्रदानातून दोघांतील प्रेम कधी बहरत गेले हे त्यांनाही कळलेच नाही. विवाह करून एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या या प्रेमी युगुलासमोर जातीच्या भिंती आड आल्या. अशा कठिण प्रसंगात सावित्रीने धीर न सोडता समूपदेशन केंद्राच्या माध्यमातून हा तिढा सोडवायचे ठरवले. यात देवानंद पवार, शालिनी धारगावे व आनंद कसंबे यांनी योग्य मार्गदर्शन करीत त्यांचा विवाह ठरवला. महिला दिनाचे औचित्य साधत त्यांनी बुधवार, ८ मार्च रोजी मानवता मंदिरात एकमेकांना हार घालून विवाह केला.