लक्ष आता विधानसभा निवडणूक निकालांकडे

0
134

दिल्लीचे वार्तापत्र
गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपल्या असून आता सर्वांचे लक्ष ११ मार्चला होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मणिपूरच्या दोन टप्प्यातील दुसरा आणि उत्तरप्रदेशच्या सात टप्प्यांतील निवडणुकीचा शेवटचा टप्पा ८ मार्चला संपला आहे. मतमोजणीचा कौल काय राहाणार, याचे संकेत ९ मार्चलाच एक्झिट पोलमधून मिळणार आहेत. मात्र, या मिनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीबद्दल राजकीय नेत्यांच्याच नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या मनातही प्रचंड उत्सुकता आहे, हे नक्की. कारण या निवडणुकांच्या निकालांनी अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे, दीर्घकाळ वाट पाहावी लागणार्‍या या निकालांनी अनेकांची वाट लागणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची दिशा कशी राहाणार याचे संकेतही या निकालांनी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भविष्याच्या राजकारणाची दिशा विधानसभा निवडणुकीचे हे निकाल निश्‍चित करणार आहे.
गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडपेक्षाही उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालांनी देशाचे राजकारण ढवळून निघणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाने बहुमत मिळवले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अद्यापही कायम असल्याचे, तसेच त्यांच्या सरकारने अडीच वर्षात केलेल्या लोककल्याणकारी कामांवर जनतेने पुन्हा शिक्कामोर्तब केल्याचे मानले जाईल. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. तर उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणि नेतृत्वावर लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाचा हा निर्णय अचूक असल्याचे निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट होईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे नोटबंदीच्या मोदी सरकारच्या व्यापक देशहिताच्या आणि धाडसी निर्णयावर विरोधी पक्षांनी आकांडतांडव केले होते. याआधी महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निकालांनी, तसेच ओडिशातील निकालांनी नोटबंदीच्या विरोधात मोदी सरकारवर तुटून पडणार्‍या विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवली होती. उत्तरप्रदेश, तसेच अन्य राज्यांत भाजपाला अपेक्षित यश मिळाल्यास नोटबंदीचा मुद्दा पूर्णपणे संपून जाईल, विरोधकांना या मुद्यावरून सरकारवर टीका करायला तोंड राहाणार नाही. निवडणुकीच्या निकालांनी नोटबंदीचा मोदी सरकारचा निर्णय जनतेने मान्य केल्याचे, तसेच या निर्णयाला जनतेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरळीत पार पडेल, विरोधकांना सभागृहात गोंधळ घालता येणार नाही. दुर्दैवाने उत्तरप्रदेशात भाजपाला बहुमत मिळाले नाही, तर नोटबंदीला विरोध करण्याची आमची भूमिका योग्य होती, असे म्हणायला आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात पुन्हा गोंधळ घालायला आणि सभागृहाचे कामकाज ठप्प पाडण्याची संधी विरोधी पक्षांना मिळेल. विशेष म्हणजे भाजपाचे मनोबलही काही प्रमाणात घटेल.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला मिळणार्‍या यशाचे शिल्पकार पंतप्रधान मोदींपाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ठरतील. २०१४ मध्ये उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा भाजपाला जिंकून देण्यात मोठी भूमिका असणारे अमित शाह यांच्या संघटनकौशल्याचे, तसेच निवडणूक व्यूहरचनेचे हे मोठे यश मानले जाईल. भाजपाचे सर्वाधिक यशस्वी अध्यक्ष हा त्यांचा करण्यात येत असलेला उल्लेख सार्थ ठरेल.
उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेस आघाडीला सत्ता मिळाली तर युपी को ये साथ पसंत है, असे मानले जाईल. या यशाचे श्रेय अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना जाईल. मात्र, त्यातही सिंहाचा वाटा हा अखिलेश यादव यांचा असेल. निवडणुकीतील विजयाने समाजवादी पार्टीतील मुलायमसिंह यादव यांचे युग संपून अखिलेश यादव यांचे युग सुरू झाल्याचे समजले जाईल. मुलायमसिंह यांची स्थिती गोष्टी सांगेन युक्तीच्या चार अशी होईल. एखादवेळी मुलायमसिंह यादव यांच्या दबावाने शिवपाल यादव यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, तरी पहिलेसारखे त्यांचे राजकीय वजन आणि प्रभाव राहणार नाही, तर अमरसिंह यांना दुसर्‍या राजकीय पक्षात आपले भवितव्य शोधावे लागेल. ‘विकास की चाबी डिंपल भाभी’ अशा घोषणा ज्यांच्यासाठी देण्यात आल्या त्या खा. डिंपल यादव राज्यातील नवे सत्ताकेंद्र म्हणून उदयास येतील.
आघाडीतील घटक पक्ष म्हणून अखिलेशच्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसचाही समावेश होईल. बिहारपाठोपाठ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेच्या चतकोर भाकरीवर कॉंग्रेसला आपली गुजराण करावी लागेल. यासोबतच एखादवेळी पंजाबमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले तर हा राहुल गांधींच्या नेतृत्वाचा विजय म्हणून ढोल पिटले जातील. खरं म्हणजे पंजाबमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले तरी त्याचे श्रेय राहुल गांधींचे नाही, तर कॅप्टन अमरिंदसिंग यांचे राहाणार आहे. मात्र, यामुळे कॉंग्रेसची स्थिती बुडत्याला काडीचा आधार अशी होईल. यामुळे राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्याच्या प्रक्रियेला गती येईल, महिनाभराच्या आत त्यांचा अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक केला जाईल.
उत्तरप्रदेशात मायावतीच्या हत्तीने पंजासह सायकल चिरडली तर बसपाला चांगले दिवस येतील. मायावतींचा मावळतीला चाललेला सूर्य पुन्हा प्रकाशमान होईल. मुख्य म्हणजे बसपा एकजूट राहील. मात्र, मायावतींचा पराभव झाला तर मायावती यांना पक्ष एकजूट ठेवणे कठीण होईल, बसपाला मोठ्या प्रमाणात गळती लागेल.
पंजाबमध्ये आम आदमी पाटींचे सरकार आले तर अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला ऊत येईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधून ते पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच वर्षात होणार्‍या गुजरात विधानसभा निवडणुकीत करो वा मरो म्हणून केजरीवाल पूर्ण ताकदीने पंतप्रधान मोदींना त्यांच्या गृहराज्यात पराजित करण्यासाठी सज्ज होतील. केजरीवाल यांनी आधीच दिल्लीतून आपले लक्ष कमी केले आहे. पंजाबमधील विजयाने तर ते दिल्लीवासीयांसाठी आणखी दुर्मिळ होतील.
गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या निकालांचा स्थानिक राजकारणावर परिणाम होईल. उत्तराखंड कॉंग्रेसला आपल्याकडे कायम ठेवता आले तर मुख्यमंत्री हरीश रावत यांचे यश मानले जाईल. मात्र, भाजपाने जिंकले तर भाजपाचे एक राज्य आणखी वाढेल. मणिपूरच्या विजयाने भाजपाला आसामपाठोपाठ ईशान्य भारतातील आणखी एक राज्य जिंकल्याचा आनंद होईल.
गोव्यात भाजपाला आपली सत्ता कायम राखता आली तर मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता सवार्र्ंना राहील. कारण मुख्यमंत्रिपदासाठी निवडणूक प्रचाराच्या काळात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाची मोठी चर्चा होती. त्यामुळे पर्रिकर दिल्लीत राहातील की गोव्यात परत जातील, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता राहील. विशेष म्हणजे संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकर यांनी अतिशय चांगले काम केले आहे, आपल्या प्रामाणिकपणाचा ठसा संरक्षण खात्यात उमटवला आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतच राहावे, अशी सर्वांची इच्छा राहील. त्यामुळे याबाबतचा निर्णय शेवटी भाजपा संसदीय मंडळालाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, हे निश्‍चित.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७