म्युझिकल फिलिंग्स

0
47

मनाचा थांगपत्ता लावणं कठीणच. कधी प्रणयात बेधुंद रंगणार, तर कधी पावसाच्या सरीमध्ये ओलचिंब होऊन भिजणार, कधी आपल्याच गुंत्यात खोलवर गुंतणार, तर कधी बेभान होऊन स्वैर जीवन जगणार. मानवी भावनांचा वेध घेणार्‍या अशा दर्जेदार गाण्यांच्या यादीत रिचमंड एंटरटेन्टमेंट प्रस्तुत ‘फिलिंग्स’ या म्युझिक अल्बमचादेखील समावेश होतो. १२ दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंतांचा समावेश असणार्‍या या अल्बममध्ये प्रणय, विरह, शृंगार, प्रेम, प्रोत्साहन आणि पाऊस या थीम्सवर आधारित गाणी आहेत. विशेष म्हणजे, श्रेया घोषाल, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे अशा नामांकित गायकांचा आवाज या म्युझिक अल्बमला लाभला असून, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर प्रिया बापट, स्पृहा जोशी आणि तरुणाईची धडकन सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या आवाजाची जादूदेखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या म्युझिक अल्बमचे अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. १२ दर्जेदार कलावंतांची म्युझिकल ‘फिलिंग’ देणार्‍या या सुमधुर गाण्यांवर चित्रित केलेले ऑडियो लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तरी, या अल्बमची झलक म्हणून भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी या देखण्या जोडीवर चित्रित केलेले प्रेमगीत लोकांसमोर सादर करण्यात आले आहे.
याबद्दल सांगताना रिचमंड ग्रुपचे युवा निर्माते अभिषेक विचारे यांनी सांगितले की, ‘फिलिंग्स’ हा म्युझिक अल्बम स्वतःच एका उत्तम कलाकृतीचं उदाहरण आहे. कारण इतक्या दिग्गज कलाकारांचा आवाज, अप्रतिम संगीत आणि श्रोत्यांची मनं जिंकणारे शब्द आणि अभिनय असं संमिश्र मिश्रण रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ही फक्त सुरुवात आहे रिचमंड एंटरटेन्टमेंटच्या माध्यमातून मराठीच नव्हे, तर मनोरंजनाच्या या क्षेत्रात चित्रपट, नाटक, वाहिन्या, वाद्यवृंद अशा विविधांगी क्षेत्रात अगदी बॉलीवूडपर्यंत झेप घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. मानवी स्वभावगुणांचे अचूक टिपण करणारी ही गाणी प्रत्येक वयोगटातील श्रोत्यांना भुरळ पाडणारी आहेत. किरण विलास खोत हे या अल्बमचे गीतकार-संगीतकार आहेत. ते म्हणतात, ‘‘गीतकार आणि संगीत दिग्दर्शक या नात्याने ‘फिलिंग’ या अल्बमसाठी मी रिचमंड ग्रुपचा खूप आभारी आहे आणि माझ्यासाठी ही एक फक्त सुरुवात असून, यानंतर अशा विविध प्रोजेक्ट आणि संगीतामार्फत माझी मजल दरमजल निरंतर चालू राहील. या अल्बममध्ये काम करण्यास संधी दिल्याबद्दल मी माझे प्रेरणास्थान आदरणीय भास्कर विचारे (दाजी), व्यवस्थापक अभिषेक विचारे तसेच बोर्ड ऑफ डीरेक्टर अमोल उतेकर आणि अमोल सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानतो.’’
तरुण मनाला संगीताची नवी ‘फिलिंग’ बहाल करणारा हा म्युझिक अल्बम लवकरच गाना, सावन, आयट्यून्स, हंगामा सर्वच डिजिटल वाहिन्यांमार्फत श्रोत्यांना ऐकायला आणि ९ एक्स झकास, मायबोलीवर तसंच रिचमंड एंटरटेन्टमेंटच्या आणि शेमारू (डिजिटल पार्टनर) यांच्या यू-ट्यूब व्हिडीयोवर टप्प्याटप्प्याने पाहायलादेखील मिळतील.
– दीनानाथ घारपुरे