निराश वृत्ती घातक

0
62

निराशा ही मानवाची वृत्ती अत्यंत घातक व मारक आहे. निराश झालेली व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्याही कमकुवत बनते. मनाने तर खचून जातेच, पण तनानेही खचत जाते. सततची निराश वृत्ती व्यक्तीला जीवन जगणे असह्य करते. दुर्बल व अधिक दुर्बलत्व ती धारण करते. कोणतेही कार्य करण्यास ती व्यक्ती धजत नाही. एखादे कार्य हाती घेतले तर त्या कामात व्यक्तीचे मन स्थिरावत नाही आणि मन न स्थिरावल्यामुळे ते काम अपूर्ण राहते. दिवसेंदिवस बल घटत जाते. मनोबलाबरोबर शारीरिक बलही घटते. ती व्यक्ती चिडचिड करावयास आरंभ करते. छोट्या छोट्या बाबींवर संघर्ष, वाद, भांडण करणे, चिडणे, राग करणे या बाबी त्या व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. जणू अंगवळणीच या बाबी पडतात व अस्थिरतेचा गुण त्या व्यक्तीच्या ठायी ठायी दिसतो. दुर्बलत्व वाढतच जाते.
आजारांना निमंत्रण : सततचे नैराश्य धारण करणारी व्यक्ती मनाने व शरीराने कमकुवत बनते तसेच ती विविध प्रकारच्या आजारांनाही बळी पडते. चिडचिडा बनलेला स्वभाव, भोजनावरची उडालेली इच्छा, घसरलेली मानसिक अवस्था, आलेले शारीरिक दुर्बलत्व यामुळे ती व्यक्ती रक्तदाब, हृदयविकार, हाता-पायांना कंप सुटणे अशा आजारांना बळी पडते. वैचारिकता भले तिच्या ठायी असेल, पण मानसिक स्थिती ढासळलेली असल्याने ती व्यक्ती आपल्याच विश्‍वात वावरते. स्वत:च्या अस्तित्वाचेसुद्धा त्या व्यक्तीला भान राहात नाही. आहार-विहार यावर नियंत्रण नसते. यामुळे शारीरिकदृष्ट्याही कृश आणि अशक्तपणा येतो. प्रतिकारशक्ती लोप पावते आणि अशा भयानक अवस्थेमुळे त्या व्यक्तीला विविध प्रकारचे आजार जडतात.
विकासाला घातक : व्यक्तीच्या ठायी सततची निराशा असल्यास ती व्यक्ती आपल्या जीवनाच्या ध्येयाला गाठू शकत नाही. जीवनातील कोणतेही काम यशस्वीपणे ती पूर्ण करू शकत नाही. तिने ते काम करण्याचा प्रयत्न केला, तर तिचे मन निवडलेल्या कामात लागत नाही आणि ते काम अर्धवट सोडून ती व्यक्ती पुन्हा आपल्या तंद्रीत रममाण होते. निराश वृत्ती विद्यार्थिदशेत खूपच घातक असते. निराशेने व्यक्ती ध्येयहीन बनते. निराश व्यक्तीला उत्साह राहत नाही. समाधान नाही की आनंद नाही. सतत तिच्या चेहर्‍यावर निराशेचे वलय असते.
व्यसनाकडे कल : सततच्या निराशेतच वावरणारी व्यक्ती शरीर, मन, विचार व आरोग्याने खचत जाते आणि खचणारी वृत्ती त्या व्यक्तीला विविध व्यसनांकडे व विकाराकडे ओढते. निराशेने मन दुर्बल बनते. त्यामुळे या दुर्बल मनाला कोणतीही व्यसने व कोणतेही विकार चटकन जडतात. निराशावादी व्यक्ती केवळ निराशच राहत नाही, तर व्यसनधारी तसेच विकारधारी बनते. ही व्यसने व विकार त्या व्यक्तीला पूर्णपणे आतून बाहेरून पोखरून टाकतात व शेवटी ही व्यक्ती जगाचा निरोप घेते. या निराश वृत्तीला टाळावयाचे तर खालील बाबी आचरणात आणा.
मनाला खंबीर बनवा : मनुष्याचे मन अत्यंत नाजूक व कोमल असते. ते प्रसंग व अनुभवारूप घडत असते. वेगवेगळ्या वयोकाळात मानवी अवस्था वेगवेगळी असते. बालवयात हट्टवादी, तरुण वयात स्वाभिमानी तसेच उतारवयात कोमल व नाजूक अशा वेगवेगळ्या मनाची अवस्था जरी राहत असली तरी मनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्या व्यक्तीचे असते. त्यामुळे व्यक्तीनेच मनाला दृढ, निश्‍चयी व खंबीर बनवावे. वेगवेगळ्या घटना व प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मनाला धैर्यशील बनवावे, कठोर बनवावे, मनाची सहनशक्ती वाढवावी, मनाचे बल वाढवावे, मनाला दृढनिश्‍चयी बनवून ते सक्षम, सुदृढ व निकोप, निरोगी बनवावे. तरच व्यक्ती आपले संपूर्ण जीवन सुख, समाधान व संपन्नतेने घालवू शकेल.
मनाला कामात गुंतवा : मनाला सतत कामात ठेवणे, मन संयमी ठेवून नियंत्रणात ठेवले, मन सदा हसतमुख ठेवून सामंजस्यपणा ठेवला, आहे त्यात समाधान मानले व सर्वांशी सहकार्य, सद्भाव, सद्वर्तन, सद्विचार ठेवले तर निराशा कदापिही येणार नाही. प्रयत्न, परिश्रम व प्रसन्नता या त्रिसूत्रीचा उपयोग जी व्यक्ती आपल्या जीवनात करते ती कदापिही निराश रहात नाही. आसपासच्या वातावरणात राहून समाजामध्ये मिसळणे हे महत्त्वाचे आहे. आनंद बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून असतो, त्यापेक्षा तो मनाच्या प्रवृत्तीवर जास्त असतो.
– प्र. जा. कुळकर्णी
९७६६६१६७७४