अकोल्याच्या महापौरपदी भाजपाचे विजय अग्रवाल

वैशाली शेळके उपमहापौर

0
107

तभा वृत्तसेवा
अकोला,९ मार्च
अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे विजय अग्रवाल व उपमहापौरपदी भाजपाच्याच वैशाली शेळके यांची झाली आहे.
भाजपाचे ४८ व एक अपक्ष माधुरी मेश्राम अशी एकूण ४९ मते महापौर व उपमहापौर या दोघांना पडली. या दोघांच्या विरोधातील कॉंग्रेस उमेदवाराला १७ मते पडली. पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या दोघांना विजयी घोषित करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुक्त अजय लहाने अनेक अधिकारी उपस्थित होते.
आज गुरुवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अकोला महानगरपालिका सभेत अकोला महानगरपालिका महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी सभा झाली. या सभेकरिता विभागीय आयुक्त अमरावती यांनी अकोला जिल्हाधिकारी जी. श्रीकंात यांना पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. महापौर पदाकरिता एकूण दोन नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली होती. यापैकी कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक झाली.
त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांना ४९ मते तर विरोधात उभे असलेले कॉंग्रेस उमेदवार शे. मोहम्मद नौशाद शे. युसुफ यांना १७ मते मिळाली. उपमहापौर पदाकरिता चार अर्ज आले होते. त्यापैकी शिवसेनेचे राजेश मिश्रा व गजानन चव्हाण यांनी अर्ज मागे घेतले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैशाली विलास शेळके यांना एकूण ४९ मते प्राप्त झाली तर दुसरे उमेदवार कॉंग्रेस पक्षाच्या सुवर्णरेखा विजय जाधव यांना एकूण १७ मते प्राप्त झाली.
महापौर व उपमहापौर या दोन्ही पदासाठीच्या निवडणुकीत कॉंग्रेस सोबत आघाडी करत भारिपच्या तीनही सदस्यांनी कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केले. कॉंग्रेसचे १३, भारिपचे तीन व अपक्ष जका उल हक अशी १७ मते दोन्ही पदासाठी विरोधात उभ्या असलेल्या कॉंग्रेस उमेदवारांना मिळाली. भविष्यात कॉंग्रेस व भारिप मध्ये महापालिकेत आघाडी होण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व एमआयएम यांनी तटस्थ भूमिका बजावली. त्यामुळे १४ मते ही दोन्ही पदांसाठी तटस्थ राहिली. या सभेत उपजिल्हाधिकारी निवडणूक गजानन सुरंजे, मनपा उपायुक्त समाधान सोळंके, सहा. आयुक्त डॉ. दीपाली भोसले, नगरसचिव अनिल बिडवे यांची उपस्थिती होती.
सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी महापालिका आवार व महापालिका परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.