प्रतिमांची व्यथा

0
117

यद्ध संपल्यावर युद्धभूमीवर प्रदीर्घ शांतता पसरली असावी, एखाद्या जीवघेण्या अफवेसारखी. चहू बाजूंना निर्जीव अवयवांचा खच. अवयव जे गेल्या क्षणापर्यंत अभिन्न अंग होते, कोणा जिवंत माणसाचे. तसे पडून असतात अवशेष जिवंत प्राचीन मूर्तींचे सर्वत्र. कुठं मस्तक नसलेली प्रतिमा-मूर्ती, कुठं नुसतेच पाय, कुठं हात पूर्णतः भग्न, तर कुठं चेहराच हरवलेला. पण कोणतीच अशी प्रतिमा अपूर्ण वाटत नाही, भंगूनही भग्न वाटत नाही, अभंग वाटते. निर्जीव न वाटता सजीव वाटते. एखाद्या प्राचीन ऐतिहासिक नगरीत, भव्य-प्रसिद्ध मंदिर परिसरात अशा अनेक प्रतिमा दिसतात. भग्न झाल्यानं मूळ स्थान हरवलेल्या. भग्न होऊनही सौंदर्य सौष्ठव अभंग असलेल्या.
भग्नावशेषांवरून या प्रतिमांच्या मूळ स्वरूपाची कल्पना येते. अवशेषच जर एवढा देखणा, तेजस्वी असेल तर संपूर्ण स्वरूप किती देखणं असेल, हा विचार मनात येतोच. या नखशिखान्त भग्नतेतही जे सौंदर्य जाणवतं, त्यात मनोवेधक असतं ते अलंकरण. प्रतिमा कोणतीही असो, कितीही भग्न असो, मूळ स्वरूप पूर्णतः हरवलेली असो, तिचा अगदी छोटासा सुद्धा अवशेष दागिन्यांनी नटलेला असतो. हे अलंकार म्हणजे प्रतिमेचे विशेष.
प्रतिमा निर्माण करताना तिला चिरंजीवित्व प्राप्त व्हावं यासाठी दगड-पाषाण हे तेवढंच चिरंजीव माध्यम निवडलं गेलं असावं. ज्या प्रयोजनासाठी प्रतिमेचं निर्माण त्या प्रयोजनाला अधिष्ठान श्रद्धेचं. मूर्त-अमूर्त संकल्पनांचं कल्पनेतलं रूप कलावंतांनी दगडातून साकार केलं-सजवलं. प्रतिमा निर्माण करताना ती ज्याची करायची, जे संबोधन तिला द्यायचं, त्या मागची श्रद्धाही त्यामागचं कारण होतीच, पण फक्त श्रद्धा असून भागणार नव्हतं. नाहीतर एका देवतेच्या एकाच प्रकारच्या प्रतिमा सर्वत्र निर्माण झाल्या असत्या. प्रतिमा निर्माण करणार्‍या कलावंतांच्या कलेचा- प्रतिभेचा उत्कट हुंकार त्या प्रतिमांना प्रेरक ठरला. म्हणूनच देवता एकच असली, तरी तिच्या निर्माण झालेल्या प्रतिमांमध्ये विविधता दिसते आणि प्रत्येकच प्रतिमा अतुलनीय सौंदर्यानं नटलेली असते. साधे शब्द जे साकार करू शकणार नाहीत, ते या प्रतिमांतून साकार- सिद्ध झालेलं दिसतं आणि जे या प्राचीन प्रतिमांतून व्यक्त होतं, ते शब्दात साकार करणं सर्वथा अशक्य.
प्राचीन प्रतिमा एवढ्या सौंदर्यशाली होण्याचं कारण म्हणजे त्या निर्माण करणार्‍या कलावंतांचं दगडावरचं प्रेम. त्या कलावंतांनी तो दगड अत्यंत मायेनं कोरला असेल. दगडाशी एकरूप झाल्याशिवाय अशी निर्मिती होऊच शकत नाही. कठीण अशा पाषाणातून एवढी नाजूक अशी कलाकुसर करणारी शस्त्र-अवजारं कशी असतील?
प्रतिमा निर्माण करताना ती सौंदर्यपूर्ण सुघड लयदार लयबद्ध दर्शनीय कशी होईल, याचा विचार केलेला दिसतो. एकाच पाषाणातून एकसंध कोरलेली प्रतिमा ही कोरलेली वाटू नये, यातच या कलेचं सामर्थ्य सामावलेलं आहे.
