केळ

0
164

खाद्यपुराण

स्टफ बनाना रोल
साहित्य – वेलची केळी ६, २ ते ३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या कुटलेल्या, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ चमचा तांदळाचे पीठ,
स्टफिंगसाठी मसाला – ३ टे. स्पुन किसलेले पनीर + १ चमचा भाजलेले तीळ + १ चमचा खोबर्‍याचा कीस , कोथिंबीर + मीठ + लिंबाचा रस + साखर चवीनुसार, चाट मसाला.
कृती – उकडलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात ठेचलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. स्टफिंगचे साहित्य (चाट मसाला सोडून) एकत्र करून घ्यावे.
केळीची सालं सोलून केळीला चिरा द्यावा व त्यात वरील सारण भरून वरून चाट मसाला भुरभुरावा. बटाट्याच्या मिश्रणाची पारी करून आत भरलेले केळ ठेवावं व पारीने कव्हर करून घ्यावे. थोडे तांदळाचे पीठ किंवा मैदा घेऊन त्यावर हा रोल फिरवावा व गरम तेलात तळून चटणीसोबत सर्व्ह करावा.

केळीचे समोसे
साहित्य – कच्ची केळी २, १ छोटा चमचा जिरे + मोहरी, १ चमचा भाजलेले धने (थोडे कुटलेेले), पाव चमचा सोफ, अर्धा चमचा हळद, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ इंच अद्रक पेस्ट करून, २ चमचे तेल, चवीनुसार मीठ.
आवरणाचे साहित्य – १ कप मैदा + २ टे. स्पून तेल (मोहनाकरिता) मीठ, पाव टीस्पून ओवा.
कृती – कच्ची केळी कुकरमध्ये सालासकट वाफवून घ्या. थंड झाल्यावर साल काढून कुस्करून घ्या. पॅनमध्ये फोडणीकरिता तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी +हिंग + धने + सोफ घालून हिरवी मिरची अद्रक पेस्ट घालून परतून घ्या. हळद आणि कच्ची केळी घालून चवीनुसार मीठ घाला आणि भाजी व्यवस्थित परतवून घ्यावी. आवरणाचे सर्व साहित्य एकत्र करून मैदा भिजवून घ्या. मैद्याची छोटी गोळी घेऊन त्याची लांबट आकाराची पुरी लाटून मधोमध कापून दोन भाग करा. एका भागाला कोनाचा आकार देऊन त्यात केळाचे सारण भरा व पाणी लावून कडा बंद करा. अशाप्रकारे समोसे तयार करून मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

केळीची चीज घालून पौष्टिक बाकरवडी
साहित्य – ६ कच्ची केळी, २ चमचे हिरवी मिरची, अद्रक पेस्ट, १ लिंबाचा रस, मीठ, १ चमचा धने पावडर, १ चमचा तीळ, साखर चवीनुसार, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, कोथिंबीर, चीज क्युब, तांदळाचे पीठ १ चमचा.
आवरणाकरिता – मैदा १ कप, २ टे.स्पुन मोहनाकरिता तेल, चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा.
कृती – कच्ची केळी उकडून घ्यावीत व साल काढून कुस्करून घ्यावीत. त्यात मिरची अद्रक पेस्ट + मीठ + साखर + लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. आवरणासाठी घेतलेला मैदा + तेल + मीठ + ओवा एकत्र मिसळून पाण्याने घट्ट गोळा भिजवून घ्यावा व ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. तयार मैद्याची एका फुलक्याकरिता घेतो तितका गोळा घेऊन पातळ पोळी लाटून घ्यावी. त्यावर केळाचे सारण पसरवावे व वरून चीज किसून घालावे व या पोळीचा रोल तयार करावा (गुंडाळी करावी). दोन्ही साईडच्या कडा बंद कराव्यात. आता या रोलचे तुकडे करावे व दोन्ही उघड्या कडा तांदळाच्या पीठाला लावून गरम तेलात बाकरवडी तळून घ्या.

केळीच्या सालींचा झुणका
साहित्य – पिकलेली पण घट्ट केळी (सालींवर डाग नकोत) ६, कांदे ३ मोठे, लिंबाचा रस, २ हिरव्या मिरचीचे तुकडे, तिखट १ चमचा, हळद पाव चमचा, बेसन आवश्यकतेनुसार, फोडणीकरिता तेल, हिंग, मोहरी, मीठ चवीनुसार.
कृती – सर्वप्रथम केळीची सालं काढून स्वच्छ धुवून घ्यावीत व चिरून घ्यावीत. कांदे चिरून घ्यावेत. कढईत तेल घालून त्यात मोहरी + मिरचीचे तुकडे + हिंग + कांदे घालून व्यवस्थित परतून घ्या. परतल्यावर त्यात हळद + तिखट घालून चिरलेली केळीची साले घालावीत. चवीनुसार मीठ घालावे व थोडे पाणी घालून वाफ काढावी. नंतर बेसन पेरून एकजीव करावे व वाफ द्यावी. लिंबाचा रस घालावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा!
केळीच्या सालींचा झुणका, पोळी आणि केळींचे शिक्रण… उत्तम बेत.