मोगरा फुलला

0
84

मेट्रोतल्या बायको

बोरीवलीहून अंधेरीला निघालेली लोकल ट्रेन आपल्या लयीत चालली होती. त्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या डब्यात बसलेली केतकी, डोक्यात घोळणार्‍या नृत्याच्या एका तुकड्यावर मनातल्या मनात कितव्यांदा तरी लयबद्ध गिरक्या घेत होती. एका सीरियलसाठीची ऑडिशन टेस्ट द्यायला ती निघाली होती. एका नर्तिकेच्या जीवनावरची ती सीरियल, नव्यानं नावारूपाला आलेला एक दिग्दर्शक दिग्दर्शित करणार असल्याची आणि त्यासाठी तो नव्या टॅलेण्टच्या शोधात असल्याची खबर केतकीला मिळाली, तेव्हा वेळ न दवडता तिनं आपले फोटो आणि माहिती त्या एजन्सीच्या ऑफिसात नेऊन पोहोचवली होती आणि आता शॉर्टलिस्ट होऊन तिथून बोलावणे आल्यावर अंधेरीच्या एका स्टुडियोमध्ये निघाली होती.
‘‘लेकीसाठी आता स्थळं बघायला हवीत!’’ एक दिवस तिच्या आईनं तिच्या बाबांना सांगितल्यावर, ‘‘आपल्याला एवढ्यात लग्न करायचं नाही. नृत्य, अभिनय यात करीयर करायचंय’’ म्हणून तिनं आईबाबांना ठासून सांगितलं होतं. ‘‘इथे औरंगाबादसारख्या शहरात नाही, त्यासाठी मुंबईला जावं लागेल!’’
‘‘अगं तू आमची एकुलती एक लेक… आमचा विचार तरी केला आहेस का? आणि त्यासाठी केवढा स्ट्रगल करावा लागेल! इथलं सुखासीन आयुष्य सोडून ही कसली अवदसा आठवत्येय तुला? करीअर करायला इतर क्षेत्रं नाहीयेत का?’’ आईनं एकदम प्रश्‍नांची सरबत्ती आणि पाठोपाठ डोळ्यांतून टिपं गाळायला सुरुवात केली होती.
‘‘आतापर्यंत कधी अनवाणी पायांनी चालली नाहीयेस. मातीचा स्पर्श अनुभवला नाहीयेस! उद्या हाल-अपेष्टेतल्या शेतकर्‍याच्या बायकोची भूमिका वठवायला कोणी म्हटलं तर गाठीशी काय अनुभव आहे गं? चांगलं एमबीए करून तरी करीयर कर, करीयरच करायचंय तर!’’ वडिलांनी थोडंसं कठोरपणेच म्हटलं होतं! अखेरीस आईवडिलांशी भांडून, त्यांच्याकडून फारसे पैसेही न घेता केतकी आपल्या एका मैत्रिणीच्या ओळखीनं पेईंग गेस्ट अकोमोडेशन मिळवून औरंगाबादहून मुंबईला येऊन राहू लागली होती. फिल्म इंडट्रीतल्या नट-नट्यांनी केलेल्या स्ट्रगलच्या कहाण्या आठवत, वडा-पाव खाऊन दिवस कंठत, कामं मिळवण्यासाठी अनेक एजन्सीजच्या ऑफिसचे उंबरठे झिजवत होती. कुठल्या तरी एका नाटकाच्या ऑडिशन टेस्टमध्ये आवश्यक असलेलं मोगर्‍याचं इवलंसं रोप तिलाच विकत आणावं लागलं होतं, ते तिनं नंतर आपल्या खोलीच्या खिडकीत ठेवलं होतं.
‘‘बेला! मल्लिका!’’ तिनं कुंडीतल्या त्या मोगर्‍याच्या रोपाला पाणी घालता-घालता उद्देशून म्हटलं होतं, ‘‘आजपासून माझ्या या संघर्षाच्या कहाणीची तूच साक्षीदार बरं!’’
अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर तिला एक-दोन सीरियल्समध्ये शेजारीण, मैत्रीण अशा किरकोळ भूमिका मिळाल्या. एरवी ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ म्हणत तिनं त्या धुडकावून लावल्या असत्या. पण जागेचं भाडं, जगण्यासाठी आवश्यक असलेले खर्च बघता तिला त्या भूमिका स्वीकाराव्या लागल्या.
‘‘गरजवंताला अक्कल नसते बेला! पण एक दिवस आपला पण येईल हं मल्लिका! आपण प्रमुख भूमिकेत असू लवकरच!’’ तिनं हळुवारपणे मोगर्‍याच्या रोपाला गोंजारलं. ‘‘उद्या शूटिंगला जायचंय!’’ हवेची एक प्रसन्न झुळूक आली आणि मोगर्‍याचं ते इवलं रोप डोलायला लागलं, तेव्हा पानांच्या आड दडलेल्या दोनतीन बारीक कळ्यांचा गुच्छ तिच्या नजरेला पडला. ‘‘मल्लिके, अभिनंदन!’’ तिनं म्हटलं. ‘‘केवढा गं शुभसंकेत!’’ तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.
‘‘यू हॅव बीन शॉर्टलिस्टेड. उद्या ऑडिशनसाठी या.’’ फोन करणार्‍यानं तिला नीट माहिती दिली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
मनात गुंजत चाललेल्या तत्काराची सम गाठत केतकी अंधेरीला उतरली. अंगावर आदळणारे गर्दीचे लोंढे चुकवत ऑटोरिक्षा घेऊन ती त्या जागी पोहोचली, तेव्हा तिथे तिच्यासारख्याच आणखी पंधरा-वीस मुली आपल्या ऑडिशन टेस्टच्या प्रतीक्षेत बसल्या होत्या. बहुतेक जणी नखशिखान्त नटून आलेल्या होत्या. जवळजवळ सगळ्याच जणी इतर स्पर्धक मुलींकडे तुच्छ कटाक्ष टाकत आपापल्या महागड्या मोबाईल फोनवर बोलण्यात गर्क होत्या. या पार्श्‍वभूमीवर आपल्यासारख्या साध्या वेषभूषेतल्या, साध्या मोबाईलवाल्या व्यक्तीला कोण पुसणार? त्या वातावरणात तिला प्रचंड गुदमरायला लागलं. तेवढ्यात ऑडिशन टेस्ट सुरू होतेय म्हणून दिग्दर्शकाचा एक मदतनीस त्यांना थोडक्यात माहिती सांगू लागला.
‘‘ए केतकी, ही नामी संधी लाभलीये, तिचं सोनं करायचं बरं का!’’ मोगर्‍याच्या रोपातल्या रूपातली तिची सखी मल्लिका जणू अदृश्यपणे अवतरून तिच्या कानात गुंजन करू लागली, ही नर्तिका अगदी गरिबीतून वर आलीये. तिच्याजवळची एकमेव मौलिक वस्तू म्हणजे तिच्याजवळची नृत्यकला. मग ते सगळं नृत्य आणि अभिनयात व्यक्त व्हायला हवं बरं!
केतकीला आत बोलावल्यावर, कॅमेरा रोल झाल्यावर, साकारायच्या एका दृश्यात आणि नृत्यात तिनं स्वतःला झोकून दिलं.
‘‘सुपर्ब!’’ दिग्दर्शक आणि त्याच्या सहकार्‍यांनी न राहवून तिला दाद दिली. ‘र्‘आम्ही तुम्हाला निकाल लवकरच कळवू!’’ त्यांनी सांगितलं, तेव्हा आशा-आकांक्षांच्या हिंदोळ्यावर झुलत ती आपल्या खोलीत परतली. दोनेक तासांनी दिग्दर्शकानं स्वतः फोन करून नर्तिकेच्या मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाल्याचं कळवलं तेव्हा अत्यानंदानं मोगर्‍याच्या रोपाजवळ जाऊन आपल्या अश्रूंना तिनं वाट करून दिली.
