विश्‍व सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याकडे लक्ष : कोहली

0
45

वृत्तसंस्था
मुंबई, ९ मार्च
विश्‍व सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी. त्याकडेच माझे संपूर्ण लक्ष केन्द्रीत झालेले आहे असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. बीसीसीआयतर्फे देण्यात आलेल्या वर्षातील अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्काराने कोहलीला गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त केल्यानंतर कोहली म्हणाला की, मला विश्‍व सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याची इच्छा प्रारंभापासूनच होती. त्यामुळे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार हे मनात कुठेतरी निश्‍चित केले होते.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करणे आणि देशाला अग्रस्थानी नेणे हेच लक्ष्य नेहमी डोळ्यासमोर असते याकडे लक्ष वेधून कोहली म्हणाला की, माझ्यावर टीका करणारे आहेतच पण त्यांच्यापेक्षा मी नेहमी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्‍वास ठेवत असतो.
संघातील खेळाडूंकडून मिळणाऱया पाठिंब्याचेही कोहलीने यावेळी तोंडभरून कौतुक केले. गेल्या वर्षभरातील काळ माझ्यासाठी उल्लेखनीय राहिला. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवी संधी मिळण्याची इच्छा असते. दररोजची मेहनत, सराव शिबिर आणि त्याग यामुळेच गोड फळे चाखण्यास मिळतात. संघातील प्रत्येक खेळाडूचा योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते, असे प्रांजळ मत विराटने मांडले.