प्रतिमांचे अलंकार, आयुधं आणि इतर तपशील प्रतिमानुसार बदलतात. प्रतिमा कशाची, हे ओळखताना याचा फार उपयोग होतो. हे सर्व घटक प्रतिमा कोरली जाताना तिच्यासोबतच कोरले जातात. यात महत्त्वाचं हे की, ही आयुधं हे अलंकार प्रत्यक्ष प्रतिमेसोबत कोरलेले वाटत नाहीत. ती प्रतिमा आयुधं धारण केलेली आणि अलंकार परिधान केलेली अशी वाटते. प्रतिमा घडवून नंतर अलंकार वेगळे घडवून प्रतिमेला चढवलेले वाटतात. दगडांचे असलेले अलंकार धातूचे वाटतात.
प्रतिमेला सौंदर्य प्राप्त होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्या प्रतिमेची पद्धत. म्हणजे उभे किंवा बसले असण्याची शैली किंवा डौल. म्हणजेच आसन पर्यक, अर्धपर्यक, आलीढ, प्रत्यालीढ, पद्म, वीर अशी अनेक आसने प्रतिमांत दिसून येतात. उभ्या प्रतिमांच्या उभं असण्याच्या पद्धतीमुळे प्रतिमांना विशेष सौंदर्य प्राप्त होतं. काही प्रतिमा सरळ ताठ उभ्या असतात, तर काहींचं शरीर काही स्थानांवरून किंचितच वाकलेलं असतं. हे वागणं म्हणजे भंग. प्रतिमेच्या समभंग, त्रिभंग, अतिभंग अशा पद्धती आहेत. यामुळे प्रतिमेला एक प्रकारचा डौल आणि लय प्राप्त होते, प्रतिमा सजीव, मानवी वाटते.
प्रतिमांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रतिमेची आयुधं, हातात धारण केलेली शस्त्र किंवा इतर तपशील. शंख, चक्र, त्रिशूल, परशू, अंकुश, गदा, बाण, खड्ग अशी अनेक आयुधं.या आयुधांसोबतच अनेक प्रतिमांनी अनेक प्रकारची उपकरणे सुद्धा धारण केलेली असतात. वीणा, डमरू, कमंडलू, पोथी-पुस्तक, दर्पण, अक्षमाला अशी काही उपकरणं प्रतिमांसह दिसतात. आयुधं आणि ही उपकरणं सुद्धा सहज सुंदर आणि नैसर्गिक वाटतात.
हाताचा तळवा आणि बोटांनी तयार होणारी मुद्रा प्रतिमेच्या अवस्था दर्शवते. प्राचीन मूर्तींचं अवलोकन केलं तर या मुद्रांचा फार सखोल विचार केला गेलेला दिसून येतो. नमस्कार, अभय, वरद, भूस्पर्श, तर्जनी, तर्पण, अर्धचंद्रहस्त, अंजली, ज्ञानमुद्रा अशा अनेक मुद्रा प्रतिमांना भावदर्शी बनवतात.
प्रतिमेचं सर्वात विलोभनीय अंग म्हणजे अलंकार. भग्न प्रतिमांचेही अलंकार साक्षात जिवंत तर वाटतातच पण प्रत्यक्ष धातूंनीही घडवणं कठीण. असे अलंकार अत्यंत नाजूक आणि कलापूर्ण रीतीने दगडांतून बनवणं विलक्षणच. अंगद, मकरकुंडले, चन्नवीर, मुकुट, बाजुबंद, मेखला, श्रीवत्स ही त्या अलंकारांची तेवढीच सुंदर नावं. शिरोभूषणांचे तर अनेक प्रकार.
क्षत-विक्षत होऊन उघड्यावर उन्ह, वारा पावसात पडून आहेत शेकडो प्रतिमा. प्रत्येक प्रतिमा लखलखीत सौंदर्यानं नटलेली. या प्रतिमांच्या मागे एक सुंदर विचार, संपूर्ण परिपूर्ण शास्त्र आणि कलावंताचा उत्कट कलाविष्कार आहे. प्रतिमेमागच्या या कलेपर्यंत, त्या कलेच्या श्रेष्ठतेपर्यंत आणि त्या प्रतिमा निर्मिणार्‍या कलावंतांच्या उत्कटेपपर्यंत वर्तमान कधीतरी नक्कीच पोचेल. पण तोपर्यंत या अशा शेकडो प्रतिमा उपेक्षेच्या धुळीतून पुन्हा दगडांच्याच जन्माकडे नेणार्‍या मार्गावर चालू लागल्या असतील. त्या पाऊलखुणा कुठल्याही धुळीत उमटलेल्या नसतील आणि प्रत्यक्ष काळासोबत सुरू असलेल्या प्रदीर्घ युद्धात हे संचित कायमचं हरवलं असेल.
– संजीव देशपांडे
९०१११६५०७९