जाणिवा

0
119

माणूस मोठा झाल्यावर जाणिवा वाढतात, की जाणिवा वाढल्यावर माणूस मोठा होतो? माझ्यासाठी कायम अनुत्तरित राहिलेला हा प्रश्‍न, निमित्त झालं आजोळी एका लग्नसमारंभात जाणं. मी, पत्नी व मुलासह गेलो होतो. लग्नसमारंभ म्हणजे बरेच आप्तेष्ट व नातेवाईक हजर होते. जे जे कुणी ओळखीचे म्हणून वाटत होते, त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू होत्या. सारे जण एकमेकांची आपुलकीने विचारपूस करीत होते.
गप्पा सुरू असताना वेळेच्या चाकोरीतून भेटी हुकलेल्या, निसटलेल्या नातेवाईकांची पत्नी व मुलास ओळख करून देताना मी चांगलीच गफलत करीत होतो, कुणाला मावशीऐवजी मामी, काकाऐवजी मामा वगैरे सांगून नात्यांच्या ठेवणीत घोटाळे करीत होतो. ज्यांच्यासोबत ही गडबड झाली, त्यांनीही हे सारं हसून समंजसपणे घेतलं.
त्या प्रसंगी एक जाणवलं, ते म्हणजे नात्यांमधील आपुलकीचा अतूट स्नेह, परंपरेनुसार अंगवळणी पडलेला संस्कार, जो आजही मोठ्या व वयस्कर लोकांपुढे नमस्कारासाठी न चुकता वाकवतो.
सार्‍यांच्या गर्दीत बालपणचे बरेच सवंगडीसुद्धा दिसले. काही भेटले तर काहींना जाऊन भटलो. कुणी प्रकृतीने गांजलेले, थकलेले, कुणी थोडे सुटलेले, कुणी संसारसुख मानवलेले. विशेषत: बालमैत्रिणी, त्यातील काही आपण होऊन समोर आल्या तर काहींच्या समोर गेलो. सर्व जण भेटल्यावर साहजिकच जुन्या आठणींला उजाळा मिळत गेला आणि आम्ही त्या आठवणींत हरवत गेलो.
दुभत्या बकर्‍या पकडून छोट्याशा लोटीतून एकमेकांचं उष्ट दूध पिणं, कुणाच्या तरी घरून मोठ्यांच्या नकळत मीठ मसाला आणून कुणाच्याही मालकीच्या झाडांवर चढून कच्च्या कैर्‍यांचा फडशा पाडणं, नदीच्या वाटेवर करवंदाच्या जाळीत शिरून अंगाला ओरखडे येईस्तोवर करवंद खाणं, तेच हाल जांभळाचे, झाडावर दगड मारताना कुणाचं तरी डोकं फुटल्यावर उडालेली सगळ्यांची घाबरगुंडी. कोणता मामा चांगली गोष्ट सांगतो, त्याचा पिच्छा न सोडणं आणि त्यालाच दुसर्‍या दिवशीच्या आईसफ्रुटसाठी मामा बनवणं, इत्यादी सर्व गमती, किस्से वगैरे ऐकून व आमची तल्लीनता पाहून पत्नी व मुलाला मजा वाटत होती…
खूप वर्षांनी झालेल्या भेटीगाठींपेक्षा संसाराच्या दुनियादारीत राहूनसुद्धा काहींच्या जाणिवा बदलल्या नव्हत्या, मूळ स्वभाव तसाच होता म्हणून जुन्या आठवणींत रमलो होतो, पुन:पुन्हा लहान होत होतो. कदाचित आजच्या पिढीच्या तोंडून अशा काही गोष्टी आम्हाला ऐकावयास मिळत नसाव्यात म्हणून आम्ही लहान झालो होतो.
आमच्यापैकी काही मंडळी चांगल्या ठिकाणी मोठ्या हुद्यावर आहेत, काही यशस्वी व्यावसायिक आहेत. का म्हणून मोठेपणाच्या वा न्यूनगंडाच्या जाणिवा सतत जोखडासारख्या मानेवर, मनात ठेवून राहायचं? हे मान्य की, परिस्थिती वेळेला कुणालाच काही सुचू देत नाही, ती आपल्या रेट्यात सगळ्यांनाच ओढत नेते.
न्यूनगंडाच्या, कमीपणाच्या जाणिवांबाबत एकवेळ समजू शकतो, त्या जाणिवा माणसाला बदलवतात किंबहुना बदलायलाच भाग पाडतात. परंतु, मोठेपणाच्या जाणिवांचं काय? त्याही बदलवतात माणसांना अहंकाराची शाल घेऊन? खरं तर असं होऊ नये. संसारिक अडचणी तशा सर्वांना असतात, त्याहीपलीकडे बर्‍याच गोष्टी असू शकतात, म्हणून कुणी जगण्याचे नियम ठरवू नयेत, असं मला वाटतं. परिस्थिती कायम तशीच राहात नाही, ती बदलणारी असते. परिवर्तन घडविणारी असते आणि त्यानुसार जगण्याचे निकष बदलत राहतात व जगण्याची उमेद वाढवितात, म्हणूनच जीवन हे सुंदर आहे.
समारंभ ठरल्याप्रमाणे पुढे सरकत होता. तितक्यात हल्ली सरकारी नोकरीत बर्‍या हुद्यावर असलेल्या माझ्या एका मित्राला स्वत:हून भेटायला गेलो तर तो वरवर बोलला… अगदी सरकारी जी. आर.सारखा. भावनेचा लवलेश, स्पर्श नसलेलं… मला वाईट वाटलं. त्याहीपेक्षा अधिक वाईट वाटलं ते या गोष्टीचं की माणूस का असं करतो? व्यवहारी जगातले सारेच नियम वैयक्तिक जीवनात का वापरतो? ते वापरू नयेत असं मला वाटतं. कुठं गेलं ते बालपणीचं एकत्र खेळणं? न विसरण्याच्या शपथा घेणं? संसारिक, व्यवहारी जाणिवा एवढं बदलवतात माणसाला?
काय आणतो आपण सोबत? ना कपडे, ना संपत्ती, ना मानमरातब, नाती चिकटतात नंतर. वेगवेगळ्या पातळीवरची आपल्यात गुरफटून घेणारी, नवीन जिवाला त्याच्या मूळ नैसर्गिक स्वभावाला बदलवून व्यवहारी दुनियेत दुनियादारी करायला लावणारी. कितीही पुढारलो, शिकलो तरी आतला अहंकार सुटत नाही. ज्यांचा सुटतो, ते संतपदाला गेले. सामान्य स्वतःपलीकडे विचार करू शकत नाहीत.
जाणिवा चांगल्या असोत की वाईट, त्या झाल्या काय किंवा बदलत्या, वाढत्या वयानुसार आल्या काय? स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं. जो व्यक्तीत बदल घडवत जातो, जाणिवांचं अस्तित्व दाखवीत असतो, हे सत्यसुद्धा नाकारता येणार नाही.
शशिवाजी सांगळे
९५४५९७६५८९