आली होळी

0
139

भारतीय कालगणनेतील शेवटच्या फाल्गुन या महिन्यातील होळी हा शेवटचा सण. फाल्गुन पौर्णिमेला होलिकोत्सव आणि बरोबर पंधरा दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात, चैत्र महिन्याचा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. या शेवटच्या फाल्गुन महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखत. या महिन्यात खगोलशास्त्रानुसार दररोज रात्रीच्या सुरुवातीस उत्तरा फाल्गुनी म्हणजेच इंग्रजीत ‘डेनेबोला’ हे नक्षत्र उगवते. हे नक्षत्र पूर्वेला उगवते आणि रात्रभर दर्शन देऊन पहाटे पश्‍चिमेस मावळते. याच महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या बाजूला असतो, म्हणून या महिन्याला ‘फाल्गुन’ हे नाव मिळाले आहे.
फाल्गुन पौर्णिमेच्या होलिकोत्सवाला उत्तर भारतात ‘दोलायात्रा’ आणि दक्षिणेत ‘कामदहन’ म्हणतात. मराठी भाषेत ‘होळी’ या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. परंपरेत होळीच्या उत्सवाच्या विविध कथा सांगितल्या जातात. कृष्ण लहान असताना त्याला मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठविले. पण दूध पीत असताना कृष्णाने तिचा प्राणच शोषून घेतला, अशी एक कथा आहे. या पूतना राक्षसीचे होळीच्या दिवशी रात्री दहन केल्या जाते. महाराष्ट्रात एक वेगळी कथा प्रचलित आहे. ढुंढा नावाची एक राक्षसी लहान मुलांनाच त्रास देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन, ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला की ती वर्षभर गावातील मुलांना त्रास देत नाही, असा एक समज आहे.
दक्षिण भारतात होळीची एक वेगळीच कथा सांगतात. भगवान शंकर एकदा कठोर तपश्‍चर्या करीत होते. त्यावेळी देवांनी मदनाचा वापर करून त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान शंकर संतापले, त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि मदनाला भस्मसात केले. हेच कामदहन. वसंत ऋतूचे स्वागत हाही या उत्सवाचा उद्देश आहे. कथा वेगवेगळ्या असल्या तरी संपूर्ण भारतात होलिकोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लाकडे जमा करून त्यांची होळी करण्याची प्रथा होती. यात आता फरक पडला आहे. पर्यावरण आणि झाडांच्या तोडण्याचा संबंध सर्वसामान्यांना कळला. लाकडे जाळण्याचे प्रमाण कमी झाले. आता नगण्य लाकडे जाळल्या जातात, केवळ प्रथा म्हणूनच.
आला शिमगा
होलिकोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी रंगाचा उत्सव, धूलिवंदन साजरा केला जातो. धूलिवंदन म्हणजेच रंगपंचमी, शिमगा, धुळवड अशीही ओळख आहे. पूर्वी हा उत्सव पंचमीला साजरा व्हायचा, म्हणून रंगपंचमी. पण रंगाची उधळण करून वसंत ऋतूचे स्वागत केल्या जाते म्हणून रंगपंचमी कायम राहिले. होळी झाली की ‘होळी जळाली, थंडी पळाली’ असे असतेच. म्हणूनच दुसर्‍या दिवशी रंगांसोबत पाण्याची उधळणही केली जात असावी. होळीला लाकडे जाळणे जसे चुकीचे, तसेच धुळवडीला पाण्याची उधळपट्टी वाईटच. उधळण वेगळी, उधळपट्टी वेगळी. मध्यंतरी आपण धुळवडीच्या, शिमग्याच्या दिवशी पाण्याची उधळपट्टीच करायला लागलो होतो. पाण्याची चणचण तीव्र झाली आणि आपण जागे झालो. पाण्याची उधळपट्टी जवळजवळ थांबलीच. प्यायलाच मिळणे कठीण झाले, उधळणार कुठून असे झाले.
मुळातच शिमगा हा उत्सव समूहांनी साजरा करायचा. मुलांचा समूह, तरुणांचा जत्था, स्त्रियांचा, पुरुषांचा गट असाच तो साजरा केला जातो. अशा अनेक समूहांनी आता पाण्याची उधळण तर दूरच, पण पिचकारीतूनसुद्धा रंग उडवणे थांबवले आहे. ओले, पाण्यात मिसळलेले रंग बाजूला ठेवून कोरड्या रंगांचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. दरम्यान, अनेक रंग अत्यंत हलक्या दर्जाचे आणि घातक प्रक्रिया करणारे म्हणून लक्षात येऊ लागले. विशेषत: रासायनिक प्रक्रियेद्वारा तयार केले जाणारे रंग अतिशय धोकादायक असल्याचे सिद्धच होऊ लागले. लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनियम ब्रोमाईड, पर्शियन ब्ल्यू, मर्क्युरी सल्फाईट, क्रोमियन आयोडाईड ही घातक रसायने विविध रंगांमध्ये वापरली जातात, ती मानवी प्रकृतीला न झेपणारीच असतात.
त्वचा, डोळे, श्‍वसनक्रिया, दमा अशा विविध अवयव आणि विकारांना घातक ठरणारी ही रसायने गेल्या काही वर्षांपासून दणकेच देत आहेत. २०१२ च्या शिमग्याने एकट्या मुंबईत रासायनिक रंगांमुळे दोनशे जणांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. काही वर्षांपूर्वी या शिमग्याला पिण्याच्या दारूचीही जोरदार उधळण होत असे. पण आता जशी पाण्याची उधळपट्टी वाईट, रासायनिक रंग जसे घातक हे लोकांना कळू लागले, तसेच दारूचे झाले आहे. दारू आणि घात या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पारंपरिक सत्य आहे. ते परंपरेनेच पिढीकडून पिढीला उमगलेलेही असते. पण अंमल मात्र दारूचाच असतो. तो कमी झाल्याचेही जाणवत आहे काही वर्षांपासून. पण तो संपायलाच हवा आहे, कायमचा.
अनिरुद्ध पांडे,९८८१७१७८२९