इसिसची पिलावळ भारतात!

0
139

अग्रलेख
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, इंडियन मुजाहिदीन, अल् कायदा या, भारतात आधीपासूनच ठाण मांडून बसलेल्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांनी घातलेल्या धिंगाण्यात आणि त्यांच्या धार्मिक दहशतीत आता ईसीसची भर पडली असल्याची बाब एव्हाना पुरेशी स्पष्ट झाली आहे. या संघटनेने जोपासलेला दहशतवाद अधिक बळकट करण्यासाठी काही महिलांसह मुस्लिम कार्यकर्त्यांचा फौजफाटा भारतातील केरळ आणि मुंबईहूनही रवाना झाल्याच्या बातम्या अद्याप शिळ्या झालेल्या नसताना आणि इसिसशी संबंध राखून असलेल्या निदान चाळीस कार्यकर्त्यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकार्‍यांनी मागील कालावधीत धरपकड चालविली असल्याच्या वृत्ताची शाई अजून वाळलेली नसताना, उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये परवा या संघटनेचा सशस्त्र अतिरेकी पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याची बाब समोर आली आहे. आपल्या पोलिसांनी त्यांचा दहशतवादी ठार मारल्याच्या आनंदापेक्षाही, त्यातून सिद्ध झालेले इसिसचे भारतीय भूमीवरील अस्तित्व अधिक गंभीर ठरले आहे. संपूर्ण जगावर इस्लामचे वर्चस्व निर्माण करण्याच्या इराद्याने झपाटलेल्या बगदादीच्या इसिसची पिलावळ आणि पाळेमुळे रुजली सीरियात असली, त्याला खतपाणी इराक, सीरिया अन् लिबिया सारख्या छोट्याछोट्या देशांमधून मिळाले असले, तरी त्याची कडवी फळे मात्र जगाच्या पाठीवरील बहुतांश देशांच्या वाट्याला येताहेत अलीकडे. संपूर्ण विश्‍वावर राज्य करण्याचे इसिसचे ईप्सित साध्य करण्यासाठी पृथ्वीतलावरील तमाम मुस्लिम देशांना आवाहन करण्यात आले. हातात शस्त्रे घेऊन लढण्यासाठी तरुण मुले आणि त्यांच्या नैसर्गिक गरजा भागविण्यासाठी तरुण मुलींना या दहशतवादी संघटनेच्या सेवेत पाठविण्याच्या त्या आवाहनाला सर्वदूर मिळालेला प्रतिसाद पुरेसा बोलका आहे. जगभरात सर्वदूर बघायला मिळणार्‍या मुस्लिम धर्मांध मानसिकतेविरुद्ध चकार शब्द न काढणार्‍या अन् परदेशी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या निर्णयावर चवताळून तुटून पडणार्‍या सर्वांनीच एकदा मुस्लिम दहशतवाद अभ्यासून घ्यावा. म्हणजे मग या दहशतवादामागील षडयंत्र, क्रौर्य आणि मानसिकताही सर्वांच्या ध्यानात येईल. त्याचे समर्थन करणार्‍यांनी तर परिणामांची चिंता वाहण्याचे कारण नाही, पण ज्या शेकडो निष्पाप लोकांचे बळी या दहशतवादाने आजवर घेतलेत, त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांचा अदमास घेतला तर मग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन केल्यावाचून पर्याय उरणार नाही. वैश्‍विक स्तरावर इस्लामिक ‘खलिपत’ म्हणजे हुकूमत निर्माण करण्याच्या बगदादीच्या इराद्याचे परिणाम उर्वरित जग भोगत आहे. तसा तर, यातून खुद्द मुस्लिम समुदायही सुटलेला नाही. इसिसचा प्रभाव असलेल्या परिसरात दहशतीच्या छायेत त्यांचे जीणेही हरामच झाले आहे. कायम मृत्यूच्या छायेत वावरणे त्यांनाही आता नकोसे झाले आहे. वेळी-अवेळी कानावर पडणारे गोळीबाराचे आवाज, कानठळ्या बसविणार्‍या किंकाळ्या, बेदरकारपणे जिवंत माणसांचे गळे चिरण्याचा तो अमानवी प्रकार, सामूहिक कत्तलीच्या सरेआम घडणार्‍या घटना… या सार्‍याला कंटाळून शांत वातावरणात जीवन जगण्यासाठी इराक, सीरिया, लिबियातून बाहेर पडण्यासाठीची त्यांची धडपड अविरत सुरू आहे. त्या त्रस्त जनतेच्या भावना अव्हेरून इसिसचा पसारा मात्र इतस्तत: विखुरतो आहे. देशाच्या, खंडांच्या सीमा झुगारून. धर्माच्या नावाखाली त्याला समर्थनही तगडे मिळते आहे. अगदी परवा परवापर्यंत