अभिनंदन! विराट क्रिकेट टीमचे

0
80

मनोगत
बंगळुरुला दुसर्‍या क्रिकेट कसोटीत चौथ्या दिवशी कांगारूंची दमछाक करून, त्यांची दे माय धरणीठाय सारखी हालत विराटच्या झुंजार सवंगड्यांनी केली. कोणत्याही अवघड कार्याचे आव्हान स्वीकारून, एकजुटीने सामना केला तर विजय हा निश्‍चितच होतो, याची प्रचीती जणू आपल्या भारतीय टीमने दर्शविली. क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे ही उक्ती भारताच्या वीर जवानांनी खोटी ठरवली. छत्रपतीच्या लढवय्या मावळ्यांनी कांगारूचा अक्षरशः फडशा पाडून चेंदामेंदा केला …अभिनंदन भारत क्रिकेट टीमचे. जय भारत…
किशोर पोहेकर
हनुमाननगर, नागपूर

१७ लाख क्विंटल तुरीचे भरघोस पीक
राज्यात न भूतो न भविष्यती अशी यंदा १७ लाख टन तूर झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पण, ही साठविण्यासाठी गोदामे नाहीत आणि तूर भरण्यासाठी बारदानाही नाही. शासनाने तातडीने जेथे खाजगी गोदामे, बँकांची गोदामे आहेत, ती सर्व भाड्याने घेऊन तेथे तूर साठवावी. तसेच नाफेडला अधिक निधी उपलब्ध करून देऊन हमी भावानेच तूर खरेदी करावी.
विनायक पाटील
यवतमाळ

जनाधार नसलेले कॉंग्रेसचे नेेते
जनाधार नसलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी मला नागपूर महापालिकेत विरोधी पक्षनेता होऊ दिले नाही, असा घरचा ताजा अहेर प्रफुल्ल गुडधे यांनी दिला आहे. अगदी निवडणुकीच्या आधी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. मारामारी, एकमेकांचे पाय ओढणे यामुळे कॉंग्रेसचा पाडाव झाला, हे वास्तव आहे. तरीही कॉंग्रेसच्या नेत्यांना अजून अक्कल आलेली नाही. यांनाच विदर्भातून कॉंग्रेस हद्दपार व्हावीशी वाटते, असे दिसते.
अमोल जाधव
नागपूर

गायत्री प्रजापतीला अखिलेशने लपविले
उत्तरप्रदेशातील एक मंत्री गायत्री प्रजापती याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असताना आणि तो फरार असताना, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीच त्याला लपवून ठेवल्याचा विरोधकांचा आरोप योग्यच आहे. अखिलेशच्या पत्नी डिंपल यांनी या प्रजापतीविरुद्ध प्रचारात चकार शब्द काढला नाही. याचा अर्थ समाजवादी पक्षात महिलांना काहीही स्थान नाही. केवळ नीच जातीय राजकारणातच त्यांना स्वारस्य आहे, असेच म्हणावे लागेल.
विकास देशकर
नागपूर

महिलांच्या कर्तृत्वाला सलाम
जागतिक महिला दिनानिमित्त एअर इंडियाने दिल्ली ते सॅनफ्रान्सिस्को या विमानाच्या फेरीत अगदी चालकापासून तर अन्य कर्मचार्‍यांपर्यंत महिलांवरच जबाबदारी सोपविण्याची बाब मनाला सुखावून गेली. रेल्वेनेही लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये महिला चालक व सहचालकांवर जबाबदारी सोपविली. काही पॅसेंजर गाड्यांमध्येही महिला चालकांकडेच किल्ली दिली गेली. हे पाहून महिला आज कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, उलट काकणभर त्या समोरच आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. महिलांच्या या कर्तृत्वाला सलाम.
वैशाली देशपांडे
नागपूर