एक आकलन!

0
87

करीअर संधी- २०१७
२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीने आर्थिक-औद्योगिक संदर्भात अनेक धक्कादायक घडामोडींमुळे त्याचा अपरिहार्य असे परिणाम नोकरी-रोजगारांच्या संदर्भात झाला. बांधकाम व मूलभूत सुविधा, संगणक सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, पर्यटन इ. व्यवसाय क्षेत्रांना विशेषत: नोटबंदीनंतरच्या सावरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर मात्र केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर उद्योग व्यवसायाप्रमाणेच रोजगार संधींमध्ये चांगली व सशक्त वाढ होत असून २०१७ हे वर्ष यासंदर्भात आशादायी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या साधारणत: दोन वर्षातील केंद्र सरकारची ध्येयधोरणे आर्थिक घडामोडींच्या बदलत्या पार्श्‍वभूमीवर २०१७ मध्ये नव्याने उपलब्ध होणार्‍या वा होऊ घातलेल्या रोजगार संधींमध्ये पुढील प्रामुख्याने लक्षणीय ठरणार आहेत-
तंत्रज्ञानावरील भर : नजीकच्या भविष्यातील औद्योगिक क्षेत्राचा मुख्य भर तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञानात राहणार आहे. आधीच्या संशोधनाला तंत्रज्ञानाची नव्याने व व्यापक संदर्भात जोड देण्यावर प्रत्येक उद्योग-व्यवसायाचा भर राहणार आहे.
त्यामुळे या नव्या व बदलत्या स्थितीनुरूप व्यवसायाला पूरक कर्मचार्‍यांची निवड करण्यावर व्यवस्थापक आणि व्यवस्थापनाचा भर राहणार आहे. परंपरागत स्वरूपातील उद्योग म्हणून गणल्या गेलल्या उत्पादन उद्योग, कृषी क्षेत्रातील उद्योग, सेवा क्षेत्र, ग्राहक सेवा इ. मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करणार्‍या क्षेत्रांनी पण नव्या संदर्भासह तंत्रज्ञानाची कास धरली आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
स्टार्टअपची सफल सुरुवात : ‘स्टार्टअप’ ने आपल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रात आता बर्‍यापैकी बस्तान बसविले आहे ही वस्तुस्थिती आहे. या क्षेत्रातील ई-कॉमर्स क्षेत्रातील रोजगार संधीवर काही प्रमाणात मर्यादा आल्या असल्या तरी २०१७ च्या संदर्भात स्टार्टअप द्वारा नोकरी-रोजगारांच्या संदर्भात स्टार्टअपने आपले महत्त्व कायमच राखण्याचे दिसून येते.
अर्थातच बदलत्या व्यावसायिक परिस्थिनुसार २०१७ मधील स्टार्टअपची संबंधित रोजगार संधी या आता प्रामुख्याने उच्च शिक्षण, आरोग्य, वित्तीय सल्ला-सेवा, प्रचार यंत्रणा, संपर्क व्यवस्था यासारख्या क्षेत्रात राहणार आहेत. स्टार्टअप क्षेत्रत एका विशिष्ट स्टार्टअपमधील प्रस्तावित रोजगार संधी मर्यादित वाटत असल्या तरी एकत्रितरित्या स्टार्टअप क्षेत्रचा विचार करता एकत्रित स्वरूपातील या प्रस्तावित रोजगार संधी नक्कीच आकर्षक ठरणार्‍या राहतील.
नवागतांनो धीर धरा : केंद्र सरकारची आर्थिक धोरणे व नव्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर बदलत्या आर्थिक-औद्योगिक पार्श्‍वभूमीवर जाणकारांच्या मते येती दोन वर्षे नव्याने उत्तीर्ण झालेल्या अथवा नव्या पात्रताधारक उमेदवारांपेक्षा व्यवस्थापनांचा भर आपापल्या क्षेत्रातील जाणकार व अनुभवी उमेदवारांची कर्मचारी म्हणून निवड करण्यावर राहणार असल्याने नव्याने उत्तीर्ण झालेल्या अथवा उत्तीर्ण होऊ घातलेल्या विद्यार्थी उमेदवारांसाठी ‘थांबा आणि थोडी वाट पहा’ हा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
या बदलत्या परिस्थितीचा थेट परिणाम शिक्षण संस्थांमधून थेट म्हणजेच ‘कँपस् रिक्रूटमेंट’ पद्धतीवर होणार असल्याने विद्यार्थ्यांप्रमाणेच शैक्षणिक संस्थाचालकांनी पण सतर्क राहणे त्यांच्या हिताचे ठरणार आहे.
सल्लागारांना सुगीचे दिवस : गेली काही वर्षे प्रसंगी अननुभवी वा नवागत विद्यार्थी उमेदवारांची निवड करणार्‍या उद्योग आणि उद्योजकांचा भर आता मर्यादित संस्थेतील अनुभवी मंडळींची निवड करण्यावर असल्याने आर्थिक व्यवहारांपासून व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील अनुभवी उमेदवार वा सल्लागारांना वाढत्या मागणी आणि संधींद्वारा सुगीचे दिवस लाभतील हे आता स्पष्ट झाले.
