जीवन संगीत

0
107

एक दिवस शिक्षक वर्गात आले. त्या वेळी त्यांच्या जवळ काचेच्या दोन बरण्या, टेबल टेनिसचे बॉल, काचेचे कंचे व वाळू असे सामान होेते. आज शिक्षक कोणता नवीन प्रयोग करून दाखवणार याची मुलांना उत्सुकता होती. त्यांनी दोन्ही बरण्या टेबलवर ठेवल्या. एका रिकाम्या बरणीत त्यांनी टेबल टेनिसचे छोटे चेंडू भरले. बरणी पूर्ण भरल्यानंतर त्यांनी विचारले, ‘‘आता या बरणीत चेंडू बसतील का?’’ मुलांनी एका आवाजात उत्तर दिले, ‘‘नाही.’’ नंतर त्यांनी त्या बरणीत काचेचे कंचे टाकले. बरणी मधूनमधून हलवली. दोन चेंडूच्या मधल्या जागेत कंचे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा प्रश्‍न विचारला, ‘‘बरणी पूर्ण भरली का?’’ मुले होय म्हणाली. शिक्षकांनी पुन्हा भरणी हलवून त्यात वाळू टाकली. चेंडू व कंचे यांच्या जागेत बरीच वाळू मावली. आता मात्र बरणी पूर्ण भरली होती. नेमका कोणता प्रयोग सुरू आहे, याचा मुलांना अंदाज येत नव्हता. शिक्षक म्हणाले, आता दुसर्‍या बरणीत आपण हा क्रम उलटा करू. प्रथम त्यांनी ती बरणी वाळूने पूर्ण भरली. त्यांनी प्रश्‍न विचारला, चेंडू आणि कंचे आता यात टाकू शकू का? अर्थातच मुलांनी उत्तर दिले,‘‘नाही.’’ त्यांनी संपूर्ण वर्गावर एक नजर टाकली. काही क्षण थांबले व पुन्हा प्रश्‍न विचारला, ‘‘या तीनही वस्तू बरणीत भरायच्या असतील तर काय करावे लागेल?’’ मुलांनी उत्तर दिले,‘‘मोठी आधी, दोन क्रमांकाची त्यानंतर, लहान सर्वात शेवटी.’’ शिक्षक म्हणाले, ‘‘शाब्बास.’’ नंतर शिक्षक गंभीरपणे म्हणाले, ‘‘ही बरणी म्हणजे आपले जीवन. सर्वात महत्त्वाची गोष्ट आधी केली पाहिजे. कमी महत्त्वाची गोष्ट सर्वात शेवटी. असा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवता आला पाहिजे. जे छोट्या, कमी महत्त्वाच्या गोष्टींनीच जीवन भरतात ते आपल्या आयुष्यात फार काही करू शकत नाहीत.’’ ते बोलत असतानाच चपराशी वर्गात कॉफी घेऊन आला. बोलता बोलता त्यांनी चेंडू, कंचे असलेल्या बरणीत कॉफी टाकली. ते म्हणाले, कॉफी म्हणजे मनोरंजन, पहा त्यालाही या बरणीत स्थान मिळाले.
जीवनातल्या एका महत्त्वाच्या प्रश्‍नाला शिक्षकांनी हात घातला. एका मुलाने शिक्षकाला प्रश्‍न विचारला, ‘‘माझ्या दृष्टीने काय करणे योग्य राहील?’’ ते म्हणाले, ‘‘तुला काय करायचे आहे, हे प्रथम सांग. त्यावर तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर अवलबूंन राहील.’’
एकादा आपल्याला काय करायचे आहे, हे ठरविता आले तर त्यानुसार काय महत्त्वाचे आहे, हे ठरवणे सोपे जाते. अर्थात यातही वयानुसार, अनुभवानुसार, परिस्थितीनुसार बदल होऊ शकतो. अखंड जागरूक राहून वेळोवेळी अर्थपूर्ण जीवनासाठी ध्येय ठरवावेच लागते. पण आपले ध्येय आणि प्रत्यक्ष जीवनातला प्राधान्यक्रम यात प्रचंड अंतर पडते, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. जगण्याकरिता सर्वांना फक्त चोवीस तासच उपलब्ध असतात. खरे तर जीवन म्हणजे दोन बिंदूमधला वेळच. तो गेला म्हणजे गेला. म्हणूनच बरणी नक्की कशाने भरायची आहे, हा कळीचा मुद्दा आहे.
एक विचारवंत म्हणतो, ‘‘अशी एकच गोष्ट, जी आज आपण करत नाही, पण ती केली तर आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल होऊ शकतो, असे आपल्याला वाटते, ती शोधा आणि सुरू करा.’’ ती व्यायाम, नियमित अभ्यास, वाचन, संपर्क अशी काहीही असू शकते. मग दुसरी, तिसरी असा शोध व त्याची अंमलबजावणी सुरू ठेवली तर ध्येय साकार झाल्याशिवाय राहाणार नाही.
दिवसभर झाडांवर उड्या मारून माकडांना खूप झोप येते. त्या वेळी ते ठरवतात की माणसांसारखी घरे बनवली पाहिजे. निश्‍चय करून सर्व माकडे झाडांवरच झोपी जातात. सकाळ झाली की सर्वांचे पुन्हा उड्या मारणे व इकडे तिकडे हिंडणे सुरू. रात्र झाली की पुन्हा त्यांना त्यांच्या संकल्पाची आठवण होते. रोजच यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही. म्हणूनच आपण ठरवलेल्या गोष्टींबाबत आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का? हा प्रश्‍न स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. आपल्या हृदयाच्या आणि मेंदूच्या खोल तळाशी ती गोष्ट रुजली आहे काय? अंकुर तरी फुटला आहे का? तरच भविष्यात त्याचा विशाल वृक्ष होण्याची शक्यता असते. प्राधान्यक्रम ठरवताना अनेक गोष्टींना ठामपणे ‘नाही’ म्हणावे लागते. माणूस एन्जॉय, प्लेझर व एक्साइटमेंटमध्ये वाहून जातो. नकार देण्याची ताकद अंतर्मनातून येत असते. ती ताकद नसेल तर आपण ठरवतो एक, करतो भलतेच. म्हणूनच आपले ध्येय, आवड, कृती, क्षमता यांच्या सोबतच शरीर, मन, बुद्धी यांचाही सूर जुळला पाहिजे. असे झाले तर आपलेही जीवन संगीत बहरल्याशिवाय राहाणार नाही.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११