आठवडाभरातच त्या मालिकेचं शूटिंग सुरू झालं. ती मालिका टीव्हीवर झळकताच अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि रोजची मालिका असल्यामुळे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत केतकी शूटिंगमध्ये गुंतून राहू लागली. आता तर केव्हातरी घरी पोहोचायचं, जेमतेम थोडीशी झोप घ्यायची आणि पुन्हा सकाळ होताच शूटिंगमध्ये गुंतायचं, अशा व्यग्र दिनक्रमात केतकी अडकली. दोन-तीनदा आईनं केलेल्या फोनला ‘‘नंतर बोलते’’ एवढंच उत्तर देण्याइतपत तिला वेळ मिळाला. अद्याप नर्तिकेची बालपणातली व्यक्तिरेखाच लोकांपर्यंत पोहोचली होती. केतकीला लोकांपर्यंत पोहोचायला अंमळ वेळ लागणार होता. पण, कास्टिंगवाल्यांनी लहानपणीची नर्तिका मोठी झाल्यावर कशी दिसेल, याचा अभ्यास करूनच कमालीचं साम्य असलेल्या बाल अभिनेत्रीला आणि केतकीला निवडलं होतं. आणखी महिनाभर तरी प्रेक्षकांना बालरूपातली नर्तिका भेटणार होती.
‘‘केतकी, एक सांगायचंय, प्रेक्षकांना बालरूपातली नर्तिका खूप भावतेय, त्यामुळे आम्ही आणखी महिनाभर तरी तो भाग वाढवणार आहोत! पण प्रॉब्लेम असा आहे, की त्या चाईल्ड आर्टिस्टला आम्हाला रिप्लेस करावं लागतंय, नवीन चाईल्ड आर्टिस्ट आहे, पण तिच्याबरोबर मॅच होणारीच मोठी नर्तिका आम्हाला लागेल; वी आर सॉरी, आम्ही तुला कंटिन्यू नाही करू शकत, आम्हाला दुसर्‍या आर्टिस्टला घ्यावं लागणार!’’ दिग्दर्शकानं फोन करून तिला प्रांजळपणे सांगितलं. इतक्या दिवसांच्या तिच्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर पाणी फिरलं होतं. शिवाय केलेल्या कामाचा मेहनताना मिळाला नव्हताच; उलट तिच्याजवळ जी काही जमापुंजी होती, तीही खर्च झाली होती! निराश होऊन ती आपल्या खोलीवर परतली. इतक्या दिवसांनी तिनं खोलीच्या खिडकीकडे धाव घेतली. तिथे ठेवलेलं कुंडीतलं मोगर्‍याचं रोप अगदीच फिकुटलं होतं. त्याची पानं आणि कळ्या वाळलेल्या होत्या. त्या रोपासारखाच केतकीच्याही नशिबातला संघर्ष संपला नव्हता. ‘‘मल्लिके, मला क्षमा कर!’’ तिनं अपराधी भावनेनं मोगर्‍याच्या रोपाला पाणी घातलं. या महिन्याचं जागेचं भाडं देऊन झालं की, आपल्याला खायलासुद्धा पैसे नसणारेत! अर्धपोटी, उपाशीपोटी राहावं लागणारे! तिनं मनातलं सगळं अश्रूंच्या वाटे मोगर्‍याच्या रोपाला सांगून टाकलं. आठवड्यातून दोन-तीन दिवस उपास आणि उरलेले चार-पाच दिवस एक वेळ वडापावावर काढत ती लोकांनां कामासाठी भेटू लागली.
‘‘मी कास्टिंग एजन्सीमधून बोलतोय. काल तुम्ही आपला पोर्टफोलियो आमच्याकडे घेऊन आला होतात, तेव्हा एक मोठे डायरेक्टरपण होते तिथेच! शेतकर्‍यांच्या समस्यांवर आधारित फिल्म करताहेत ते! शेतकर्‍याच्या बायकोच्या मेन रोलसाठी त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलंय… मॅडम, तुम्ही तुटलेली चप्पल घालून आलात, नंतर चक्क अनवाणी पायांनी गेलात, त्यानं खूप इम्प्रेस झालेत ते!’’ कास्टिंग एजन्ट म्हणाला. ‘‘अं? हो! नेमकी चप्पल तुटली तिथे आले तेव्हा, आजूबाजूला कुणी रिपेयर करणारापण नव्हता!’’ तिनं धडधडीत खोटं सांगितलं. पैसे नसल्यामुळे इतक्या लांब ती पायपीट करीत गेली होती, आणि चप्पल दुरुस्त करायलापण तिच्याजवळ पैसे नव्हते!
