उत्तरप्रदेश, गोव्यात भाजपाची एकहाती सत्ता!

0
342

विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर
मणिपूरमध्ये कमळाची जोरदार मुसंडी • उत्तराखंडमध्ये अटीतटीचा सामना • पंजाबमध्ये कॉंग्रेस-‘आप’मध्ये चुरस
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ९ मार्च
आज गुरुवारी विविध वाहिन्यांनी जाहीर केलेल्या एग्झिट पोलनुसार, देशातील सर्वात मोठ्या राज्यात म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये भाजपाचा एकहाती विजयी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध वाहिन्यांच्या एग्झिट पोलनुसार, भाजपाला उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर येथे, तर कॉंग्रेस किंवा ‘आप’ पंजाबमध्ये बहुमत मिळेल, असे या वाहिन्यांनी म्हटले आहे. सर्वेक्षणांनी उत्तराखंडमध्ये अटीतटीचा सामना दाखविला आहे. मणिपूरमध्ये भाजपा पहिल्यांदाच बहुमतात येईल, असे या वाहिन्यांनी म्हटले आहे, हे विशेष.
‘टाईम्स नाऊ’ आणि ‘व्हीएमआर’ने केलेल्या एक्झिट पोलनुसार, उत्तरप्रदेशमध्ये २६ वर्षांनी कमळ फुलणार आहे. भाजपाची एकहाती सत्ता येथे स्थापन होईल, तर, मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागांपैकी २५ ते ३१ जागा भाजपाच्या खात्यात जाण्याचा अंदाज आहे. यामुळे मणिपूरमध्ये प्रथमच कमळ फुलणार आहे.
उत्तराखंडमध्ये अटीतटीचा सामना
२०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा या दोघांमध्ये केवळ एक जागेचेच अंतर होते. यावेळी देखील वेगळे चित्र असणार नाही. ‘सी-व्होटर’नुसार, ७० जागा असलेल्या या विधानसभेत भाजपा आणि कॉंग्रेसला ३२-३३ जागा मिळतील, तर ६ जागा इतरांच्या खात्यात जमा होणार आहेत.
गोव्यात भाजपा! : ‘सी व्होटर’नुसार, भाजपाला गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता मिळणार आहे. तर उत्तराखंडमध्ये अटीतटीची लढाई असेल. एक-एक जागा इथे महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे. ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी २१ जागा आवश्यक आहेत. ‘इंडिया टीवी सी व्होटर’नुसार, गोव्यामध्ये भाजपाला १५ ते २१, कॉंग्रेसला १२ ते १८ आणि आम आदमी पक्षाला ४ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुतांश एक्झिट पोल्समध्ये गोव्यामध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे पुढे आलेले नाही.
पंजाबमध्ये चुरस : पंजाबमध्ये अकाली-भाजपा युतीला धक्का देत ‘आप’ दिल्लीनंतर येथे सरकार बनवू शकेल, असे सी व्होटरने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. ११७ पैकी ६३ जागा ‘आप’ला तर अकाली-भाजपा युतीला ९ जागा दाखवल्या आहेत. इंडिया टुडे-ऍक्सीसच्या सर्वेक्षणानुसार, पंजाबमधील एकूण ११७ जागांपैकी कॉंग्रेसला ६२ते ७१ जागा मिळतील. तर, अकाली दल-भाजपाला ४ ते ७ जागा मिळतील. आम आदमी पक्षाला ४२ ते ५१ जागा इंडिया टुडे-ऍक्सिसने दिल्या आहेत. ‘इंडिया न्यूज’ने पंजाबमध्ये अकाली दल-भाजपाला सात आणि कॉंग्रेस व ‘आप’ला प्रत्येकी ५५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे.
इंडिया टुडे-ऍक्सिसने उत्तरप्रदेशात भाजपाला २५१ ते २७९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. उत्तरप्रदेशात भाजपाला सर्वाधिक जागा या सर्वेक्षण संस्थेने दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा यासाठी कारणीभूत असल्याचे सवेर्र्क्षणात म्हटले आहे. यानुसार, सपा-कॉंग्रेस आघाडीला ८८ ते ११२ आणि कॉंग्रेसला १०ते १५ जागा मिळतील. मायावतींच्या बसपाची कामगिरी संपूर्ण निराशाजनक राहील, असेही यामध्ये म्हटले आहे, हे विशेष.
तर, नेटवर्क-१८ च्या एक्झिट पोलनुसार उत्तरप्रदेशात भाजपा १८५ जागा मिळवून लर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर समाजवादी पक्ष -कॉंग्रेसला १२० जागा आणि बसपाला ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एबीपी माझा-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमधील आकडेवारी वेगळी आहे. यामध्ये भाजपला १६४-१७६ जागा, सपा-कॉंग्रेसला १५६-१६९ जागा , बसपाला ६०-७२ जागा आणि इतरांना २ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
न्यूज २४ आणि ‘टुडे चाणक्य’ यांनी उत्तराखंडमधील ७० जागांसाठी
भाजपाला ५३, कॉंग्रेसला १५ आणि इतरांना दोन जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. याच सर्वेक्षण संस्थेने पंजाबमध्ये ११७ जागांपैकी कॉंग्रेसला ५४ आणि ‘आप’ला ५४ जागा मिळतील असे म्हटले असून, अकाली दल-भाजपाला ९ जागा मिळतील, असे भाकित वर्तविले आहे.