सपा सरकारच्या कारभाराची चौकशी : मौर्य

0
72

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ९ मार्च
देशातील १४ राज्यांमध्ये आमचे सरकार आहे. ज्याला विकासाची दूरदृष्टी आहे, असा मुख्यमंत्री आम्हाला उत्तर प्रदेशसाठी हवा असल्याचे केशवप्रसाद मौर्य म्हणाले.
उत्तरप्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशाचे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. यंदा येथील जनता कोणाला कौल देणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी राज्यात भाजपचेच सरकार बनणार असल्याचा दावा केला. भाजप सत्तेवर येताच सपा सरकारच्या कामकाजाची चौकशी करणार असून, काही गडबड आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सत्तेत येताच गुंडगिरी, अराजकतेतून उत्तर प्रदेशला बाहेर काढून येथे सुशासन आणणार असल्याचे ते म्हणाले. येथील जनतेच्या भल्यासाठी स्वत:ला समर्पित करणारा, विकासाची आस असणारा आणि सुशासन देणारा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला मिळाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
तुमच्या अंगी असे गुण आहेत का, असे त्यांना विचारले असता. ते म्हणाले, मला उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मी ती नक्कीच पूर्ण करेल. एक्स्प्रेस वे, डायल १०० आणि मेट्रो प्रोजेक्टवरही मौर्य यांनी आपले मत मांडले. सरकार आल्यानंतर काय बंद करणार याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे ते म्हणलो. जर डायल १०९० चा प्रचारासाठीच उपयोग केला असेल, याचा जनतेला काहीच फायदा झाला नसेल तर त्याची समीक्षा केली जाईल. चूक आढळल्यास कारवाई करण्यात येईल. २०१४ प्रमाणेच यावेळीही जनता भाजपला आशीर्वाद देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.