‘‘तुम्ही येऊ शकता का दोन तासांत इथे? डायरेक्टर आणि प्रोड्युसरपण येणारेत, कॉन्ट्रॅक्ट साइन करायचाय!’’ त्यानं म्हटलं.
‘‘मल्लिके, थट्टा आहे का गं ही पुन्हा?’’ तिनं अश्रुपूर्ण नेत्रांनी मोगर्‍याच्या रोपाला गोंजारलं. कुठूनतरी हवेची प्रसन्न झुळूक आली आणि मोगर्‍याचं ते इवलं रोप डोलायला लागलं, तेव्हा पानांच्या आड दडलेल्या दोनतीन टपोर्‍या कळ्यांचा गुच्छ तिच्या नजरेला पडला. त्या रूक्ष महानगरात कुंडीतलं ते इवलंसं रोप आभाळाकडे झेपावू पाहात होतं. मोगरा आता फुलू लागला होता…
***
रिद्धी-सिद्धी हॉस्पिटलवर शोककळा पसरली होती. तिथे काम करणारे सगळे डॉक्टर दु:खात बुडाले होते आणि पेशण्टस्‌सुद्धा हळहळत होते.
रिद्धी-सिद्धी हॉस्पिटल. रिद्धीच्या आईबाबांनी आपल्या हॉस्पिटलचं नामकरण केलं. खूप लांबूनपण ते नाव ठळकपणे दिसू लागलं, तेव्हा आपलं नाव आलं म्हणून लहानगी रिद्धी खूप आनंदली होती. तिचे आईबाबा मुंबईतले नामवंत डॉक्टर होते. मुंबईत आपलं छोटेखानी का होईना, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. आठ वर्षांपूर्वीचा त्या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहोळा रिद्धीला स्वच्छ आठवत होता. ‘‘पण सिद्धी कुठेय?’’ बालसुलभ प्रश्‍न तिनं विचारला होता. ‘‘मला एकटीला नाही करमत, सिद्धीला आणा.’’ तिनं लहानपणी तगादा लावला होता. अखेरीस त्यांनी सिद्धीला न आणल्यामुळे कंटाळून तिनं आपल्या बाहुलीचंच नाव सिद्धी ठेवलं होतं. ती बाहुली आज कोपर्‍यात दीनवाणी होऊन उभी होती. आपापल्या विषयातले तज्ज्ञ असलेले तिचे डॉक्टर आईबाबा एका सेमिनारमधली आपली भाषणं आटपून गाडीनं मुंबईला परत येत असताना रस्त्यावरच्या भीषण अपघातात जागच्या जागी ठार झाले होते. केवळ गाडीचा ड्रायव्हर बचावलेला होता. सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला होता.
‘‘हे काय, कसं झालं?’’ रिद्धीच्या आजीनं हंबरडा फोडला. ‘‘देवा, मला म्हातारीला टाकून माझ्या मुलीला आणि जावयाला का उचलून नेलंस? माझ्या नातीचं कसं होईल?’’
रिद्धीनं एकदाच आईबाबांच्या निष्प्राण शरीरांकडे बघून रडून घेतलं. आपण रडत राहिलो, तर आपल्या सत्तर वर्षांच्या आजीला आणखी क्लेश होईल! तिला सावरलं पाहिजे! चौदा वर्षांच्या त्या शाळकरी मुलीनं विचार केला. ‘‘आजी, तूच मला भगवद्गीतेतल्या श्‍लोकांचे अर्थ सांगतेस ना की शरीर नाशिवंत असलं तरी आत्मा अमर आहे म्हणून!’’ अनेक प्रकारांनी रिद्धी आपल्या आजीचं सांत्वन करीत राहिली. दोघींना भेटणार्‍यांची रीघ लागली होती. शेवटचे संस्कारही रिद्धीनंच केले.