अफगाणिस्तानमध्ये मुळं रुजवू पाहत असलेला या संघटनेचा दहशतवाद एव्हाना भारताच्या दाराशी येऊन पोहोचला असल्याची बाब गांभीर्याने दखल घ्यावी अशीच आहे. कालपर्यंत या संघटनेला भारतातून समर्थन मिळालेच नव्हते असे नाही. उलट मोठ्या प्रमाणात रसदही त्यांना इथनं अनेकदा उपलब्ध झाली आहे. प्राणपणाने लढायलाही इथली तरुणाई त्या फौजेत सामील झाली आहे. पण म्हणून दूरवरच्या सीरियातला दहशतवाद आमच्या भूमीवर रक्तपात करायला लागलीच सज्ज होईल असे मात्र वाटत नव्हते. पण दुर्दैवाने, हा कयास खोटा ठरवत, लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून, इसिस भारतीय भूमीत दाखल झाला आहे. परवा भोपाळ-उज्जैन पॅसेंजरवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर लखनौमधील एका घरात दडी मारून बसलेला सैफुल्लाह नावाच्या या संघटनेच्या एका म्होरक्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश तर मिळाले, पण यानिमित्ताने इसिसची या देशातली एण्ट्रीही अधोरेखित झाली. इंडियन मुजाहिदीन पासून तर लष्कर-ए- तोयबापर्यंत वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांशी लढता लढता नाकी नऊ आले असताना आता अल् कायदाशी जवळिक राखून असलेल्या इसिस नावाच्या आणखी एका दहशतवादी संघटनेचा सामना आम्हाला करावयाचा असल्याची बाबही त्यातून स्पष्ट झाली आहे. दहशतवाद नवा नाहीच आम्हाला. रेल्वे पासून तर एसटी पर्यंत सर्वदूर त्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटांचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. त्या रक्तपाताचे थरारक दृश्य अजूनही हलत नाही डोळ्यांसमोरून. ज्यांनी १९९३ च्या स्फोटात जीव गमावला त्यांच्या नातेवाईकांना, ज्यांनी २६/११ च्या हल्ल्यात शरीराची अवयवं गमावलीत त्यांना विचारा एकदा, भारतातले इसिसचे अस्तित्व त्यांना मान्य होणार आहे का ते! जगावर इस्लामचा कब्जा असावा असं वाटणार्‍यांना लाख वाटू द्या, पण दहशतवादाची ही हिरवी पिलावळ चिरडून टाकणे, याला दुसरा पर्याय नाही, हे अंतिम सत्य आहे. तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही बाब जाहीररीत्या छातीठोकपणे बोलून दाखवताहेत. भारतातील राजकीय परिस्थिती कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला, हे सत्य जाहीरपणे व्यक्त करण्याची परवानगी देणार नाही कदाचित, पण ईसीसची दहशतवादी पिलावळ नेस्तनाबूत करावीच लागतील. ती आजच ठेचून काढली नाहीत, तर उद्या त्यांनी माजवलेला नंगा नाच बघणे एवढेच आपल्या हातात उरेल. त्यांनी मांडलेला दहशतवादाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघायचा की, आज दारातच त्यांचा बंदोबस्त करायचा, हे आपलं आपणच ठरवलं पाहिजे. या हिरव्या दहशतवादाचे एक सूत्र निश्‍चित आहे. देश कुठलाही असला, तरी ते वैश्‍विक पातळीवर एक आहेत. जगावर राज्य करण्याची त्यांची मनीषाही सर्वदूर समान आहे. कधी ते प्रेशर कुकरच्या भांड्यातून मुंबईच्या लोकलमध्ये स्फोट घडवतात, तर कधी विमानाचा वापर करून न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त करतात, एवढाच काय तो फरक. धर्माचे नाव घ्यायचे अन् माणसांच्या कत्तली करायच्या, या सूत्रातही कुठेही भेद नाही त्यांच्यात. त्यांच्या विचारांची माणसं त्यांना हव्या त्या उद्दिष्टासाठी प्राणपणाने आधीच मैदानात उतरली असताना आणि भारतात दहशत माजविण्यात त्यांनी जराही कसूर बाकी ठेवलेली नसताना, दूरवरच्या सीरियातली इसिस भारतातील ‘कार्यारंभाचे’ पाऊल टाकते, याचा अर्थ भविष्यातील इथल्या दहशती धिंगाण्याचे त्यांचे मनसुबे बुलंद आहेत. त्यांना जमिनीवर आणण्याचा पक्का इरादा सरकारने केला पाहिजे आता…