कराचीतील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर

0
457

हजार वर्षाहून जुना इतिहास
वृत्तसंस्था
कराची, ९ मार्च
भारत आणि पाकिस्तानची फाळणी होऊन अखंड भारताचे दोन तुकडे झाले असले तरी या दोन्ही देशांचा प्राचीन इतिहास अजून तरी विभागला केलेला नाही. पाकिस्तानचे मुख्य बंदर व मोठे शहर कराची येथील पंचमुखी हनुमान मंदिर या देशांच्या झळाळत्या प्राचीन इतिहासाचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. हे मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते व आजही या ऐतिहासिक मंदिरात हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागलेल्या असतात.
या मंदिराचा इतिहास एक हजार वर्षांपेक्षा जुना असल्याचे पुरावे आहेत. या ठिकाणी भगवान राम आले होते असाही विश्‍वास आहे. या मंदिराचा संबंध थेट त्रेतायुगाशी जोडला जातो. मात्र, १८८२ मध्ये या मंदिराची पुनर्निमिती करण्यात आली होती.
कराची ही सिंध प्रांताची पूर्वीची राजधानी व अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील महत्त्वाचे व्यापारी बंदर. येथील पंचमुखी हनुमान मंदिरातील मूर्तीविषयी असे सांगितले जाते की ही मूर्ती जमिनीतून आपोआप वर आली. आज जेथे हे मंदिर उभे आहे तेथेच फार प्राचीन काळी जमिनीवरील ११ मुठी माती हटविल्यानंतर ही मूर्ती सापडली. त्यामुळे या हनुमानाला ११ किंवा २१ प्रदक्षिणा घातल्या की भाविकांची सर्व दुःखांपासून सुटका होते व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा भाविकांचा विश्‍वास आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसेच माजी परराष्ट्र मंत्री जसवंतसिंग यांनीही या मंदिराला भेट दिली होती. या मंदिरात हनुमानासोबत हिंदू देवी-देवतांच्याही मूर्ती आहेत आणि या मंदिराचा महिमा ऐकून सर्व समुदायाचे लोक या मंदिरात देवाच्या दर्शनासाठी येतात.