१० रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात

0
35

वृत्तसंस्था
मुंबई, ९ मार्च
दहा रुपयांची नवीन नोट लवकरच चलनात दाखल होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात घोषणा केली आहे. सुरक्षेच्या अतिरिक्त बाबींसह नव्या नोटा चलनात दाखल होतील.
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला केंद्रातील मोदी सरकारने विमुद्रीकरणाचा (नोटबंदी) निर्णय जाहीर करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या तत्कालीन नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांची नोट आरबीआयने व्यवहारात आणली. त्यानंतर सुरक्षेच्या अतिरिक्त फिचर्ससह शंभर, व पन्नास रुपयांच्या नवीन नोटाही चलनात आणण्याची घोषणा करण्यात आली होती.
महात्मा गांधी सीरिज २००५ मधील या नोटांवर दोन्ही नंबर पॅनेलमध्ये एल हे अक्षर चौकटीत असेल. आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी या नोटांवर असेल. नोटेच्या मागच्या बाजूला छपाईचे वर्ष (२०१७) असेल. दोन्ही पॅनेलवरील क्रमांकाचा आकार डावीकडून उजवीकडे वाढत जाईल. पहिल्या तीन अल्फा न्युमरिक कॅरेक्टर्सचा आकार मात्र कायम राहील. सध्या चलनात असलेल्या दहाच्या नोटा कायम राहणार आहेत.