यक्षप्रश्‍न

0
96

कल्पवृक्ष
पांडव वनवासात असताना अनेक प्रकारच्या संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. एकदा ते तहानेने व्याकुळ झालेले असतात. जवळ कोठे पाणी आहे का, हे पाहण्यासाठी नकुल झाडावर चढला. काही अंतरावर त्याला सरोवर दिसले. खाली उतरून तो पाणी आणण्याकरिता गेला. सरोवर पाहून तो प्रसन्न झाला. पाणी पिणार, इतक्यात कुठून तरी आवाज आला, ‘‘माझ्या प्रश्‍नांची उत्तरे जोपर्यंत तू देत नाहीस तोपर्यंत पाणी पिता कामा नये.’’ नकुलाला खूप तहान लागल्यामुळे त्याने दुर्लक्ष केले व पाणी प्याला. त्या क्षणी नकुल मरून पडला. नकुल परत येईना म्हणून युधिष्ठिराने सहदेवाला पाठवले. तो गेला तेव्हा भाऊ मरून पडलेला दिसला. त्याला धक्का बसला. तहान जबरदस्त असल्यामुळे प्रथम तो पाणी प्याला. त्यानेही नकुलाप्रमाणे त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तोही मरून पडला. त्यानंतर अर्जुन व भीम गेले. त्यांनीही तसेच केले. एकही भाऊ परत न आल्यामुळे शेवटी युधिष्ठिर सरोवरावर गेला. सगळे भाऊ मरून पडलेले दिसले. तो सुन्न झाला. युद्धाची एकही खूण तेथे दिसत नव्हती. लढल्याशिवाय ते मरू शकतात यावर विश्‍वास ठेवणे कठीण होते. भयंकर संकट त्याच्या समोर उभे होते. दुःखाने त्याला सुचेनासे झाले. त्याची पावले पाण्याकडे वळली. पाणी पिणार इतक्यात तो आवाज आला. तो यक्ष होता. युधिष्ठिर म्हणाला, ‘‘यक्षदेवा, हे सरोवर तुमचे असेल तर तुमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मी तुमचा अपमान करणार नाही. पाण्याला स्पर्शही करण्याचा मला अधिकार नाही. तू मला प्रश्‍न विचार, मी कुवतीनुसार उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन.’’ यक्षाने युधिष्ठिराला अनेक प्रश्‍न विचारले आणि त्याची समाधानकारक उत्तरे त्याने दिली. यक्ष म्हणजे काळ. हे फक्त युधिष्ठिराला विचालेले प्रश्‍न नाहीत. काळ आपल्या सर्वांसमोरच काही मूलभूत प्रश्‍न उभे करतो. आपण सगळेच तहानलेले आहोत. हे जग, ही तहान पूर्ण करणारे सरोवर आहे. काळाने विचालेल्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले तर काळ तुमचा घास घेणार हे नक्की. असे किती आले आणि किती गेले. सगळेच पांडव अद्वितीय होेते. नकुल, सहदेव अत्यंत सुंदर होते. भीम तर प्रचंड शक्तिशाली होता. अर्जुन तर अजेय योद्धा होता. अहंकारामुळे चौघांनीही त्याची दखल घेतली नाही. भावाच्या मृत्यूने दुखावलेल्या अर्जुनाने तर यक्षावर दिव्य अस्त्रही सोडले पण तो त्याला पराभूत करू शकला नाही. युधिष्ठिराने मात्र ती चूक केली नाही. त्याने आपला विवेक सोडला नाही. कोण कुठला यक्ष? असे म्हणून त्याचा अपमान केला नाही. विनम्रपणे त्याचा अधिकार मान्य केला. आपल्या कुवतीनुसार त्याच्याशी चर्चा करण्याची, संवाद करण्याची तयारी दाखवली. युधिष्ठिराने तीच चूक केली असती तर? दुर्योधनाला जे हवे होते, तेच घडले असते. बारा वर्षे वनवासाच्या अखेरच्या पर्वातील ही घटना आहे. म्हणजे वनवास भोगल्यानंतरही पांडव संपले असते. शक्तीचा अहंकार आला की विवेक संपतो. आपली तहान हीच प्राथमिकता होते. आणि दुर्जनांना काहीही न करता विजयाची संधी मिळते. विवेकशील माणूस काळाने उभे केलेले प्रश्‍न कधीही टाळत नाही. ते टाळले तर काळावर मात करून अंतिम विजय मिळविता येत नाही. समाधानकारक उत्तरे देण्याची तयारी ठेवावीच लागते. जीवनासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांना आपण भीडत नाही, हेच आपल्या व समाजाच्या दुःखाचे, पराजयाचे कारण
असते.
युधिष्ठिर सर्व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देतो. यक्ष प्रसन्न होतो. एका भावाला जिवंत करून देण्याचा वर देतो. युधिष्ठिर नकुलाची निवड करतो. यक्षाला आश्‍चर्य होते. युद्धाकरिता भीम किंवा अर्जुनाची गरज असताना नकुल का, असा त्याला प्रश्‍न पडतो. युधिष्ठिर म्हणतो, ‘‘मला दोन माता आहेत. कुंती आणि माद्री. कुंतीचा एक मुलगा, मी जिवंत आहे. माद्रीचे दुःख मी पाहू शकणार नाही. तिचाही एक मुलगा जिवंत असला पाहिजे. नकुल व सहदेव तिची मुलं आहेत.’’ माणूस संधी मिळाली की शेवटी आपलाच स्वार्थ पाहतो. युधिष्ठिराच्या स्वार्थाने माणुसकी, संवेदनशीलता व न्यायप्रियतेवर मात केली नाही. हीच गोष्ट त्याच्या अंतिम विजयाला कारणीभूत ठरली. कारण सज्जनशक्तीचे हे मूर्तिमंत स्वरूप पाहून यक्षाने चारही भावांना जिवंत केले.
यक्षाचा एक प्रश्‍न आहे, जगातले सर्वात मोठे आश्‍चर्य कोणते? यावर युधिष्ठिर म्हणतो, रोजच इहलोकातले प्राणी यमसदनाला जात असताना बाकीचे मात्र आपण चिरंजीव आहोत, असे
वागत असतात. हे कळले तर सर्वच यक्षप्रश्‍नांचा आपण खर्‍या अर्थाने शोध घेऊ, हे निश्‍चित.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११