सामाजिक दृष्टिकोन आणि चित्रपटांचे योगदान

0
109

माध्यमे ही समाजाचा आरसा असल्याचं मानलं जातं आणि ते खरंही आहे. वर्तमानपत्रे बातमी स्वरूपात माहिती पसरवतात तर अनेक लेखक आपल्या कथा, कादंबर्‍यांच्या रूपात समाजातील प्रत्येक विषयाला विस्तृतपणे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. या कथा-कादंबर्‍यांना सिने-निर्मात्यांनीसुद्धा मूर्त स्वरूप देत आपापली भूमिका निभावलेली आहे, यात काही वादच नाही. ‘मानवी आजार’ या विषयालाही अनेकांनी सक्षमपणे मांडून त्या आजारांची विस्तृत माहिती, वैद्यकीय व मानवी उपाय यासह समाजस्वीकार व एकुणात हाताळणीबाबत समाजप्रबोधन केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
‘आनंद,’ ‘दर्द का रिश्ता’ यासारख्या सिनेमातून कर्करोगाची तर ‘खामोशी’ व ‘खिलौना’सारख्या चित्रपटातून मानसिक रोगांना मांडले गेले, जे आजही सर्वांच्याच ध्यानात आहे. त्यानंतर सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, एस्परेगर्स सिंड्रोम, डिस्लेक्सिया, अल्झायमर, प्रोजेरिया, स्क्रिझोफ्रेनिया, शॉर्ट टर्म मेमरी लॉस आणि एरेटोमेनिया अशा चार-पाच हजारांमध्ये एखाद्यालाच होणार्‍या आजारांना गेल्या ७/८ वर्षांत हिंदी सिनेमावाल्यांनी जगासमोर मांडले आहे.
‘कल्की कोचलिन’ अभिनीत ‘मार्गारिटा विथ ए स्ट्रो’ या चित्रपटात ‘सेरेब्रल पाल्सी’ या रोगावर कथानक बेतलेले होते तर ‘फिर मिलेंगे’मध्ये सलमान खान व शिल्पा शेट्टी यांच्या अभिनयातून एचआयव्ही एड्स हा विषय विस्तृतपणे मांडण्यात आला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’मध्ये ‘अल्झायमर’ रोगाने पीडित एका वृद्धाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी अत्यंत उत्कृष्टपणे साकारली होती. त्यांच्या आंधळ्या विद्यार्थिनीची भूमिका राणी मुखर्जी हिने निभावली होती व यांच्यातील अत्यंत हळवे संबंध दाखवण्यात आले होते. त्यानंतर भन्साळींनी ‘गुजारीश’ या त्यांच्या चित्रपटात हृतिक रोशनला ‘क्वाड्रीप्लेजीया’ (यामध्ये मानेखालचे शरीर काम करत नाही) ग्रस्त तरुणाची भूमिका दिली होती. आर. बल्की यांच्या ‘पा’ या चित्रपटात ‘प्रोजेरिया’ या रोगाने पीडित १३ वर्षांच्या मुलाची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारून या रोगाची माहिती, परिणाम कुटुंबाची मानसिक अवस्था व अशा रोगाने पीडित मुलांना कुटुंबाने व समाजाने वागवण्याची व वाढवण्याची पद्धत जगासमोर मांडली होती. अमिताभ बच्चन यांच्या भरघोस प्रशंसेसह या अजबगजब रोगाकडे जगाचे लक्ष वेधण्यात मिळालेले यश लक्षणीय ठरले. ‘बर्फी’मध्ये ‘ऑटीझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ रोगग्रस्त ‘झिलमील’ साकारताना प्रियांका चोप्राने अभिनयाची कमाल केली होती. सोबतच रणबीर कपूर याने एक मूक-बधिर तरुणाची केलेली भूमिकाही लक्षणीय ठरली होती. आमीर खान याने आपल्या स्वत:च्याच बॅनरखाली ‘तारे जमीं पर’ या सिनेमात मुख्य भूमिका निभावत दर्शिल सफारी याला सोबत घेऊन ‘डिस्लेक्सिया’ या रोगाने पीडित एका मुलाची व्यथा मांडली होती. यातही पुन्हा अशा मुलांच्या कुटुंबाने व समाजाने या मुलाला स्वीकारण्याची, वागवण्याची व वाढवण्याची शिकवण समाजापुढे ठेवली होती. यात दर्शिल सफारी याने उत्तम कामगिरी नोंदवून पुरस्कारही प्राप्त केले होते. तद्वतच ‘गजनी’ या सिनेमातही आमीर खान यानेच ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ या आजाराने ग्रस्त तरुणाची भूमिका निभावली होती. एखाद्या अपघाताने व आघाताने असा आजार उद्‌भवू शकतो हेच अधोरेखित केल्याने हा सिनेमा चांगलाच गाजला होता.
वर उल्लेखलेल्या बहुतांशी चित्रपटांत अगम्य, अनाकलनीय व दुर्मिळ अशा मानवी आजारांची ओळख समाजाला करून देतानाच त्यावरील उपाययोजना अतिशय तरलतेने जगासमोर मांडण्यात आल्याने रसिकांनी यांना स्वीकारले व गौरविलेदेखील. कारण या समस्त कथासंहिता वाईटाकडून चांगल्याकडेच्या प्रवासाचं विस्तृत वर्णन व समाजप्रबोधन करणार्‍याच होत्या; परंतु अलीकडेच ‘गौरव’ या ‘एरेटोमेनिया’ या रोगाने
पीडित तरुणाची भूमिका शाहरुख खान याने निभावली होती. एखादा मानसिक आजार किंवा ‘अल्झायमर’सारख्या रोग्यांना असा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये एखादी प्रसिद्ध व्यक्ती वा सेलेब्रिटी आपल्यावर जीव ओवाळून टाकतेय असंच त्या रुग्णाला वाटतं व शक्यअशक्यतेच्या पलीकडे जाऊन केलेला हा विचार वास्तवतेच्या परिघात नसल्याची साधी जाणीवही त्या रुग्णाला असत नाही, हे विशेष! फिल्मस्टार आर्यन कपूरचा हा चाहता बराचसा त्याच्याच सारखा दिसत असल्याने त्याची एकूणएक गोष्ट कॉपी करून व सादर करण्याचं वेड याला लागलेलं असतं! या चित्रपटाची एकूण कथासंहिता ही नकारात्मकतेच्या मार्गावरच बेतलेली असून, त्याचा शेवटही तसाच दाखवला आहे. अशा दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेले तमाम रुग्ण, याचं वेगळेपण, त्यांचा जीवनप्रवास, यातना यातूनच अशा चित्रपटांची निर्मिती झालेली आहे आणि समाजाला शिकवणही लाभली आहे. ‘फॅन’सारख्या सिनेमातून दर्शवलेली नकारात्मकता तरुणांना प्रेरित ठरणार नाही, हेच मागणे!
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४