आजीची आणि हॉस्पिटलची जबाबदारी आता रिद्धीच्या कोवळ्या खांद्यांवर होती.
‘‘आजवर साधा हातरुमाल धुवावा लागला नाही आपल्याला, पण रिद्धी मॅडम, आता आपण दहावीत आहोत, आता हॉस्पिटलची जबाबदारी आपल्याला सांभाळायची आहे. लोक कदाचित आपल्याला फसवतील, पैशांनी लुबाडतील; तेव्हा आपल्याला व्यवहारातले खाचखळगे शिकायचेत, कुणालाही न दुखवता खूप कौशल्यानं जबाबदारी पार पाडायची आहे!’’ तिनं स्वतःला बजावलं.
‘‘रिद्धी, शाळेतून आल्यावर तू क्लासलाच जातेस न?’’ आजीनं विचारलं.
‘‘आजी, शाळेत जे काही टीचर्स शिकवतात, ते मी मन लावून शिकते, स्वतःच त्याची उजळणी करते. त्यामुळे मला वेगळा क्लास लावावा लागणार नाही, याची खात्री आहे गं! सध्या मात्र मी दोन-तीन वकिलांकडे जाऊन त्यांचे सल्ले घेते आहे! म्हणजे माझ्या वर्गमैत्रिणींचेच बाबा आहेत ते, आणि मला खूप मदत करताहेत!’’ तिनं आजीला सगळं समजावून सांगितलं .
रिद्धीची दहावीची परीक्षा संपायच्या वेळी तिच्या आजीनं या जगाचा निरोप घेतला. तिचेही शेवटचे संस्कार रिद्धीनंच केले आणि मग शेवटचा पेपर द्यायला गेली. तिघांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिनं हॉस्पिटलच्या समोर केलेल्या छोट्या बागेमध्ये मोगर्‍याची रोपं लावून घेतली. आईबाबांना केवळ बघूनच पेशण्टस् अर्धे बरे व्हायचे, तसे आता या मोगर्‍याच्या फुलांच्या सुवासानी होतील! तिनं मनोमन विचार केला.
‘‘रिद्धी मॅडम, तुम्ही हे हॉस्पिटल विकून का टाकत नाही? चांगले पैसे मिळतील!’’ काही डॉक्टर्सनी तिला थेटच विचारलं. मुंबईत मोक्यावरच्या जागी असलेलं, उत्तम नावलौकिक असलेलं ते हॉस्पिटल विकत घेण्याची तयारीही दर्शवली.
‘‘माफ करा डॉक्टर अंकल, हे हॉस्पिटल, हे माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं, त्यामुळे त्यांनी हे जे विश्‍व निर्माण केलंय ना, ते तसंच राहील, त्याचं नावपण आपण त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्हणून बदलून घेणार आहोत!’’ तिनं सांगितलं. संघर्ष करत पावलोपावली येणार्‍या अडचणींवर मात करीत, नव्या गोष्टी शिकत तिनं जुन्या डॉक्टरांना टिकवून ठेवलं आणि नव्यांना हॉस्पिटलशी जोडून घेतलं होतं. ‘‘आणि मी आता हॉस्पिटल मॅनेजमेण्टचं, वकिलीचं शिक्षण घेईन आणि माझ्या आईबाबांचं नाव आणखी दूरवर पोहोचवीन! आपल्या देशातल्या अनेक रुग्णांना चांगल्या डॉक्टरांअभावी आणि महागड्या ट्रिटमेण्टपायी आरोग्यसेवेचा लाभ घेता येत नाही, आपण त्यांना परवडेल अशा किमतीत कुशल वैद्यकीय सेवा पुरवणार आहोत! त्या कामी अर्थातच आपल्या सर्वांची मौलिक साथ असावी, एवढीच इच्छा आहे!’’ तिनं मृदु शब्दांत त्यांना सांगितलं.
त्या रूक्ष महानगरात हॉस्पिटलच्या बाहेरच्या छोट्या बागेतल्या मोगर्‍याला बहर आला होता आणि त्याचा सुगंध आसमंतात दरवळत होता…
रश्मी घटवाई
९८७१२४९०४७