स्थिरस्थावर

0
44

वेध
क्रीडा संघटनांमधील वाद हा काही खेळ आणि खेळाडूंसाठी नवीन विषय नाही. या देशातील एकही राज्य किंवा राष्ट्रीय क्रीडा संघटना अशी नसेल की ज्याला राजकारण किंवा वादाचे ग्रहण लागले नसेल. त्यामुळेच आपल्या देशात क्रीडा आणि क्रीडापटूंच्या विकासाला खीळ बसलेली आपल्याला दिसून येते. असेच ग्रहण नुकतेच राज्य व्हॉलिबॉल संघटनेला लागले होते. विजय डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील ही संघटना दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. व्हॉलिबॉलपटूंनाही चांगले दिवस येऊ लागले आहेत. आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होताना याआधी खेळाडूंना स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करावी लागत होती. ती आता आयोजक करू लागले आहेत, राज्य संघटनेचे अध्यक्षही त्याला हातभार लावत आहेत. खेळाडूंकडून मिळणारा प्रतिसाद बघता आयोजकही खुश असून खेळाडूही उत्साहात स्पर्धेत सहभागी होऊ लागले आहेत. या उत्साही वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य संघटनेतर्फे लीग स्पर्धांचेही आयोजन केले जाणार आहे. एवढे सारेकाही खेळ आणि खेळाडूंसाठी सुरू असताना काही लोकांनी विद्यमान राज्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांविरुद्ध दंड थोपटून आपली वेगळी चूल मांडली. त्यांना वाटले आपल्या चुलीवर चांगला स्वयंपाक आपण करू शकू. मात्र, भारतीय व्हॉलिबॉल महासंघ आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटना यांनी विजय डांगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य व्हॉलिबॉल संघटनेला मान्यता दिली आणि त्यांच्याच स्पर्धा वैध राहातील, असे जाहीर केले. त्यानुसार आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच बारामती येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाने पुरुषांमध्ये जेतेपद पटकाविले, तर नागपूरच्या महिलांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुणे जिल्हा संघाला महिला विभागातील जेतेपदाचा मान मिळाला. दोन्ही विभागांमधील अंतिम सामने नागपूर आणि पुणे जिल्हा संघांमध्ये झाले. एकूणच काय की, सध्या राज्य व्हॉलिबॉल संघटनेमधील परिस्थिती स्थिरस्थावर झाल्यासारखी दिसत आहे. राज्य व्हॉलिबॉल संघटनेचा इतिहास बघितला, तर दुफळीच्या राजकारणाचा जणू या संघटनेला शापच असल्याचे दिसून येते. याआधीही या संघटनेने अशा प्रकारचे वाद, अशा प्रकारच्या वेगळ्या चुली आदी प्रकार अनेकदा अनुभवले आहेत.पप
आत्मविश्‍वासाचा अभाव
लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळताना एखाद्या गोलंदाजाने जाणूनबुजून चेंडू फुलटॉस टाकला आणि त्याची चमू पराभूत होत असेल तर त्याच्या नावाने धोषा लावला जायचा… चिडले म्हणून फुलटॉस टाकतो. असाच काहीसा प्रकार हा नेहमी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्याबाबत घडत असतो. त्यांना आपल्या वर्चस्वाला धक्का लागलेला अजीबात आवडत नाही. मायदेशात विजयाचा दबदबा दाखविणारे हे खेळाडू भारतीय उपमहाखंडात जेव्हा खेळायला येतात तेव्हा त्यांची फिरकी गोलंदाजांसमोर त्रेधा उडते. त्यामुळे दारुण पराभव पाहावा लागतो. याशिवाय भारतीय फलंदाजांनाही त्यांच्या खेळपट्टीवर रोखणे, हे एक त्यांच्यासाठी आव्हान असते. अशातच त्यांनी भारतीय संघाची नाडी ओळखली. दोन भारतीय वंशाच्या माजी फिरकी गोलंदाजांची सेवा घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांना तयार केले आणि फलंदाजांनाही फिरकी कशी खेळायची, हे सांगितले. या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पुण्यातील सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली होती. दुसर्‍या सामन्यात मात्र भारतावर कुरघोडी करून मालिकेत निर्णायक आघाडी मिळविण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भारतीय खेळाडूंनी धुळीस मिळविले. दुसरा सामना जिंकून भारताने मालिकेत बरोबरी साधली. आपल्या हातून सामना निसटणार, अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे स्वत:ला जास्त शिष्ट समजणार्‍या या संघाच्या कर्णधाराने एक खुटीउपाडपणा केला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १८८ धावांची गरज होती. मात्र, त्यांचे फलंदाज झटपट बाद होत होते. कर्णधार स्मिथ दुसर्‍या बाजूने किल्ला लढवत होता. उमेश यादवच्या चेंडूवर स्मिथला पायचित देण्यात आले. अशा परिस्थितीत आपण नक्की बाद झालो की नाही, हे तपासून पाहण्याची एक संधी स्मिथजवळ होती. त्याचा तो वापरही करू शकला असता. मात्र, आपली गोची होईल, या भीतिपोटी त्याने ड्रेसिंग रूमकडे इशारा करून डीआरएस घेऊ की नाही, अशी विचारणा केली. आयसीसीच्या नियमानुसार मैदानावर उपस्थित फलंदाजांनाच आपसात विचारविमर्ष करून, मागणी करावी लागते. स्मिथने मात्र ड्रेसिंग रूममधील आपल्या पथकातील संगणक हाताळणार्‍याकडे इशारा करून मागणी करू की नाही, अशी विचारणा केली. या कृतीमुळे तो आता अडचणीत आला आहे. त्याच्यावर चौफेर टीका होत आहे.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३