याचाच थेट व अपरिहार्य परिणाम म्हणून विविध क्षेत्रातील अनुभवी व विविध विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींना सल्लागार, मार्गदर्शक म्हणून संधी मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या वा उत्पन्न होऊ घातलेल्या जागांवरील रोजगार संधींसाठी अनुभवी कर्मचार्‍यांना पण याद्वारे संधी उपलब्ध होऊ शकतात, हे यासंदर्भात लक्षणीय आहे.
सामूहिक प्रयत्नांचे सामर्थ्य वाढणार : रोजगाराच्या संदर्भात म्हणजेच कामाच्या ठिकाणी कर्मचारी म्हणून संबंधित कर्मचार्‍याच्या एकाकी वा वैयक्तिक स्वरूपातील प्रयत्न अथवा यशाची जागा सामूहिक वा एकात्मिक प्रयत्नांनी केव्हाच घेतली आहे. त्यामुळे समूह प्रयत्न अर्थात ‘टीम वर्क’ चे महत्त्व सद्यस्थितीत वाढले आहे.
या बदलत्या परिस्थितीची वेळेच चाहूल घेऊन त्यानुरूप प्रयत्न आणि सामूहिक संदर्भातील विचार रोजगारांच्या संदर्भात महत्त्वाचे ठरेल हे महत्त्वाचे ठरते.
कार्य-संस्कृतीशी एकरूप व्हा : कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात कर्मचारी आणि कंपनी यांची परस्पर नाळ जुळणे उभयतांसाठी आवश्यक असते. यातूनच कंपनीमध्ये कर्मचार्‍यांचे टिकून राहणे व त्याद्वारे कर्मचार्‍यांचे व्यावसायिक संदर्भात भरीव व वाढीव योगदान शक्य होते.
कंपनी-कर्मचार्‍यांचे परस्पर उत्तम संबंधच नव्हे तर त्यांच्या दरम्यान कार्यसंस्कृतीच्या संदर्भात तादात्म्य राहणे ही बाब नव्या संदर्भात सद्यस्थितीत पण तेवढीच लागू असल्याने विशेषत: सध्या नोकरीत बदल करू इच्छिणारे कर्मचारी व नव्याने कर्मचार्‍यांची निवड करणार्‍या कंपन्या या दोघांनी परस्परांची निवड करताना शैक्षणिक पात्रता-योग्यता, अनुभव कामकाजविषयक माहिती या समस्यांच्याच जोडीला कार्यसंस्कृतीला मेळ लावणे पण तेवढेच आवश्यक ठरले आहे.
कार्यतत्परतेला साथ तत्परतेची : बदलत्या व्यावसायिक परिस्थितीत व्यवस्थापक आणि व्यवस्थापन आपल्या सहकारी कर्मचार्‍यांकडून तत्पर सेवा प्रतिसादावर भर देत आहेत. यातूनच कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून आज परंपरागत स्वरूपतील केवळ सांगितलेले काम करणारे एवढीच मर्यादित अपेक्षा नसून त्यांचा भर आता तत्परतेने काम करणार्‍यांवर राहणार आहे.
अनेक कंपन्यांनी यातूनच आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक कर्मचार्‍यांनाच टिकवून ठेवणे वा अशाच कर्मचार्‍यांची निवड करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न यापूर्वीच सुरू केले आहे. यामुळे अर्थातच नव्या कर्मचार्‍यांना रोजगार संधी मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत असतानाच कंपन्यांच्या व्यवस्थापनावर सुद्धा वाढती जबाबदारी आली आहे हे तारतम्य उभयतांनी पाळणे आवश्यक आहे.
ज्ञानाला जोड तंत्रज्ञानाची : पठडीतल्या शैक्षणिक पात्रतेला संबंधित विषयातील ज्ञानाला तंत्रज्ञानाची म्हणजेच अद्ययावततेची जोड देणे सध्या फार आवश्यक आहे.
उद्योग-व्यवसायांच्या सर्वच क्षेत्रात आज उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता म्हणजेच ज्ञानाला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देणे सध्या रोजगार संधींच्या संदर्भात फार आवश्यक ठरले असून, नव्याने पण मर्यादित स्वरूपात उपलब्ध होणार्‍या वा उपलब्ध होऊ घातलेल्या रोजगारसंधींसाठी प्रयत्नशील राहणार्‍या उमेदवारांनी या बदलाची खुणगाठ बाळगणे आवश्यक आहे.
थोडक्यात म्हणजे २०१६ च्या उत्तरार्धात आक्रसल्या गेलेल्या नोकरी-रोजगारांच्या संधी आणि संस्थेमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात नक्कीच प्रगती होण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक तयारी करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपली सवर्र्ंकष तयारी करणे आवश्यक आहे. कारण पूर्वीच्या पात्रतेची जागा आता कार्य तत्परतेने घेतली आहे तर ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड सध्या अपरिहार्य ठरली आहे. अल्पवधीतच एटीएम पासून पेटीएम पर्यंतचा आपण नुकताच पाहिलेला व्यावसायिक प्रवास केवळ दिशादर्शकच नव्हे तर मार्गदर्शन पण ठरणारा आहे.
– दत्तात्रय आंबुलकर
९८२२८४७८८६