रंग असावा वेगळा

0
175

तुमचा मित्र तुमच्यावर रागावला आहे का? गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय्? मैत्रीचे अतूट धागे विविध स्नेहाच्या रंगात बांधले जात असताना मित्राप्रती मन आता हिरमुसलंय्? कारण काहीही असो, पण असं होता कामा नये. या जगात मैत्रीइतकं दुसरं सुंदर आणि पवित्र नातं असूच शकत नाही, पण हे तर चालायचंच्. म्हणून काय मैत्री कायमची तोडून टाकायची. नाही ना? आणि आता तर मित्राचा राग दूर करण्याकरिता येणारा रंगांचा उत्सव आपल्यासोबत आहे. तर मग रंगात रंगवून टाकू मित्राला आणि मनात असणारे रुसवेफुगवे मिटवून पुन्हा नव्याने रंगात रंगून जाऊ.
आपला देश, आपली संस्कृती, आपल्या देशातील विविध भाषा, बोली, वेशभूषा सार्‍यांचाच एक आगळावेगळा रंग. अशा विविध रंगांत बांधलेल्या संस्कृतीचे आपण एक घटक आहोत. आपल्या देशात हर्षोल्हासात साजर्‍या होणार्‍या अनेक महत्त्वाच्या सणांपैकी होळी एक महत्त्वाचा सण. अनेक भारतीय सिनेमांमधून या सणाचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर या होळीच्या रंगांवर खूप सुरेख फिल्मी गाणेही आहेत. हिवाळा पूर्णपणे संपलेला असताना या सणाची चाहूल लागते ती रानमाळात पळस फुलायला लागतो तेव्हा. तुम्ही कधी आळवाटेनं किंवा बसमधून, रेल्वेतून या दिवसांतून प्रवास करीत असताना खिडकीशेजारी बसून बाहेर पाहा, तर फळसाची आकर्षक लाल फुलं रानात कशी मस्त उठून दिसतात, याचा प्रत्यय तुम्हाला येईल. वर्षभर दुर्लक्षित असणार्‍या पळसाच्या अंगावर जणू सृष्टी वैभव पांघरते आणि या फळसाच्या फुलांशी तर प्रत्येकाचं एक नातं असतेच. मोठ्यांना तर या फुलांकडे पाहिलं की त्यांचं बालपण आठवते, त्यांच्या लहानपणी त्यांनी या फळसाच्या फुलांचा रंग बनवला असतो आणि त्या फुलांच्या रंगांनं त्यांनी हात रंगवलेेले असतात.
आजच्या युवकांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, हा सण त्यांच्याकरिता खूपच आनंद देऊन जाणारा आहे. काहींच्या महाविद्यालयीन परीक्षा अगदी तोंडावर असताना तर काहींच्या सुरू असताना हा सण येतो. पण, अभ्यासाचं निमित्त करून या सणाकडे कुणी पाठ फिरवत नाही. कारण रंगांचा हा सण आयुष्यातील विविध रंगांचं महत्त्व सर्वांनान पटवून देत असतो. कदाचित रंगांचं महत्त्व पटवून देण्याकरिता हा सण आहे. आपल्यात असणार्‍या वाईट प्रवृत्तींची होळी करून स्नेहाच्या, माणुसकीच्या रंगात रंगून जावं, असा मोलाचा संदेश या सणातून आपल्याला मिळतो.
आपला देश आणि आपली संस्कृती यांची हीच खासियत आहे की, त्यापासून आपण नेहमी काहीतरी शिकत जातो. अनेक रंगांत रंगून जाता मैत्री, एकोपा, स्नेह कायम टिकावा म्हणून हा उत्सव साजरा करायचा असतो. आपसातील दुरावा दूर करायचा असतो. पण, आज दुसरीकडे आपण पाहिल्यास आपल्या या सणांना गालबोट लावण्याचे अनेक प्रकार होतात. वेळ जेव्हा रंगात रंगून जाण्याची असते, तेव्हा वाईट प्रवृत्तीने वागून, अशा सणांना नशा करून समाजात अराजकता पसरविण्याचे काम कुठेकुठे होत असताना आपण आज पाहतो आहे. या प्रवृत्ती फोफावू नये, याची काळजी आज तरुणांनी घ्यायला हवी.
जीवन तर सारेच जगत आहेत आणि सारेेच आपली ठरलेली पायवाट चालत आहेत. पण आपली वाट, आपलं ध्येय, कार्य इतरांपेक्षा वेगळं आणि सार्‍यांना आकर्षून घेईल, असं असावयास पाहिजे. कला-साहित्य-संस्कृती सारेच अनोखे रंग, मनाचा विरंगुळा आणि आयुष्य रंगीत करण्याकरिता यात आपण हरवून, रंगून जावं. पण, त्यात रंगून जाताना त्यातल्या त्यातही आपला रंग असावा वेगळा! रंगांचा उत्सव होळी आपल्या सार्‍यांना हाच संदेश देतो. आपल्या जगण्यात एक वेगळेपण असावं. आपल्या आयुष्यातील आपलं जे ध्येय आहे, त्याला विसरता कामा नये. कारण आपल्या देशाप्रती, आईवडिलांप्रती आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि त्याकरिता आपण सज्ज राहिलं पाहिजे.
चला तर, होळीच्या या पावन पर्वावर आपल्या मित्रांना दूर न करता त्यांच्याशी आयुष्यभर सुखदु:खात सोबत राहण्याचं, आपलं ध्येय, स्वप्न पूर्ण करून आपला वेगळा रंग जोपासायचा निर्धार करू या…
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२